#Specialtyofvillage कोट्यवधींची रताळी पिकवणारे करुंगळे

शाम पाटील
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर, सांगली, बेळगाव आणि काेकणात वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपणारी आणि आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अनेक गावे आहेत. अख्ख्या जगात ‘गाव माझं वेगळं’ असं अभिमानानं मिरविणाऱ्या या आगळ्यावेगळ्या गावांविषयी ‘हटके’ माहिती देणारी ही मालिका...

शाहूवाडी तालुक्‍यातील करुंगळे डोंगराळ भागात आहे. माळरानाचा शिवार अधिक आहे. त्यामुळे नाचणी येथील पारंपरिक पीक; मात्र गेल्या १० वर्षांत येथील शेतकरी रताळी पिकाकडे वळला आहे. नाचणी आणि उसापेक्षाही परवडणारे पीक म्हणून आता घरोघरी रताळ्यांचे उत्पादन घेतले जात आहे. या गावात सुमारे २०० हेक्‍टर क्षेत्रात रताळी पीक घेतले जात आहे.

पावसाळ्याच्या तीन ते चार महिन्यांच्या अल्पकाळात, कमी खर्चात आणि थोड्याशा मशागतीत पैसे मिळवून देणारे हुकमी पीक म्हणून शाहूवाडी तालुक्‍यात सध्या रताळी पिकाचे उत्पादन वाढू लागले आहे. तालुक्‍याच्या कडवी खोरा पट्ट्यातील करुंगळे, कडवे, पेरीड, येलूर, वालूर, वारुळ, निळे, आळतूर, कोपार्डे आदी गावांतील शेतकरी रताळीचे अधिक उत्पादन घेऊ लागले आहेत. वाड्यावस्त्यांचे करुंगळे गाव रताळी उत्पादनात अग्रेसर आहे. येथे घराघरांत रताळ्यांचे उत्पादन घेतले जाते. गणेशोत्सव, दसरा ते तुळशी विवाहापर्यंत मुंबई, वाशी, पुणे व कोल्हापूर बाजारपेठांमध्ये रताळ्यांना मोठी मागणी असते. सुमारे सहा कोटींपर्यंतची उलाढाल त्यातून होते. 

साडेतीन ते चार महिन्यांत पीक काढणीला येते. गणेशोत्सवादरम्यान काढणीला सुरवात होते. दसऱ्यात रताळी काढणीचा खरा हंगाम असतो. बाजारपेठांतील काही व्यापारी थेट बांधावर येऊन रताळी खरेदी करतात. या भागात ते तळ ठोकूनच असतात. ट्रॅक्‍टर किंवा बैलांच्या नांगरटीने रताळी काढणी होते. काढलेली रताळी नदी, ओढा किंवा खाणीतील पाण्यात स्वच्छ धुतली जातात. धुतलेल्या रताळ्यांना अधिक दर मिळतो. गणेशोत्सव, दसरा व तुळशी विवाहापर्यंत मुंबई, पुणे, वाशी, सातारा येथील एजंट या भागात तळ ठोकून असतात. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रताळी खरेदी करतात. या वर्षी सुरवातीला ३६ रुपये, तर त्यानंतर सरासरी २० रुपये प्रती किलो असा दर मिळाला.

उत्पादन खर्च कमी असल्यामुळे रताळी पीक परवडणारे आहे. मलकापूर येथे रताळी खरेदीसाठी बाजारपेठ व्हावी. सेंद्रिय खताचा वापर आम्ही करतो. त्यामुळे आमच्या गावची रताळी अधिक चविष्ट आहेत.
माधव कळंत्रे,
सरपंच करुंगळे.

लागवड पद्धत
रताळी पिकासाठी बी नसते. ज्या शेतात रताळी केलेली असतात, त्याच शेतात काढणीनंतर तुटलेली रताळी, वेल राहतात. ते मातीत रुजतात व उगवतात. शेतकरी उगवलेले कोंब वेचतात. त्यापासून पुन्हा लागवड करण्यासाठी वेल तयार करतात.

गेल्या दहा वर्षांत रताळ्यांना मुंबई, पुणे येथून मागणी वाढली आहे. पट्टीही रोख मिळते. उत्पादन खर्च कमी आहे. त्यामुळे गावात घरोघरी रताळी पीक घेतले जाते.
-यशवंत वारंग, 

उत्पादक शेतकरी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Specialty of Village Karungale sweet potato growing village