राऊत बंधू - कांदा बीजोत्पादनातील मास्टर

राऊत बंधू - कांदा बीजोत्पादनातील मास्टर

कांदा बीजोत्पादनात विदर्भात बुलडाणा जिल्हा अग्रेसर समजला जातो. दरवर्षी बीजोत्पादन घेत अनेक कांदा उत्पादकांनी त्यात सातत्य टिकवले आहे. रब्बीत हमखास उत्पन्नाचे पीक म्हणून त्यात ओळख निर्माण केली. सिंदखेडराजा तालुक्‍यातील साखरखेर्डा येथील राऊत कुटुंब १० वर्षांपासून पाच एकरांत कांदा बीजोत्पादन घेत आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनातून या शेतीत त्यांचा हातखंडा तयार झाला आहे. यंदा एक एकरांत त्यांना विक्रमी उत्पादनाची अपेक्षा आहे. 

बुलडाणा जिल्ह्यात साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) भागात पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने त्याचे परिणाम सिंचनावर होत आहेत. या मुळे शेतकरी अति पाण्याची पिके सोडून देत आहेत. हे गाव कापूस तसेच कांदा बीजोत्पादनात अग्रेसर म्हणून ओळखले जाते. गावातील ज्ञानेश्‍वर, दिगंबर,  दत्तात्रेय या राऊत बंधूंनी दहा वर्षांचा कांदा बीजोत्पादनातील अनुभव तयार केला आहे. साहजिकच या शेतीत त्यांचा चांगला हातखंडा तयार झाला आहे. मागील वर्षांपर्यंत या कुटुंबाची संयुक्त शेती होती. मात्र यंदा प्रत्येकाचे क्षेत्र स्वतंत्र झाले आहे. तरीही व्यवस्थापन, बियाणे, करारासाठी कंपनीची निवड या गोष्टी एकत्र बसूनच ते निश्‍चित करतात. तिघां भावांपैकी सर्वांत लहान असलेले दत्तात्रेय हे त्यासाठी पुढाकार घेतात.

प्रयोगशील शेतीतील राऊत बंधू 
साखरखेर्डा परिसरात राऊत बंधूंनी प्रत्येत पिकात उल्लेखनीय उत्पादन घेण्यात ओळख तयार केली आहे. खरिपात ते सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके घेतात. शेतीतील कामांसाठी यंत्रांचा वापर केला जातो. त्यासाठी दोन ट्रॅक्‍टर्स, सिंचनासाठी विहीर, बोअरवेल्स आहेत. शेतीत अधिक उत्पादन काढूनही अनेकदा दर मिळत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांच्या पदरात निराशा येते. मग आम्ही विविध कंपन्यांसोबत करार शेती सुरू केली असे दत्तात्रेय सांगतात. यावर्षी खरिपात १५ गुंठ्यांत एका नामांकित कापूस कंपनीसाठी बीजोत्पादन केले. गेल्या दहा वर्षांच्या काळात सुमारे पाच एकरांत रब्बी हंगामात कांदा बीजोत्पादन असायचे. यंदा वाटण्या झाल्याने माझे हे क्षेत्र एक एकरच ठेवल्याचे दत्तात्रेय यांनी सांगितले. ते बीजोत्पादनासाठी पट्टा पद्धतीचा वापर करतात. हा पट्टा साडेतीन फुटांचा असतो. दोन तासांतील अंतर १८ इंच असते. एकरी २० क्विंटल कांद्याची गरज भासते. त्याचे वजन जास्त असते. 

हवामानाचा धोका  ओळखून नियोजन 
कांदा बीजोत्पादनात सर्वार्त महत्वाची जोखीम असते ती प्रतिकूल हवामानाची. पीक काढणीच्या अवस्थेत असेल व अवकाळी, गारपिटीच्या घटना घडल्या तर हातातोंडाशी आलेले संपूर्ण पीक नुकसानीत जाते. हा धोका लक्षात घेऊन राऊत यांनी बीजोत्पादनाचे क्षेत्र वेगवेगळ्या पट्ट्यात लावले आहे. त्यामुळे एके ठिकाणी नुकसान झाले तरी दुसऱ्या ठिकाणी ते भरून निघू शकते. 

 अर्थकारण 
इतक्या वर्षांच्या अनुभवात एकरी चार क्विंटलपासून पाच क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे दत्तात्रय सांगतात. यंदा प्लॉट पाहाता हे उत्पादन आठ क्विंटलपर्यंत मिळेल असा त्यांना अंदाज आहे. दरवर्षी एकाच कंपनीसोबत करार करण्यात येतो. क्विंटलला ३५ ते ४० हजार रुपये दर मिळतो. यंदा मात्र ४२ हजार रुपये दराने करार झाला असल्याचे ते म्हणाले. एकरी सुमारे ६० हजार रुपये खर्च येतो. संपूर्ण पीक कालावधी साधारण पाच महिन्यांचा असतो. या कालावधीत एकरी तीन लाख रुपये रक्कम हाती पडण्याची क्षमता या प्रयोगात असल्याचे दत्तात्रय यांनी सांगितले. 
  दत्तात्रेय गणपत राऊत, ९११९४१०२०० 

राऊत यांच्या  कांदा बीजोत्पादनातील 
ठळक बाबी 
  खत-पाणी यांचे काटेकोर नियोजन
  पट्टा पद्धतीचा वापर
  अवास्तव खर्च टाळण्याचा प्रयत्न 
  बियाणे कंपन्यांचा विश्वास टिकवला. 
  कंपन्यांकडून नियोजनाबाबत होणाऱ्या सूचनांचे पालन करतात
  स्वतः व्यवस्थापन करतानाच भावांना व अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी पुढाकार
  संपूर्ण कुटुंब शेतीत राबते.

बीजोत्पादनाचे गाव
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. गेल्या काही वर्षांत या भागातील शेतकरी बीजोत्पादनातील व्यावसायिक शेतीत उतरले आहेत. यामध्ये बियाणे कंपन्यांसोबत करार केले जातात. मागील काही वर्षांत या गावातील कांदा बीजोत्पादनाखालील क्षेत्र ५० हेक्टरपर्यंत पोचले होते. अलीकडील दोन-तीन वर्षांत दुष्काळी परिस्थिती सातत्याने निर्माण होत असल्याने सिंचनासाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशाही परिस्थितीत पाण्याची सोय असलेले शेतकरी कांदा बीजोत्पादन टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर्षी गावात १५ ते २० एकरांवर कांदा बीजोत्पादन क्षेत्र आहे. या शेतकऱ्यांना कंपनीकडून कांदा पुरवण्यात येतो. काही कंपन्यांसाठी हरभरा बीजोत्पादनही घेतले जाते. खरिपातही कापूस, सोयाबीनचे दर्जेदार बीजोत्पादन घेणारे शेतकरी साखरखेर्डा भागात पाहण्यास मिळतात. शेडनेटधील बीजोत्पादन या भागात पाहण्यास मिळत नसले तरी गावापासून काही अंतरावर असलेल्या सिंदी, दरेगाव, नागझरी, तांदूळवाडी या गावांत मात्र संरक्षित शेतीतील बीजोत्पादन मोठ्या क्षेत्रात घेतले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com