शून्यातून राऊत दांपत्याने उभारली शेतीत स्वयंपूर्णत:

1) राऊत कुटुंबाने जोपासलेली फळबाग. 2) मालन राऊत यांना शेळीपालनाचा चांगला आधार झाला.
1) राऊत कुटुंबाने जोपासलेली फळबाग. 2) मालन राऊत यांना शेळीपालनाचा चांगला आधार झाला.

लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत दांपत्याने शून्यातून आपल्या शेतीचे विश्‍व उभे केले आहे. त्यांची सुमारे अडीच एकर शेती. मात्र, अत्यंत कष्टाने ती वाढवत त्यात मिश्रपिके, भाजीपाला व विविध फळपिकांची बाग अशी पद्धती उभी केली. जोडीला शेळी, कुक्‍कुटपालन व दुभत्या जनावरांची मोठी आर्थिक जोड दिली. घरासाठी लागणारा विविध शेतीमाल स्वतःच पिकवून या दांपत्याने स्वयंपूर्ण शेतीचा नमुनाच पेश केला आहे.

लातूर जिल्ह्याला कायम दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील औसा तालुक्यात नागरसोगा येथील राऊत कुटुंबदेखील अत्यंत कमी पाण्यात आपली सुमारे अडीच एकर शेती कशीबशी करायचे. पण, उदरनिर्वाहासाठी घरातील अमृत यांना नोकरीच्या उद्देशाने मुंबई गाठावी लागली. संसार थाटला. परिवार वाढला. पुढे एकेक करीत मिल्स बंद पडत गेल्या. अमृत व पत्नी रुक्मिणी यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. 

सुरवातीचे कष्ट 
गावापासून जवळच रस्त्याकडेला. पहिले दोनेक वर्षे गावातील घरी राहून जा- ये करून कोरडवाहू शेती केली. तीन भावांत असलेल्या सामाईक विहिरीला जेमतेम पाणी. आता अमृत यांचा मुलगा संभाजी व त्यांची पत्नी मालन यांच्यावर शेतीची जबाबदारी आली. मालन या मुंबईच्या. शेतीत त्यांनी यापूर्वी कोणतेच काम केलेले नव्हते. मग गावात पायपुसणे बनवणे, मुंबईत शिकलेला ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करणे असे प्रयत्न त्यांनी सुरू केले. घरखर्च भागायचा. पण दोन मुली, एक मुलगा, सर्वांच्या शाळेचा खर्च, कपडेलत्ते असा खर्च भागेना. नवरा संभाजी यांच्या हाती कला होती. त्यांना जिल्हा परिषद शाळेत नवीन धोरणानुसार भिंतीवर चित्रे काढण्याचे काम मिळाले. 

मालन यांनी घेतली जबाबदारी 
आपली शेती प्रगत केल्याशिवाय गत्यंतर नाही असे संभाजी व मालन यांना वाटू लागले. चुलतजावेच्या निमित्ताने महिला बचत गटाविषयी कळले. त्याचवर्षी शेतात पत्र्याचे शेड टाकून कुटुंब कबिला तिथे हलवला. बोअर घेतले. पाणी बरे लागले. पहिल्या वर्षी अर्धा एकर ऊस केला. चांगला दर मिळाला.  बोअरचे देणे फिटले. शेतातच वास्तव्य केल्याने परिसरातील शेतीतील प्रयोग दृष्टीस पडू लागले.  मग आपणही भाजीपाला, फळबाग करावी ही आंतरिक इच्छा बळावली. हे सुरू असताना लातूर येथील कृषी विज्ञान केंद्रात लघुउद्योगाचे प्रशिक्षणाची संधी मालन यांना मिळाली. कृषी अधिकारी रमेश चिल्ले, सौ. गुंजाळ यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. पुढे आंध्रप्रदेशातही एका आठवड्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. कमी पाण्यावरील फळपिके, मल्चिंग, टाकाऊ पदार्थांपासून सेंद्रिय खते बनवणे, भाजीपाला अशा गोष्टी तिथे समजल्या. 

सुयोग्य शेती पद्धतीची घडी 
त्यानंतर मग मालन यांनी मागे वळून पाहिले नाही. पतीची समर्थ साथ मिळाली. नवे प्रयोग शेतात राबवणे सुरू केले. अर्धा एकर ऊस, हंगामी पिके घेण्यास सुरवात केली. साधारण दोन एकर १८ गुंठे शेती होती. त्याची कुशल घडी बसवली. ती पुढीलप्रमाणे

सुमारे १८ गुंठ्यांत फळबाग 
यात चंदन १२० झाडे, सीताफळ ९०, आंबा १५ (विविध जाती),  भोवताली सागाची ३० रोपे, पपई २, पेरू ४, लिंबू २, केळी १०, मोसंबी २, संत्री ४, सीताफळात एकाड एक मिलीया डुबिया, रामफळ २, कडेने चिंच २, जांभूळ १, आवळा, अंजीर, फणस, डाळिंब, नारळ, शेवगा, बांबू बेटे 

सुमारे दीड एकरात 
घरी खाण्यापुरती विविध धान्ये (उदा. मूग, उडीद, साळ)
अर्धा एकरात 
वर्षभर विविध भाजीपाला. यात पालक, दोडका, मेथी, कांदे, लसूण, वांगी आदींचा समावेश. 

पूरक व्यवसायातून आर्थिक वृद्धी 
अलीकडील वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीचा वापर सुरू आहे. त्यासाठी दोन बैल व दोन गायी आहेत. शेणापासून वाफ्यात गांडूळखत तयार केले जाते. सुमारे दोन ते शेळ्या आहेत. वनराज कोंबड्या २० व  गावरान पाच आहेत. त्यांच्या विष्ठेचा वापरही गांडूळखतासाठी होतो. जनावरे उन्हाळ्यात शेतात बांधून ठेवल्याने दरवर्षी अर्धा एकर शेती खतावली जाते. आंब्याची दोन मोठी झाडे असल्याने त्या सावलीला शेळ्या, कोंबड्या, बैल, गायी व माणसांसाठी बैठकीची व्यवस्था आहे. कोंबडीची अंडी विकून घरखर्चाला आधार होतो.

शेळीदेखील पाच हजार रुपयांना विकली जाते. मालन या आपला भाजीपाला व्यापाऱ्यांना न देता थेट आठवडी बाजारात थेट विक्री करतात. त्यामुळे नफ्याचे मार्जिन वाढते. कडूनिंबाच्या झाडाच्या हंगामात निंबोळ्या वेचून निंबोळी अर्क तयार केला जातो. दशपर्णी अर्काचाही वापर होतो. हे सगळे तंत्र मालन यांनी शिकून घेतले आहे. सेंद्रिय पद्धतीच्या वापरातून रासायनिक खते व कीडनाशके यांच्यावरील खर्च वाचला आहे.  

बचत गटांद्वारे सक्रिय 
कृषी विभागाच्या आत्मा योजनेकडून भाजीपाला बियाणे व मका चाऱ्यासाठी बियाणे मिळाले. महिलांनी मिळून तयार केलेल्या बजरंगबली शेतकरी महिला गटामार्फत दरमहा दोन हजार रुपयांची बचत बॅंकेत भरली जाते. या गटाच्या मालन अध्यक्ष आहेत. गावात एकूण पाच बचत गट असून या सर्वांना मालन व अन्य काहीजणी मार्गदर्शन करतात. यातील महादेवी महिला बचत गटाला हिरकणी पुरस्कार तसेच उमेद संस्थेतर्फे ५० हजार रुपयांचा तालुकास्तरीय पुरस्कार मिळाला आहे. त्यातूनच मालन व सहकारी महिलांचे मनोबल वाढले आहे. स्वयंशिक्षण संस्थेचे विकास कांबळे त्यांना प्रोत्साहन देतात. बचत गटांना बॅंकेकडून कर्जही मिळवून आठ दहा जणी लघुउद्योग करतात.

शेतीतून झाली प्रगती 
स्वच्छ, शुद्ध हवा, सेंद्रिय अन्न, ताजा भाजीपाला, फळे आहारात मिळतात. कुटुंबही समाधानी झाले आहे. बोअर घेण्यासाठी दोन लाख ३० हजार रुपये खर्च केले. दोन मुली व एका मुलाचे शिक्षण सुरळीत सुरू आहे. सुमारे ५० हजार रुपये खर्चून फळबाग विकसित केली. आता नवे घर बांधण्याचे प्रयोजन आहे. वर्षाला समाधानकारक उत्पन्न शेती व पूरक व्यवसायांमधून येऊ लागले आहे. एक काळ असा होता की सात-आठ सदस्यांच्या कुटुंबाची दोनवेळची चूल पेटायची भ्रांत होती. पती संभाजी शेती सांभाळून पेंटिंगची कामे करून उत्पन्नाला हातभार लावतात. स्वतःबरोबर कुटुंबाला व गावातील अन्य सखींना विकासाची व प्रगतीची वाट दाखविण्यात मालन यांचा लागलेला हातभार महत्त्वाचा ठरला आहे. 
-  मालन राऊत, ७०३८९२९५७९ (लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com