#Specialtyofvillage कांद्यामुळे सौंदलग्याला गवसली विकासाची वाट

डी. एन. बन्ने
Thursday, 1 November 2018

कोल्हापूर, सांगली, बेळगाव आणि काेकणात वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपणारी आणि आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अनेक गावे आहेत. अख्ख्या जगात ‘गाव माझं वेगळं’ असं अभिमानानं मिरविणाऱ्या या आगळ्यावेगळ्या गावांविषयी ‘हटके’ माहिती देणारी ही मालिका...

सौंदलगा (निपाणी) येथील शेतकरी कांदा हे मुख्य पीक घेतात. येथे कांदा बियाणे तयार करण्यापासून कांद्याच्या उत्पादनापर्यंतची सर्व कामे मोठ्या प्रमाणात होतात. गावच्या १० हजार ८९५ एकर शेतीपैकी दरवर्षी सुमारे आठ हजार ३४५ एकरांत कांद्याचे पीक घेतले जाते. दरवर्षी शेतकरी सुमारे १०० पेक्षा अधिक ट्रक कांदा उत्पादन करतात. कांदा प्रामुख्याने बंगळूरमधील यशवंतपूर बाजारपेठेला पाठविला जातो.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सौंदलगा येथील नागरिकांचा शेती मुख्य व्यवसाय आहे. गावाला वेदगंगा नदी लाभल्याने शेती सुपीक आहे. शेतकरी कांदा मुख्य पीक घेत आहेत. येथे गारवा जातीच्या कांद्याचे बियाणे तयार करण्यापासून उत्पादनापर्यंतची सर्व कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. उसाबरोबरच कांदा आर्थिक स्थैर्य देणारे पीक असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात याकडे वळले आहेत. पीक हवामानावर अवलंबून असतानाही अनेकदा धोका पत्करून उत्पादन घेतले जाते. कांद्यासाठी ऑक्‍टोबर ते जानेवारीअखेर हंगाम चांगला असतो. पिकाला थंडीची आवश्‍यकता असते. या वातावरणातच कांद्याची चांगली भरणी होते.

 

अनेक शेतकरी गैरहंगामी असलेल्या सप्टेंबरमध्येही कांद्याची लागवड करतात. त्यामुळे हा कांदा प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये अशा चढ्या दराने स्थानिक बाजारपेठेसह बंगळूरमध्ये विकला जातो. परिणामी शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. कांद्यामुळे उसाचे उत्पादनही घटले आहे. बऱ्याचदा उत्पादन वाढल्यास दर उतरून शेतकऱ्यांना तोटाही सहन करावा लागतो. त्यासाठी शासनाने या पिकाला हमीभाव देण्याची गरज शेतकरी व्यक्त करत आहेत. 

५० वर्षांपूर्वी सुरवात 
सौंदलगा येथे कांदा पिकाची सुरवात सन १९६७ मध्ये झाली. त्याला आता ५० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. गावात सर्वप्रथम सुबराव माधवराव कुलकर्णी (तात्या) यांनी कांद्याचे पीक घेतले. तेव्हापासून येथील कांदा व बियाण्याला कर्नाटक-महाराष्ट्रात चांगली मागणी आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या विकासाला चालना मिळाली आहे. 

खर्च 
कांदा लावणीसाठी एकरी चार ते पाच हजारांचा खर्च येतो. खते, औषधे, मजुरांचा खर्च वेगळा आहे. पिकाच्या काढणीनंतर त्यासाठी लागणारे बारदान (पोती) आणून त्यामध्ये कांदा भरला जातो. यशवंतपूर बाजारपेठेला कांदा पाठविताना १० टनांस १६ हजारांचे भाडे शेतकऱ्यांना द्यावे लागते. 

कांद्यामुळे गावाचा लौकिक 
कांदा दरातील चढ-उतारामुळे बऱ्याचदा नफ्या-तोट्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. या भागात अपवाद वगळता गैरहंगामी कांदा यशस्वी होत नाही. सप्टेंबरमध्ये घेतलेल्या कांद्यास दर चांगला मिळत असला, तरी उत्पादन मात्र कमी होते. बंगळूरसह बेळगाव, हुबळी, दावणगेरी, कोल्हापूर, सांगली बाजारपेठांतही चांगली मागणी आहे. 

एकरी १५० क्विंटलपर्यंत उत्पादन 
दरवर्षी एकरी १२५ ते १५० क्विंटल उत्पादन निघते. पोषक हवामान लाभल्यास त्यात वाढ होऊन शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. त्यासाठी एकरी २५ ते ३० हजारांचा खर्च येतो. 

१९६७ पूर्वी आसपासच्या तीन जिल्ह्यांत पांढरा कांदाच अल्प प्रमाणात उत्पादित होत असे. गारवा कांद्याचे पीक पांढऱ्या कांद्याहून दीडपट येते. जादा ठोक दराच्या अनुभवामुळे गारवा कांदा लावण्यासाठी मी शेतकऱ्यांना प्रवृत्त करत आहे. एकरी १० हजार किलोहून जास्त कांदा निघाल्यास तरुचे पैसे आम्हास देण्याची अट, आमच्या देखरेखीसह खत व तरु पुरवून कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्लॉट केले. त्याद्वारे बियाण्यांचा व रोपांचा प्रसार केला. त्यास अद्यापही चांगला प्रतिसाद आहे. 
-सुबराव माधव कुलकर्णी,
कांदा पीक प्रवर्तक 

प्रामुख्याने इतर पिकांच्या तुलनेत आर्थिक स्थैर्य देणारे पीक म्हणून शेतकरी कांदा पिकाकडे वळला. पूर्वी पारंपरिक पद्धतीने कांदा लागवड व्हायची. आता आधुनिक पद्धतीचा वापर करून प्रत व उत्पादनवाढीसाठी प्रयत्न होत आहेत. येथील कांद्याची प्रत इतरांपेक्षा चांगली असल्यामुळे बंगळूर बाजारपेठेत मोठी मागणी आहे. 
- रघुनाथ चौगुले,
माजी तालुका पंचायत सदस्य

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Specialty of Village onion growing village Soundalga