पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह

संजीव चांदोरकर
Monday, 10 August 2020

जगात सध्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही घडतंय. कोणते पारडे जड करायचे हे आपण मिळून ठरवणार आहोत. आपल्या सक्रियतेने किंवा निष्क्रियतेने ; सत्तेच्या राजकारणापासून दूर राहू नका.. 

जगात सध्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही घडतंय. कोणते पारडे जड करायचे हे आपण मिळून ठरवणार आहोत. आपल्या सक्रियतेने किंवा निष्क्रियतेने ; सत्तेच्या राजकारणापासून दूर राहू नका. पृथ्वीच्या आणि मानवी सिव्हिलायझेशनचा काही लाख वर्षांच्या ज्ञात इतिहासात काही निगेटिव्ह आणि काही पॉझिटिव्ह गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत. 

पॉझिटिव्ह 

  • मानवजात मुबलक अन्नधान्य पिकवू शकते. एवढे मुबलक की आपण सामुदायिकरीत्या ठरवले तर जगात सर्वांना दोन वेळचे जेवण मिळू शकेल. 
  • आपल्याला मानवी शरीराच्या रचनेबद्दल, जीव-जिवाणूंबद्दल खूप माहिती मिळाली आहे. औषधे बनवण्याचे शास्त्र अपुरे आहे; पण माहिती मिळवण्याचे शास्त्र अवगत झाले आहे. त्यामुळे आपण सामुदायिक रित्या ठरवले तर माणसे अकाली मरणार नाहीत. 
  • आपल्यातल्या एकाही मुलाला लहानपणी कोणतेही काम करायला न लागता विविध विषयांत शिकता येईल एवढा सरप्लस अर्थव्यवस्थांमध्ये तयार होत आहे. उत्पन्न आणि संपत्तीच्या वाटपाचा विषय नीट हाताळला तर प्रत्येक आई-वडिलाकडे आपापल्या पाल्यांची आर्थिक जबाबदारी घेण्याची कुवत येऊ शकते. 
  • नवीन अपारंपरिक ऊर्जा स्रोत शोधले जात आहेत; जे कमी प्रदूषण करतील, विकेंद्रित पद्धतीने ऊर्जा निर्मिती करतील. त्यामुळे आपण सामुदायिकरीत्या ठरवले तर सर्वाना चांगल्या जीवनमानासाठी, वस्तुमालाच्या उत्पादनासाठी, माणसाचे कष्ट कमी व्हावेत यासाठी प्रदूषण न करता पुरेशी ऊर्जा आपण तयार करू शकतो. 
  • हजारो किलोमीटर दूरवर दूरसंचार, संपर्क करण्याची साधने, माहिती पाठवण्याची साधने, शिक्षणाची, करमणुकीची साधने  तयार झाली आहेत व होत आहेत. ती अजूनही स्वस्त होऊ शकतील. आपण सामुदायिकरीत्या ठरवले तर प्रत्येकाचे जीवन अधिक आश्वस्त आणि आनंदी होऊ शकते.

 

निगेटिव्ह 

  • वातावरणात सतत वाढत जाणारा कार्बन आणि त्याचे तपमान, ढग, बर्फ, माती, पाणी, वनस्पती, प्राणीसृष्टी यावर होणारे परिणाम. भूगर्भातील सतत खाली जाणारी पाण्याची पातळी आणि त्यातून तयार होणारे प्रश्न. हवा, पाणी, जमीन प्रदूषण, माणसांचे प्राणिसृष्टीवर आक्रमण आणि त्यातून माणसाने आमंत्रण दिलेला विषाणूचा हल्ला. 
  • जागतिक अर्थव्यवस्थेत सतत पटीत वाढत जाणारे कर्ज जे कधीतरी कोसळणार आहे. अतिसट्टेबाजीमुळे अस्थिर झालेले बँकिंग आणि वित्तक्षेत्र. देशांमध्ये व जगात वाढत जाणारी आर्थिक विषमता. अर्थव्यवस्थांतील बेरोजगारांचे प्रमाण. आत्महत्या, अपघात, प्रदूषण अशा कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या, जीवनशैलीशी संबंधित अनेक रोग. 
  • कम्युनिटी फिलिंग लयाला जाणे. मी, माझा भावना वाढीस लागणे. जात, धर्म, भाषा, वर्ण, वंश, देश आणि अजून संकुचित अस्मिता अधिक धारदार बनणे. एकाच पृथ्वीवर छोट्या छोट्या दहा लाख पृथ्वी तयार झाल्या आहेत. 

वरील दोन्ही याद्या उदाहरणादाखल आहेत. त्यात कमी- जास्त करता येईल. निगेटिव्ह यादी वाढवायची, त्याला अधिक गंभीर करायचे की पॉझिटिव्ह यादी अधिक भक्कम करायची यात तुमचा, तुमच्या मुला-नातवंडांचा, तुमच्या जन्माला न आलेल्या पिढ्यांचा स्वार्थ आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjeev Chandorkar article about positive and negative