#Specialtyofvillage रामणवाडीची गोमूत्राची डेअरी राज्यात प्रसिद्ध

मोहन नेवडे
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर, सांगली, बेळगाव आणि काेकणात वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपणारी आणि आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अनेक गावे आहेत. अख्ख्या जगात ‘गाव माझं वेगळं’ असं अभिमानानं मिरविणाऱ्या या आगळ्यावेगळ्या गावांविषयी ‘हटके’ माहिती देणारी ही मालिका...

विस्तारित राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील रामणवाडी अवघ्या साडेतीनशे लोकसंख्येचे गाव. राधानगरीपासून दहा किलोमीटरवर, तरीही विकासापासून तसे उपेक्षितच, मात्र या खेड्याने जिल्ह्यातच नव्हे राज्यात गोमूत्राची डेअरी म्हणून नाव कमावले आहे. मराठा व धनगर समाजाची कुटुंबे असूनही अख्खं गाव शाकाहारी आहे. येथे यात्रा, जत्रा होत नाहीत की कोंबडी, बकऱ्यांचा बळी दिला जात नाही.

अतिसंरक्षित आणि विस्तारित अभयारण्याच्या काठावर वसलेलं रामाणवाडी गाव. सभोवताली दूरवर बघावं तिकडं सह्याद्रीचे डोंगर. त्यांना लपेटलेल्या वृक्षराजींमुळे आल्हाददायक वातावरण. गावाच्या बाजूच्या उतारावर कड्यावरून कोसळणारा रामनवाडीचा धबधबा.  सगळीकडचे धबधबे अटले तरी हा कोसळतच असतो. अगदी निसर्गानं भरभरून द्यावं, असंच या खेड्याच्या वाट्याला आलेलं आहे. इथले लोकही निसर्गाशी एकरूप झालेले. त्यांचं आणि निसर्गाचं एक अतूट नातेसंबंध तयार झाले आहेत.

कोल्हापूरस्थित वेणू-माधुरी ट्रस्टने दीड दशकांपूर्वी खेडे दत्तक घेतले. ट्रस्टच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने सत्संग कार्यक्रम सुरू झाले. लोकप्रबोधनातून नवे उपक्रम सुरू झाले. प्रत्येक कुटुंबात असलेल्या देशी गायींचे मूत्र दररोज सकाळी जमा करून ते गोमूत्र डेअरीत संकलित केले जाते. गोमूत्रावर येथेच प्रक्रिया करून ते ट्रस्टच्या माध्यमातून कोल्हापुरात विक्रीसाठी पाठवले जाते. अनेक रोगावर त्याचा औषध म्हणून वापर केला जातो. सर्वच कुटुंबाकडे असलेल्या गाईंकडून दररोज जवळपास पन्नास लिटरपर्यंत मूत्र संकलन होते. या कुटुंबांना गोमूत्रासाठी प्रति लिटर आठ रुपये असा दर मिळतो. गोमूत्र डेअरीच्या संकल्पनेतून या खेड्यात स्वयंरोजगाराचे नवे साधनच उभे राहिले आहे.

अभयारण्यक्षेत्रात असल्याने सभोवतालच्या शिवारात रानकोंबडी, ससा, भेकर, आदींचा वावर तरीही कधीही येथील कुटुंबांकडून शिकार नाही. दीड दशकांपासून मराठा व धनगर कुटुंबेही शाकाहारी झाली आहेत. संकलित गोमूत्राचा येथेच पारंपरिक पद्धतीने अर्क तयार केला जातो. तो, सत्तर रोगांवर गुणकारी औषध असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गोमूत्र डेअरी व शाकाहारी कुटुंबे याशिवाय या गावची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. राज्यभरातील प्राथमिक शाळात पोषण आहार देण्याची योजना सुरू होण्यापूर्वीच येथील शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रस्टच्या सहकार्यातून ग्रामस्थांकडून दररोज सकाळी डाळ, भात, भाजी असा आहार नियमितपणे पुरविला जातो.

 

ग्रामपंचायतची निवडणूकही बिनविरोधची पंरपरा या खेड्याने अखंडित राखली आहे. जंगलातील नैसर्गिक झऱ्याच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी व शेतीसाठी सायफन पद्धतीने होतो.

ग्रामस्थांना दळण दळण्यासाठी पाच किलोमीटरवरील फेजिवडे गावात पायपीट करीत जावे लागत होते. आता येथे पारंपरिक तेल घाण्याच्या धर्तीवर बैलाच्या साहाय्याने धान्य दळण्यासाठी चक्की उभारण्याचा प्रयोगही करण्यात आला; मात्र काही तांत्रिक अडसरामुळे प्रयोग बारगळला. 

खेडे विस्तारित अभयारण्यात समाविष्ट झाल्यानंतर अभयारण्य क्षेत्राबाहेर पुनर्वसनासाठीची मागणी झाली आहे. भविष्यात येथील कुटुंबे अन्यत्र पुनर्वसित होतील. त्यानंतर या खेड्याचे तालुक्‍याच्या भौगोलिक नकाशातील अस्तित्व संपुष्टात येईल. तरीही येथील विधायक उपक्रमामुळे वेगळं गाव ही ओळख कायम राहणार आहे. येथील विधायक उपक्रमांची माहिती देणारा एक लघुपटही (डॉक्‍युमेंटरी) लवकरच प्रदर्शित होणार आहे.

वेणू-माधुरी ट्रस्टने येथील प्रत्येक कुटुंबात सकारात्मक दृष्टिकोन आणला. स्वयंरोजगार, वन्यजीव व निसर्गाचे संरक्षण, संवर्धनाची मानसिकता तयार केली. ट्रस्टच्या उपक्रमामुळेच या खेड्याला वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पशुधनाचे पारंपरिक पद्धतीने संगोपन करून पहिली गोमूत्र डेअरी येथेच सुरू झाली. 
- युवराज पाटील,

वेणूमाधुरी ट्रस्ट कार्यकर्ता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Specialty of Village cow Urine Dairy in Ramanwadi