परभणीत ‘पणन’च्या खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी वाहनांच्या रांगा 

प्रतिनिधी
शुक्रवार, 22 मे 2020

राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी येथील केंद्रावर कापूस खरेदीची गती वाढविण्यासाठी बाजार समितीतर्फे दररोज १०० ते १२० नोंदणीकृत शेतकऱ्यांना संदेश पाठवले जात आहेत.

परभणी - राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी येथील केंद्रावर कापूस खरेदीची गती वाढविण्यासाठी बाजार समितीतर्फे दररोज १०० ते १२० नोंदणीकृत शेतकऱ्यांना संदेश पाठवले जात आहेत. परंतु, विविध कारणांनी अडथळे येत आहेत. त्यामुळे दररोज ४० ते ५० वाहनांचे मोजमाप शिल्लक राहत आहे. भर उन्हात थांबून दिवसभरात मोजमाप न झालेल्या शेतकऱ्यांचा मुक्काम खरेदी केंद्रावर पडत असल्याने वाहन भाड्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परभणी बाजार समितीकडे ऑफलाइन पध्दतीने ३ हजार १९४, तर ऑनलाइन पध्दतीने ७ हजार २३७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. चार जिनिंग कंपन्यांत कापूस खरेदी केंद्रे कार्यान्वित केली आहेत. परंतु, एका जिनिंग कंपनीतील वजन काटा नादुरुस्त असल्यामुळे खरेदी बंद आहे. सुरुवातीचे काही दिवस २५ ते ४० शेतकऱ्यांना संदेश पाठविले जात असत. त्यावेळी दररोज मोजमाप होत असे. गुरुवार (ता.२१) पर्यंत जेमतेम सुमारे ८०० शेतकऱ्यांचे मोजमाप झाले. अनेक जिनिंग कंपन्या सुरु नाहीत. त्यामुळे खरेदी केलेल कापूस साठविण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. एका टोकनवर एकापेक्षा जास्त वाहने येत आहेत. जिल्ह्यतील अनेक केंद्रांवर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, व्यापाऱ्यांचीच चलती असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना मात्र मोजमापासाठी ताटकळत थांबावे लागत आहे. दिवसभरात मोजमाप न झालेल्या शेतकऱ्यांना मुक्कामी वाहन भाड्याचा भुर्दंड बसत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगळवारी सायंकाळी बाजार समितीकडून संदेश आल्यानंतर रात्री वाहनात कापूस भरुन बुधवारी (ता.२०) सकाळी केंद्रावर घेऊन  आलो. दिवसभर उन्हात थांबलो. परंतु, मोजमाप न झाल्याने मुक्काम पडला. 
- वसंत शिंदे, शेतकरी,  धसाडी, ता. परभणी 

वडिलांच्या नावाने नोंदणी केली आहे. दोन हजारावर नंबर आहे. एवढ्या हळूहळू खरेदी सुरु राहिली, तर आमचा नंबर पेरणी पर्यंतही येण्याची शक्यता नाही. 
- रामप्रसाद चोपडे, समसापूर, ता.परभणी. 

कापूस खरेदी प्रक्रिया वेगाने होण्यासाठी जिनिंगची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 
- संजय तळणीकर, सचिव, बाजार समिती, परभणी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Queues of vehicles for sale of cotton at parbhani