Grrains-Worm
Grrains-Worm

साठवणीतील धान्यावरील प्राथमिक किडी

जगभरामध्ये किडीमुळे अन्नधान्याचे प्रति वर्ष सुमारे ६० हजार कोटी रुपये मूल्याचे नुकसान होते. साठवणीतील नुकसान टाळण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करावा.

मानवी आहारामध्ये धान्याचे प्रमाण सुमारे ८० टक्क्यांपर्यंत असते. काढणीनंतर धान्याची साठवण प्रामुख्याने खाण्यासाठी, बियाणे याबरोबरच बाजारपेठेत चांगल्या दराच्या अपेक्षेने केली जाते. प्रत्यक्ष उत्पादनादरम्यान शेतामध्ये येणाऱ्या किडींमुळे धान्याचे १२ टक्के नुकसान होते. मात्र त्याच्या तिप्पट (३६ टक्के) नुकसान कापणीपश्चात साठवणीमध्ये येणाऱ्या किडींमुळे होते. म्हणजेच काढणीपश्चात अन्नधान्यांची साठवण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. 

प्राथमिक व दुय्यम अशा दोन प्रकारच्या किडींमुळे साठवणीतील धान्याचे नुकसान होते. प्राथमिक किडींच्या अळी अवस्थेत दातांची पूर्ण वाढ झालेली असल्यामुळे त्या दाण्यावरील टणक आवरण फोडून धान्याचे नुकसान करू शकतात.

खाप्रा भुंगेरे
यजमान पिके - भात, गहू, ज्वारी, मका, कडधान्य, तेलबिया, पेंड इ.

या किडीची मादी दाण्यावर तसेच भिंतीवरील भेगांमध्ये अंडी घालते. अळी केसाळ असून ती दाणे पोखरते. परिणामी दाण्याची टरफले शिल्लक राहतात. अळीच्या अंगावरील केस, शरीरावरील आवरण व विष्ठेमुळे धान्यास दर्प येतो. बाजारमूल्य कमी होते. खाप्रा भुंगेऱ्यामुळे होणारे नुकसान गोण्या किंवा पोत्यातील धान्याच्या वरील थरामध्ये आढळते. हिवाळ्यात अन्न नसल्यास किंवा प्रतिकूल हवामानात या किडीच्या अळ्या सुप्तावस्थेत जातात. ही सुप्तावस्था चार वर्षापर्यंत टिकू शकते. 

दाणे पोखरणारी अळी किंवा टोपी भुंगेरे 
यजमान पिके -
भात, मका, ज्वारी, गहू, सातू.

नुकसानीचा प्रकार 
या किडीची अळी व प्रौढ भुंगेरे धान्याचे नुकसान करतात. मादी भुंगेरे दाण्यावर अंडी घालतात. अळी दाण्यामध्ये शिरून दाणे फस्त करते. त्यामुळे फक्त टरफले राहतात. अळी प्रादुर्भावग्रस्त दाण्यामध्ये कोषावस्थेत जाते.

कडधान्यात भुंगेरे
यजमान पिके -
सर्व कडधान्ये उदा. तूर, मूग, उडीद, चवळी.

नुकसानीचा प्रकार
ही कीड शेतात पीक काढण्यापूर्वीच दाण्यात प्रवेश करते. प्रौढ अळी दाण्यामध्ये शिरून धान्य व धान्यामध्येच राहते. प्रौढ भुंगेरे दाण्यांना छिद्र पाडून बाहेर पडल्याने नुकसान होते. अन्य वेळी प्रौढ निरुपद्रवी असतो.

चिंच तसेच शेंगदाण्यावरील भुंगेरे
यजमान पिके - चिंच, शेंगदाणे इ.

नुकसानीचा प्रकार 
या किडीचे भुंगेरे चिंचेबरोबरच भुईमुगाच्या शेंगावर व दाण्यावर अंडी घालतात. अळी शेंगामधील बी तसेच दाणे पोखरून उपजीविका करते. अळी टरफलामध्ये कोषावस्थेत जाते.

सिगारेट भुंगेरे
यजमान घटक - गव्हाचे पीठ, धान्याचे तूस, शेंगदाणे, कोकोबिया, कापूस बिया, मसाल्याचे पदार्थ, मांस व माशांच्या हाडाचा चुरा, आले, मिरची, हळद इ.

नुकसानीचा प्रकार 
या किडीच्या अळीच्या अंगावर केस असतात. ही अळी धान्य व प्रक्रियायुक्त पदार्थामध्ये टाचणीच्या डोक्यासारखे गोलाकार छिद्र पाडून आतील अन्नावर उपजीविका करतात. धान्य व प्रक्रिया केलेल्या पदार्थाची प्रत खालावते.

ओसाड भांडारातील भुंगेरे
यजमान घटक - हळद, धने, आले व प्राणिजन्य पदार्थ इ.

नुकसानीचा प्रकार
किडीचा, कीडनाशकाच्या भांडारात तसेच साठवण काळात अळी धान्य व प्राणिजन्य पदार्थांमध्ये छिद्र पाडून धान्य पदार्थ पोखरतात.

तृणधान्यावरील पतंग 
यजमान पिके -
 भात, मका, ज्वारी, गहू, सातू इ.
नुकसानीचा प्रकार 
या किडीची अळी फक्त साठवलेल्या धान्याचे नुकसान करते. ही अळी पांढऱ्या रंगाची असून, तिचे डोके पिवळे असते. अळी दाण्यावरील भेगांमधून दाण्यामध्ये प्रवेश करून आतील गाभा खाते. तिचे वास्तव्य नेहमी दाण्यातच राहते. ही कीड शेतामध्ये व साठवणीमध्येही दाण्याचे नुकसान करते. धान्य कोठ्या किंवा पोत्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव होतो.

बटाट्यावरील पाकोळी
यजमान पीक -
 बटाटा.
नुकसानीचा प्रकार
बटाट्याच्या साठवणुकीदरम्यान अळीचा प्रादुर्भाव झाल्यास बटाटा सडतो. दुर्गंधी पसरते. अळी प्रादुर्भाव ग्रस्त बटाट्यावर चंदेरी रंगाच्या कोषामध्ये कोषावस्था पूर्ण करते.

- हरीश फरकाडे, ८९२८३६३६३८ (सहायक प्राध्यापक- वनस्पती रोगशास्त्र विभाग, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com