esakal | Ratnagiri: भाट्ये नारळ संशोधन केंद्राची कोटीची झेप
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri

Ratnagiri: भाट्ये नारळ संशोधन केंद्राची कोटीची झेप

sakal_logo
By
राजेश कळंबटे/

रत्नागिरी: कोकणातील शेतक‍यांना नारळ लागवडीमधून उत्पन्न कसे वाढवावे हे प्रात्यक्षिकासह दाखवून देण्याचे काम रत्नागिरीतील भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राने यशस्वीपणे केले आहे. प्रक्षेत्र वाढविण्यासह रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायांवर संशोधन सुरू आहे. मिश्रपिकांसह रोपवाटिकेमधून याच नारळ केंद्राला दरवर्षी एक कोटीचा महसूल शासनाला दिला जातो. अन्य संशोधन केंद्राच्या तुलनेत भाट्येमधून सर्वाधिक उत्पन्न मिळते.

भाट्ये नारळ संशोधन केंद्राचे कामकाज १९६८ पासून सुरू झाले. या केंद्राचे क्षेत्र २५.८४ हेक्टर असून लागवडीखालील क्षेत्र २२.५० हेक्टर आहे. त्यात ४ हजार ६४५ विविध प्रकारची नारळाची झाडे आहेत. १९५७ सालापासून २७ जातींचा संग्रह येथे केला आहे. या केंद्रात नारळ रोपांची विक्री, मसाला पिकांची कलमं तयार करून विकणे, मसाला पदार्थ विक्री, गांडूळ खत विक्री, नारळ बिायणे विक्री यामधून हे उत्पन्न मिळते.

दहा वर्षांपूर्वी हेच उत्पन्न ५० ते ६० लाख रुपये होते. २५ ते ३० हजार नारळ रोपांची विक्री होते दरवर्षी ३० हजारांपेक्षा अधिक मसाले रोपे, ८० ते ९० नारळ बियाणे विक्री केली जातात. त्याचबरोबर दालचिनी साल २५० किलो, जायपत्री १५ किलो, तमाल पत्री १५ किलो विकली जाते.

भाट्ये केंद्रातून नारळाचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यावरील कीड-रोगांवर नियंत्रणासाठी उपाययोजनांवर संशोधन होते. नारळ प्रक्षेत्र वाढविण्यासाठी दर्जेदार रोपेही उपलब्ध करून दिली जातात. विविध प्रयोगांमधून वर्षाला मिळणारे महसुली उत्पन्न एक कोटीपर्यंत जाते.

- डॉ. वैभव शिंदे, वरिष्ठ शास्त्रज्ञ

एक एकरमधून वर्षाला अडीच लाख

उत्पन्नवाढीसाठी नारळ संशोधन केंद्रात जायफळ, दालचिनी, काळीमिरी, लवंग, ऑलस्पाईस अशी मिश्रपीक लागवड केली गेली. आंतरपिकाच्या प्रयोगालाच लाखीबाग संकल्पना म्हटले जाते. एक एकर नारळ लागवडीत ७० नारळ झाडे, १४० काळीमिरी, ५४ जायफळ, २४६ दालचिनी, २४६ केळी व ४ हजार ३२० अननस इतकी लागवड असते. त्यातून वर्षाला २ ते २.५० लाख मिळू शकतात. नारळापासून वर्षाला १ लाख १२ हजार तर उर्वरित आंतरपिकापासून मिळतात, हा प्रयोग संशोधन केंद्रात यशस्वी केला आहे.

loading image
go to top