दुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा ध्यास

Quality production in drought areas
Quality production in drought areas

नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील संदीप राजळे यांनी साखर कारखान्यातील अभियंतापदाची नोकरी सोडून शेतीलाच वाहून घेतले. स्वतःच्या शेतीसह भाडेतत्त्वावरील अशा ४० एकर शेतीत त्यांनी डाळिंब या मुख्य पिकासह विविध पिकांचे प्रयोग यशस्वी केले आहेत. पाणी व सेंद्रिय व्यवस्थापनाच्या आधारे दुष्काळी भागातही दर्जेदार मालाची निर्मिती करून त्यास चांगले दर मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. 

नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परिसर हा दुष्काळी भाग आहे. येथील उच्चशिक्षित युवा शेतकरी संदीप म्हातारदेव राजळे यांची वडिलोपार्जित वीस एकर शेती आहे. आई-वडील, विजय व संतोष हे बंधू असा त्यांचा परिवार आहे. कुटुंबातील दहा सदस्यांपैकी सहा जण शेतात राबतात. संदीप यांच्यासोबत त्यांचे भाऊ विजय व भावजय अलका यांचा शेती व्यवस्थापनात मोठा सहभाग आहे. 

नोकरी सोडून शेतीची जबाबदारी 
संदीप गावाजवळच असलेल्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात साहाय्यक अभियंता पदावर नोकरी करीत होते. नोकरी सांभाळत त्यांनी शेतीकडेही आवडीने लक्ष दिले. सुमारे दहा वर्षे नोकरी करून २००९ मध्ये राजीनामा दिला आणि पूर्णपणे शेतीला वाहून घेतले. 

विविध प्रयोग  
दुष्काळी भाग, पाण्याची कायम वानवा, त्यामुळे  बाजरी, ज्वारीसारखी पारंपरिक पिके घेतली जात. 
शेतीत आपले करिअर सुरू केले तेव्हा एक एकरावरील तैवान पपईची लागवड केली. त्यानंतर क्षेत्रात वाढ  करून हे क्षेत्र पाच एकरांपर्यंत नेले. नगर बाजार  समितीत विक्री व्हायची. त्यानंतर डाळिंब पिकाकडे  मोर्चा वळवला. 
  काही वर्षांपूर्वी दीड एकरात भगवा डाळिंबाची लागवड केली. आज या पिकात सुमारे १८ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. पुणे येथील वकिली व्यावसायिकाची २० एकर शेतीही भाडेतत्त्वावर घेतली आहे. आज एकूण सुमारे २५ एकरांत या पिकाचे संगोपन होते आहे. 
  दरवर्षी एकरी १० ते १२ टन उत्पादन घेण्यात येते. किमान दर २५ रुपये ते कमाल दर १८० रुपये मिळवण्यातही संदीप यशस्वी झाले आहेत. सुरवातीला स्थानिक व्यापाऱ्यांना ते माल देत. आता गरजेनुसार राज्याबाहेरील व्यापाऱ्यांनाही विक्री होते. सन २०१२ मध्ये मुंबईच्या व्यापाऱ्यांमार्फत युरोपीय देशांतही निर्यात केली.
  यंदा केवळ पाण्याचे नियोजन केल्यामुळे भरदुष्काळात १० एकर क्षेत्रावर एक एप्रिलच्या दरम्यान बहर धरला. मात्र दुष्काळ, उन्हाची तीव्रता यामुळे पीक घेता आले नाही, तरीही केवळ पाणी व्यवस्थापनामुळे आठ हजार झाडे जगवता आली. 
  डाळिंब लागवड, शेती नियोजन, पाइपलाइन व अन्य शेतीच्या कामासाठी २००२ मध्ये साडेसात लाखांचे कर्ज घेतले, त्यातून शेतीचा विस्तार केला. 
  डाळिंबाव्यतिरिक्त हळद, आले, साबुदाणा, ढोबळी मिरची, वांगे आदींचेही प्रयोग राबवले आहेत. 

पाणी बचतीसाठी नियोजन 
दुष्काळी भाग असल्याने या भागात शेततळ्याद्वारे फळबागा जगवल्या जात आहेत. संदीप यांनी २०१० मध्ये ३० लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारले. सन २०१३ मध्ये त्यात वाढ करून ते एक कोटी लिटर क्षमतेचे केले. गावाजवळील साठवण तलावाजवळ जागा घेऊन विहीर खोदली. आधीच्या दोन विहिरीदेखील आहेत. उन्हाळ्यात त्यांना पाणी नसते, त्यामुळे त्यातील पाण्याने पावसाळ्यात तलाव भरतात. गेल्या वर्षी पाऊस नसल्याने शेततळ्यात उपलब्ध पाण्याच्या वापराचेच नियोजन केले. 

डाळिंबाच्या झाडाला प्रतिदिवशी ३२ लिटर पाणी देण्याचे नियोजन केले. डबल लॅटरल ठिबक पद्धतीने पाणी देण्यात येते. दोन लिटर प्रतितास पाणी देणारे ड्रिपर्स एका जागी बसवण्याएवजी ते चार ठिकाणी बसवले. त्यामुळे एकाच जागी आठ लिटर पाणी पडण्याएवजी ते विभागून चार ठिकाणी पडते, त्यामुळे झाडाला सर्व बाजूंनी पाणी मिळून बचतही होते. 

वीस एकरांत पाचटाचे मल्चिंग 
संदीप दरवर्षी २० एकरांत उसाच्या पाचटाचे मल्चिंग करतात, त्यासाठी दोन लाख रुपये खर्च येतो. परिसरातील ऊस उत्पादकांकडून ते पाचट घेतात. या प्रयोगामुळे वर्षाला तणकाढणीसाठी येणाऱ्या पाच ते सहा लाख रुपयांची बचत त्यांनी केली आहे. शिवाय, ३० टक्के पाणी बचत झाली आहे. दररोज देण्याएवजी एक दिवसाआड पाणी देता येत आहे.  

गांडूळ खताचा वापर
  संदीप यांनी दहा वर्षांपासून सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे. त्यात ७० टक्के सेंद्रिय व ३० टक्के रासायनिक असे गुणोत्तर असते. गांडूळ खत प्रकल्पही सुरू केला असून त्यातून वर्षाला ५० टन खत तयार होते. पैकी पंचवीस एकरांना साधारण तीस टन खताचा वापर होतो. उर्वरित खत ८ रुपये प्रतिकिलो दराने विक्री करतात. 

  शेणखताच्या उपलब्‍धतेसाठी चार गायी आहेत. वर्षाला २० टन शेणखत उपलब्ध होते. गांडूळ खतनिर्मितीत त्याचाच वापर होतो. गरजेनुसार शेणखत विकतही घेण्यात येते. सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे जमिनीच्या सुपीकतेत वाढ झाली आहे. रासायनिक शेतीतील खर्चातही बचत झाली आहे. डाळिंबाचे एकरी उत्पादन दीडपटीने वाढल्याचे संदीप म्हणाले. 

  डाळिंबाची रोपे तयार करण्याचेही प्रशिक्षण घेतले आहे. त्यांची रोपवाटिका कृषी विभाग मान्यताप्राप्त आहे. दुष्काळी भागात आधार असलेल्या डाळिंबाची पाथर्डी तालुक्यात लागवड वाढत आहे. सरकारी दरापेक्षाही कमी दराने रोपांची विक्री होते. 

  यशस्वी शेती व्यवस्थापनाबद्दल भारतीय कृषक समाजातर्फे उत्कृष्ट शेतकरी, तसेच ज्यांना डाळिंब दिले जाते त्या व्यापाऱ्यांमार्फत, तसेच नाशिक आदी ठिकाणच्या पुरस्कारांनी संदीप यांचा गौरव झाला आहे. दुष्काळ ही संधी समजून हिमतीने काम करायला हवे. माझ्याकडे असलेल्या अल्प पाण्याचा वापर करून मी डाळिंबाची बाग जगवली आणि दुष्काळात उत्पादन घेतले. 
   संदीप राजळे, ७९७२५३२८५७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com