माती प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

रोम - मातीचे प्रदूषण हा आपल्या पर्यावरणाला सर्वांत मोठा धोका आहे. आपल्या अन्नाचा मुख्य स्रोत असलेली मातीच प्रदूषित झाल्याने मानवी व जनावरांच्या आरोग्यावरही त्याचे प्रतिकूल परिणाम जाणवू लागले असल्याचा गंभीर इशारा अन्न आणि कृषी संघटनेने (एफएअो) एका अहवालाच्या आधारे दिला आहे. या धोक्याच्या तीव्रतेबाबतही पुरेशा प्रमाणात जागृती झालेली नसल्याची चिंताही ‘एफएअो’ने व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय समस्या समजून सर्व देशांनी मातीचे आरोग्य पूर्ववत करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना हाती घेण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.

रोम - मातीचे प्रदूषण हा आपल्या पर्यावरणाला सर्वांत मोठा धोका आहे. आपल्या अन्नाचा मुख्य स्रोत असलेली मातीच प्रदूषित झाल्याने मानवी व जनावरांच्या आरोग्यावरही त्याचे प्रतिकूल परिणाम जाणवू लागले असल्याचा गंभीर इशारा अन्न आणि कृषी संघटनेने (एफएअो) एका अहवालाच्या आधारे दिला आहे. या धोक्याच्या तीव्रतेबाबतही पुरेशा प्रमाणात जागृती झालेली नसल्याची चिंताही ‘एफएअो’ने व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय समस्या समजून सर्व देशांनी मातीचे आरोग्य पूर्ववत करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना हाती घेण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.

यंदाच्या २ ते ४ मे या कालावधीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएअो) रोम येथील मुख्यालयात जागतिक परिषद झाली. मातीचे होत असलेले प्रदूषण, त्याचे पर्यावरण व मानवी आरोग्य या अनुषंगाने धोके व ते कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर करावयाचे प्रयत्न या मुद्द्यांवर परिषदेत चर्चा झाली. जगभरातील तज्ज्ञ व धोरणकर्ते या वेळी उपस्थित होते. मातीचे प्रदूषण - एक अदृश्य सत्य या शीर्षकाखाली ‘एफएअो’ने या वेळी अहवालही प्रसिद्ध केला. 

अहवालातील दाहक सत्य 
या अहवालात संघटनेने माती प्रदूषणासंदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा ऊहापोह केला आहे. रासायनिक घटकांचा मातीतील मर्यादेपेक्षा आढळ हे माती प्रदूषणाचे मुख्य कारण अाहे. त्याचे प्रतिकूल परिणाम माती व पर्यावरणातील निरपराध सजीवांना भोगावे लागतात. माती प्रदूषण या विषयाची अद्याप थेट मीमांसा वा अवलोकन झालेले नाही. तसेच प्रत्यक्ष डोळ्यांनीही ही बाब नजरेत येत नाही. त्यामुळे त्याचे धोके अद्याप अदृश्यच राहिले अाहेत. त्याचे मानव व जनावरांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

अत्यंत घातक रसायनांची निर्मिती 
माती व पर्यावरण प्रदूषणाच्या अनुषंगाने सध्याची परिस्थिती अत्यंत विचार करण्यासारखी असल्याची निरीक्षणे अहवालात नोंदवण्यात आली आहेत. त्यासाठी काही उदाहरणे पुरावादाखल प्रस्तुतही केली आहेत. त्यातील एक उदाहरण म्हणजे युरोपीय रासायनिक उद्योगाने २०१५ मध्ये सुमारे ३१९ दशलक्ष टन रसायनांची निर्मिती केली होती. त्यातील तब्बल ११७ दशलक्ष टन रसायने पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्याचे म्हटले आहे. 

अहवालातील चिंताजनक आकडेवारी 
- सन २०१२ मध्ये शहरी किंवा नगरपालिका क्षेत्रातील घन टाकाऊ घटकांचे उत्पादन - सुमारे १.३ अब्ज टन
- येत्या २०२५ पर्यंत हा आकडा २.२ अब्ज टनांवर जाण्याची भीती
- गेल्या दशकात काही विकसनशील देशांकडून कीडनाशकांच्या वापरात नोंद घेण्याएवढी वाढ
- यात रवांडा, इथिअोपिया देशात सहा पटीने, बांगला देशात चार पटीने तर सुदानमध्ये दहा पटीने वाढ
-- प्रदूषित झालेल्या भागांची संख्या सुमारे ८० हजार. यात आॅस्ट्रेलियाचा मुख्य समावेश
- चीन पर्यावरण मंत्रालयाच्या अंदाजानुसार या देशातील १९ टक्के माती प्रदूषित
- अमेरिकेत प्रदूषित झालेल्या ठिकाणांची संख्या १३०० हून अधिक असल्याकडे एफएअोने वेधले लक्ष 

जागरूकतेविषयी अहवाल म्हणतो...
- माती प्रदूषण समस्येविषयी जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण होऊ लागली आहे. 
- समस्या दूर होण्याच्या दृष्टीने जगभर संशोधनात व कृतीतही वाढ होत आहे. 
- भौगोलिक प्रदेशांतील प्रदूषित ठिकाणांच्या नोंदणीबाबत भिन्नता आढळून येत अाहे. परिणामी विकसनशील देशांतून पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे अहवालातील अभ्यासाला काही प्रमाणात मर्यादा.   
- माती प्रदूषण या समस्येचे निवारण करण्याच्या दृष्टीने आपण एखाद्या गोष्टीतून जितके काही शिकू तेवढ्या अधिक प्रमाणात एखाद्या समस्येवर उकल शोधणे आपल्याला सोपे जाते, अशी प्रतिक्रिया ‘एफएअो’चे प्रसारमाध्यम विभागाचे संचालक इरिक येव्हेस यांनी दिली आहे.  

एफएअोने केल्या शिफारशी
- प्रत्येक देशाने माती प्रदूषण रोखण्यासाठी नियमावली तयार करण्याची गरज
- तसेच मानवी आरोग्याचे हित लक्षात घेऊन मातीतील प्रदूषित घटकांचे प्रमाण मर्यादेपेक्षा खाली ठेवण्याची जबाबदारी घेणे आवश्यक   
- प्रदूषित जमिनी पुन्हा पूवर्वत करण्याचे हवेत प्रयत्न 
- शाश्वत माती व्यवस्थापन पद्धतींचे जागतिक स्तरावर हवा अवलंब

‘एफएअो’च्या अहवालातील माती प्रदूषणाचे परिणाम...
 मातीत दूषित वा विषारी घटकांचे प्रमाण वाढत आहे. 
 मातीची प्रत ढासळत आहे. 
 मानव व प्राण्यांसाठी अन्न असुरक्षित झाले आहे. 
 पाणी व हवादेखील विषारी होत आहे.  
 अन्न सुरक्षितता खालावते आहे. 
 पिकांची उत्पादकता घटते आहे. 

मातीतील प्रदूषण वाढण्याची कारणे
माती प्रदूषित होण्यामागील कारणेही एफएअोच्या अहवालात स्पष्ट केली आहेत. अशाश्वत शेती पद्धतींचा अंगीकार हे त्यापैकी एक कारण. 
मोठ्या प्रमाणात झालेले अौद्योगीकरण, खाणकामांना मिळालेली चालना
शहरी टाकाऊ पदार्थांवर न होणारी प्रक्रिया  
पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर न होणे   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: soil pollution health danger agriculture organisation