पालक, माठ, चाकवताने शेती केली सोपी

पालक, माठ, चाकवताने शेती केली सोपी

सांगली जिल्ह्यात सांगली तासगाव राज्यमार्गावर वसलेले कवलापूर हे गाजरांसाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. भाजीपाला पिकांसाठीही गावाने ओळख तयार केली आहे. ऊस, द्राक्ष हीदेखील गावची पिके आहेत. गावातील (जखीणमळा) येथे राजेंद्र पुंडलिक माळी, महादेव बाळू माळी आदी भाजीपाला उत्पादक राहतात. या कुटुंबाचा मोठा परिवारच आहे. कुटुंबातील वाडवडिलांनी कष्ट करून या भागात सुमारे २५ एकर शेती खरेदी केली. अनेक वर्षांपासून त्यांनी भाजीपाला लागवडीत सातत्य व चिकाटी ठेवली आहे. ती अशा अर्थाने की शेती बदलत गेली. आव्हानं वाढली. तरी प्रत्येक कुटुंब किमान १० गुंठ्यांत भाजीपाला घेताना दिसतो आहे. कुटुंब विस्तारले तरी प्रत्येक घरातील चार पिढ्या भाजीपाल्याच्या शेतीला जोडले गेले आहेत. 

भाजीपाला उत्पादकांचे अनुभव 
भाजीपाला हाच पर्याय

शेतकऱ्यांच्याच शब्दात सांगायचे तर जखीणमळ्यात पाणी सवळ म्हणजे क्षारयुक्त आहे. यामुळे दुसरे पीक वटत नाही. दावणीला जनावरं असल्याने चाऱ्यासाठी किमान पाच एकरांवर वैरण असते. यामुळे घरच्या घरीच चारा उपलब्ध होतो. जमिनीची स्थिती पाहाता भाजीपाला हाच मुख्य पर्याय असतो.  

घरातील सदस्यांचे कष्ट 
भाजीपाला म्हटलं की वेळेत काढणी आली. तरच बाजारपेठेत चांगला दर मिळतो. या कामांसाठी मजुरांची आवश्यकता असते. मात्र घरातील सर्व सदस्य राबून कामे वेळेत करतातच. शिवाय मजुरी खर्चात बचत करतात अस सौ. शोभा माळी सांगतात. 

मार्केटचा अभ्यास महत्त्वाचा 
 ऋषिकेश माळी म्हणाले, की मी शेती विषयातील शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष शेतात राबण्यातून प्रात्यक्षिकाचाही आनंद मिळतो. विक्रीचीही जबाबदारी सांभाळतो. दर सातत्याने बदलत असल्याने सांगली येथील शिवाजी मंडईत दररोज सकाळी जावेच लागते. मंडईत गेल्याने कोणत्या भाजीला किती मागणी आहे, दर काय आहेत याचा पूर्ण अंदाज येतो. त्यानुसार त्या भाजीची निवड केली जाते. म्हणूनच अपेक्षित दर मिळण्यास मदत होते. भाजीपाल्यासाठी एक एकर क्षेत्र ठेवतो. यात टप्प्याटप्प्याने पालक, चाकवत आदींचा समावेश असतो.

लागवडीचे नियोजन
पावसाळा, हिवाळी हंगाम- पालक, चाकवत 
उन्हाळी हंगाम- चाकवत, तांबडा व हिरवा माठ 
वाफ्यात लागवड 
माठाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिली कापणी ३० दिवसांत येते. त्यानंतर प्रत्येक कापणी १५ दिवसांनी केली जाते. एकूण साधारण चार कापण्या होतात.  
पालक, चाकवत या भाज्या ३० दिवसांत काढणीस येतात. त्यानंतर दुसऱ्या वाफ्यांमध्ये पुढील लागवड होते.  
हंगाम संपल्यानंतर दोन महिने रानाला विश्रांती दिली जाते 
 विक्रीचे नियोजन 
गरजेनुसार शंभर पेंड्यांचा गठ्ठा तयार केला जातो. 
सौद्यासाठी भाजीपाला न ठेवता सांगली शहरातील शिवाजी मंडईत किरकोळ व्यापाऱ्यांस विक्री 
काहीवेळा किरकोळ व्यापारी जागेवर खरेदीसाठी येतात. 
अन्य जिल्ह्यांतून व्यापाऱ्यांकडून भाडेशुल्क वजा करून होते खरेदी 
पाल्याची करतात लागवड 
उन्हाळ्यात दररोज सर्व प्रकारचा भाजीपाला ७ हजार ते ८ हजार पेंड्यांंपर्यंत विक्रीसाठी 
पालक, चाकवत- २५०० पेंड्या 

बाजारपेठ 
सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, कऱ्हाड, इस्लामपूर (स्थानिक व तुलनेने जवळची शहरे)
पालक, चाकवत- सांगली- शिवाजी मंडई 

दहा गुंठ्यांतील अर्थशास्त्र 
टप्प्याटप्प्याने लागवड 
मशागतीपासून ते काढणीपर्यंत सुमारे पाच हजार रुपये.  
पाच हजार पेंड्यांचे उत्पादन 
सरासरी दर- ३०० ते ३५० रुपये प्रतिशेकडा 
खर्च जाता ९ ते १० हजार रुपये नफा 

भाजीपाला म्हणजे दररोज ताजे उत्पन्न देणारे पीक आहे. माझ्याकडे लागवडीची जबाबदारी असते. मुलगा गणेश विक्री व्यवस्था पाहतो. त्यामुळे दोन्ही बाजूंवर चांगले लक्ष ठेवता येते. एकाच पिकात सातत्य ठेवले की त्याचा फायदा होतो याचा अनुभव घेतला आहे. भाजीपाला हा नाशवंत माल आहे. धोका पत्करल्याशिवाय त्याची शेतीच होत नाही.  
 महादेव बाळू माळी, ९९७५३४५५३३

आमची तिसरी पिढी भाजीपाला शेतीत आहे. अपेक्षित दर न मिळाल्यास नुकसानही सोसले. भाजी मोफत देण्याची वेळ आली. पण लागवड कधीच थांबविली नाही. या शेतीतून सात जणांच्या कुटुंबाचा प्रपंच चालू शकतो इतकी रक्कम निश्‍चित मिळते. दररोज ताजा पैसा हाती येतो. आता शिल्लक रक्कम हाती ठेवत त्यातून जमिनीची खरेदीदेखील शक्य केली आहे.
 राजेंद्र पुंडलिक माळी, ९८२२४४९५६९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com