सात भावांच्या एकत्रित कुटुंबाचे एकात्मिक शेतीला बळ

सात भावांच्या एकत्रित कुटुंबाचे एकात्मिक शेतीला बळ

एकत्रित कुटुंबाची शक्‍ती खरोखरंच किती मोठी असते, याचे उदाहरण बीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाचे देता येईल. एकेकाळी केवळ दीड एकरांपुरती जमीन असलेल्या या कुटुंबातील सात भावांनी कष्ट, चिकाटीतून आपल्या शेतीचा तब्बल १९७ एकरांपर्यंत विस्तार करण्यापर्यंत मजल गाठली आहे. फळबाग शेतीला दुग्ध व्यवसायाची मोठी जोड देत कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपापली जबाबदारी पेलत आपल्या कुटुंबाला आर्थिक सक्षमता मिळवून दिली आहे. 

बीड जिल्हा नेहमीच दुष्काळ सोसत असतो. दुष्काळाचे आव्हान पेलून जिल्ह्यातील अनेक शेतकरी हिंमत पेलून शेतीत यशस्वीदेखील झाले आहेत. जिल्ह्यातील महाजनवाडी हे जवळपास अडीच हजार लोकसंख्येचे गाव. येथील जगदाळे कुटुंबाची वाटचालही याच पद्धतीने झालेली आहे. शेती आणि पूरक दुग्ध व्यवसाय असा मिलाफ त्यांनी साधला आहे. जवळपास तीस वर्षांपासून त्यात सातत्य जपले आहे. खर्चात बचत म्हणजे नफ्यात वाढ, हे सूत्र अंगीकारून यंत्र, तंत्र व विज्ञानाचा स्वीकार करण्याची मानसिकता ठेवून असलेलं प्रयोगशील कुटुंब म्हणून जगदाळे कुटुंबाकडे पाहता येईल. 

कुटुंबाची शेतीतील वाटचाल  
जगदाळ कुटुंबात सात भाऊ आहेत. प्रत्येक जण आपली जबाबदारी समजून काम करतो. दत्तू, रामा, गणेश, बाबूराव, बबन, बाळासाहेब व नामदेव, अशी भावांची नावे आहेत. वडील कृष्णाजींकडे केवळ दीड एकर जमीन होती. त्यामुळं सर्व भावंडं वडिलांसह हाताला मिळेल ते काम करून कुटुंबाचा चरितार्थ  भागवायची. शेती बटईनेही करायचे. प्रपंच सुरू असतानाच १९९० मध्ये १० एकर शेती खरेदी केली. अजून पैसे कमी पडले म्हणून १९९६ पर्यंत दोन भावंडांना इतरांकडे सालगडी म्हणून राहावे लागले. त्यानंतर शिल्लक रक्कम टाकीत, थोडी- थोडी करीत शेतीचा विस्तार झाला. आजमितीला जगदाळे बंधू तब्बल १९७ एकर जमिनीचे मालक झाले आहेत. कुटुंबातील सदस्यांची संख्याही ३७ च्या घरात आहे. 

शेती व सिंचनाची सोय 
  पाऊसमान व दुष्काळाची स्थिती पाहून सहा विहिरी व १५ बोअरवेल्स  
  पाच शेततळी. 
  दुष्काळात मर्यादित शेतीवरच भर. त्यादृष्टीने १५ एकरांवरच सध्या ठिबक 
  फळबागांवर विशेष भर. यात ८० केशर व मलगोबा आंब्याची झाडं, ५०० चिकूची, २२ जांभळाची, २५ नारळाची, तर १२०० सागवानाची झाडं आहेत.  
  चिकू सात वर्षांपूर्वीची लागवड- प्रतिझाड १०० किलोपर्यंत उत्पादन. वर्षाला एक ते दीड लाख रुपये उत्पन्न.
  सागवानाची सात वर्षांची झाडे. उंची २० ते २५ फूट.   

हंगामी पिकांची साथ 
  फळबागांना हंगामी पिकांची साथ. प्रत्येकी १५ एकरांवर उडीद, तूर, कापूस. काही क्षेत्र तुरीसाठी.   रब्बीत २५ एकरांत ज्वारी. जनावरांची संख्या पाहता पाच-सहा एकरांवर मक्याच्या माध्यमातून बारमाही हिरव्या चाऱ्याची सोय.    उत्पादन- (एकरी) कापूस- एकरी १४ ते १६ क्विंटल, तूर- १२ ते १४ क्विंटल, हरभरा- ९ ते १० क्विंटल, रब्बी ज्वारी १५ क्विंटलच्या पुढे.

दुग्ध व्यवसायाचा मोठा आधार 
जगदाळे कुटुंबाने शेतीला दुग्ध व्यवसायाचा मोठा आधार दिला आहे.  १९९३ मध्ये त्यांच्याकडे तीन संकरित गायी होत्या. पशुसंगोपनावर सातत्याने भर देत गायी, म्हशी, लहान जनावरे मिळून आजमितीला ७५ जनावरांचा सांभाळ ते ऐन दुष्काळात करीत आहेत. यात संकरित २४ गायी, सहा म्हशी, चार खिलार गायी आहेत. दररोज ३५० लिटर दूध संकलन होते. त्याचा संघाला पुरवठा होतो. लहान दोन, एक मोठा ट्रॅक्‍टर, दूध वाहतुकीसाठी एक, चारा व दुधासाठी पीकअप, कुटुंबासाठी चारचाकी वाहन व पाच दुचाक्‍या असा वाहनांचा पसारा आहे.   

मळणी यंत्राने दिली साथ
 १९९२ नंतर जगदाळे कुटुंबातील चौथ्या क्रमांकाचे बंधू बाबूराव यांनी मंडप डेकोरेशनच्या व्यवसायाची कास धरली. सुमारे चार-पाच वर्षे तो चालला. त्या वेळी एका व्यक्‍तीच्या मदतीने विजेवर चालणाऱ्या मळणीयंत्राच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याने  कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचे काम केले. दहा वर्षे व्यवसाय नेटाने केल्यानंतर यंत्राचा वापर स्वत:पुरता ठेवला आहे.  

दुग्ध व्यवसायातील खर्च वाचविण्यासाठी... 
  सुमारे २५ गायींसाठी मुक्‍त गोठ्याची निर्मिती 
  नामदेव यांनी जाणून घेतले जनावरांचे आजार व उपचारांची पद्धत  
  नियोजन, स्वच्छता व व्यवस्थापन कौशल्यामुळे गायी आजारी पडण्याचे प्रमाण अत्यल्प  
  आयुर्वेदाच्या साहाय्याने उपचार करण्यावर भर 
  गायींसाठी फॉगर्स व कूलर्सची सोय 
  दूध बंद झालेल्या गायींचा खुराक वाढविल्याने रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत 
  गायींना गुडघा व कासेचा आजार होऊ नये, यासाठी मॅटची सोय 
  यंदा दुष्काळाची दाहकता ओळखून ४० टन मुरघासाची निर्मिती 
  दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर 
  मिनरल मिक्‍श्चर व दूध थंड करणाऱ्या यंत्राचीही सोय 
  वर्षाला २०० ट्रॉली शेण. वीस एकरांत त्याचा वापर 

गोबरगॅसपासून वीजनिर्मिती: सुमारे ३० वर्षांपासून दुग्ध व्यवसायाची जबाबदारी नामदेव सांभाळतात. गोबरगॅस प्रकल्पही आहे. या प्रकल्पातील गॅसपासून इंजिन चालवत त्या आधारे वीजनिर्मिती करण्याचे त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. त्यापासून कुट्टी यंत्र, धारा काढण्याचे यंत्र, गोठ्यातील फॅन, दूध शीतकरण यंत्र, घरातील पंखे या बाबींसाठी याच विजेवर चालत असल्याने सिलिंडरच्या खर्चात या कुटुंबाने लक्षणीय बचत केली आहे.  

महत्त्वाच्या बाबी 
  दुग्ध व्यवसायातून दर वर्षी सुमारे १२ ते १३ लाख रुपयांचे उत्पन्न 
  वर्षभरात ३०० हून अधिक शेतकऱ्यांकडून दुग्ध व्यवसायाला भेट 
  नामदेव यांना २०१३-१४ चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 
  यंदा दुष्काळामुळे जनावरांसाठी विकतचे पाणी घ्यावे लागले.  

- नामदेवराव जगदाळे,  ९०११६९७१०३, ७६६६२०२०३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com