`एसआरटी’ तंत्रज्ञानाने वाढले उत्पादन

एसआरटी तंत्रज्ञानांतर्गत कमी बियाणे वापरून लावलेल्या भाताची दर्जेदार वाढ झाली.  चंद्रशेखर भडसावळे, इतर तज्ज्ञ व शेतकऱ्यांनी भेट दिली.
एसआरटी तंत्रज्ञानांतर्गत कमी बियाणे वापरून लावलेल्या भाताची दर्जेदार वाढ झाली. चंद्रशेखर भडसावळे, इतर तज्ज्ञ व शेतकऱ्यांनी भेट दिली.

पुणे जिल्ह्यातील कासारी येथील बबूशा होले-पाटील तीन वर्षांपासून सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) पद्धतीने शेती करीत आहेत. त्यातून एकरी उत्पादन दुपटीने वाढवलेच. शिवाय विना नांगरणी तंत्राद्वारे जुन्या गादीवाफ्यावरच गहू, भुईमूग, ज्वारीसह कांदा, पालेभाज्या यांचीही शेती फायदेशीर करणे त्यांना शक्य झाली आहे.

पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर (खेड) तालुक्याच्या पश्चिम मावळ पट्ट्यातील कासारी गावात पावसाच्या पाण्यावर भातशेती तर रब्बीत कोरडवाहू ज्वारी घेतली जायची. पारंपरिक शेतीला पशुपालनाची जोड होती. जनावरे जवळच्या डोंगर माळरानावर चरायची. त्यातून घरी वापरासाठी दूध मिळायचे. भामा असखेड धरण प्रकल्पानंतर सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली. शेतीचे रूप पालटू लागले. बटाटा, कांदा आदी पिके घेतली जाऊ लागली. 

एसआरटी तंत्राचा वापर 
कासारी येथील बबूशा होले-पाटील यांची पाच एकर शेती आहे. पारंपरिक पद्धतीने ते भातशेती करायचे. येथील कृषी सहायक प्रवीण शिंदे यांनी पीकपद्धत व सुधारित तंत्र पाटील व परिसरातील शेतकऱ्यांना देण्यासाठी पुढाकार घेतला. सगुणा राइस टेक्नॉलॉजी (एसआरटी) हे त्यातील महत्त्वाचे तंत्र होते. मालेगाव- नेरळ (जि. रायगड) येथील प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे आणि योगेश बनसोडे यांचे मार्गदर्शन त्यासाठी लाभले. पाटील यांनी या तंत्राचा वापर सुरू केला. त्यात तीन वर्षांपासून सातत्य ठेवले आहे. 

चाऱ्यासाठी ज्वारी 
गव्हानंतर जनावरांसाठी ज्वारी घेतली जाते. त्यातही एसआरटी व पारंपारिक पद्धतीचा वापर होतो. त्यासाठी एकरी अनुक्रमे १० किलो व २५ किलो बियाणे लागले. यंदा १२ ते १४ क्विंटल उत्पादनाची पाटील यांना आशा आहे. प्रयोगासाठी हे क्षेत्र ठेवले नसते तर एकरभर क्षेत्रातून १७ पोती ज्वारी नक्की झाली असती असे पाटील यांनी सांगितले. कापणीनंतर पुन्हा फुटवे येऊन चांगली कणसे आली आहेत. एक एकरात संकरित गवत व गरजेनुसार मका लागवडही होते. 

सुधारित पाभर बनविली  
पूर्वी एका चाड्याची पाभर वापरली जायची. कृषी अधिकाऱ्यांनी पुस्तकात दोन चाड्याची पाभर दाखविली. ती पाहून पाटील यांनी लाकडापासून दोन चाड्याची लाकडी पाभर बनविली. त्यामुळे बियाणे व खत एकाचवेळी पेरता येऊ लागले. पिकासाठीच खत वापरले गेल्याने उर्वरित शेतात तण कमी झाले. खताच्या योग्य मात्रेमुळे पिकाची चांगली वाढ होऊन उत्पादनाला फायदा झाला. 

पाण्याची सुविधा 
भामा असखेड धरणातून पाण्याची सोय झाली असली तरी १२५ फूट लांब, ८० फूट रुंद शेततळे उभारले  आहे. एक दिवसाआड वीज उपलब्ध होते. वीज असताना एक किलोमीटर अंतरावरील धरणातून शेततळ्यात पाणी साठविण्यात येते. वीजपुरवठा नसताना उंचावर असलेल्या या शेततळ्यातून नैसर्गिक दाबाने पाच एकर शेतीला आणि गोठ्यातील जनावरांना १५ ते २० दिवस २४ तास पाणी उपलब्ध होते.

तंत्राचे झालेले फायदे
पारंपरिक पद्धतीत एकरी चाळीस किलो भात बियाणे लागायचे. 
एसआरटी पद्धतीत ते एकरी अवघे १२ ते १५ किलोपर्यंत लागले. 
पूर्वी एकरी २० पोत्यांपर्यंत (प्रती ४० ते ४५ किलोचे) उत्पादन मिळायचे.
आता ते ३०, ३५ व कमाल ४० पोत्यांपर्यंत पोचले आहे. 
भातकाढणीनंतर त्याच गादीवाफ्यावर गहू घेतला. दहा किलो बियाणे लागले. आता एकरी १५ ते १७ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. 
भुईमुगाचे दहा किलो बियाण्यात ६ क्विंटल उत्पादन मिळाले. 
पूर्वी खर्च भागेल एवढेच उत्पादन मिळायचे. आता खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ झालीच. शिवाय जमिनीचा पोत सुधारून ती भुसभुशीत झाली आहे. रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने त्यासाठीच्या खर्चात ८० टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे.

विना नांगरणी शेती
पाटील यांनी तीन वर्षांपासून एसआरटी तंत्राच्या वापरात सातत्य ठेवले आहे. या तीन वर्षांत शेतात एकदाही नांगर घातलेला नाही. भातासाठी केलेल्या ‘बेड’वरच अन्य पिकांची लागवड केली जाते. पीक कापणीनंतर बेडवर शिल्लक राहिलेले पीक अवशेष तेथेच कुजवण्यात येतात. जमिनीत सेंद्रीय कर्ब तयार होतो. नैसर्गिक पद्धतीने गांडूळांची वाढ होते. जमीन भुसभुशीत राहात असल्याने नांगरणीची आवश्यकता भासत नाही. तणनियंत्रणासाठी मात्र तणनाशक वापरले जाते. त्यामुळे नांगरणी, चिखलणी, लावणी, खुरपणी असा खर्च वाचला आहे.

पशुपालनाचा आधार
गोठ्यात सहा गायी व सात म्हशी आहेत. गायीचे दररोज ७० लिटर तर म्हशीचे ६० लिटर दूध मिळते. दुग्धव्यवसायातून महिन्याला १५ ते १७ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. घरचे मनुष्यबळ आणि चारा असल्याने दुग्धव्यवसातील खर्चात बचत झाली आहे. पाच देशी बैल व घोडीदेखील आहे.

शॉवरची सोय
उन्हाळ्यात म्हशींना थंडावा मिळावा यासाठी सुरवातीला गोठ्यात म्हशी बांधण्यात येत असलेल्या जागी खाली कोबा आणि बाजूने भिंती घातल्या. त्यात दीड फूट पाणी साठविण्याची सुविधा करण्यात आली. दुपारच्या वेळी या भागात पाणी साठवणूक केली जायची. या पाण्यात म्हशी बसून घ्यायच्या. दुपारनंतर हे पाणी काढून देऊन गोठा रिकामा केला जायचा. मात्र म्हशीचे मूत्र आणि शेण पाण्यात मिसळायचे.  आता गोठ्याच्या छताला लागून पाईप लावून शॉवरची सोय करण्यात आली आहे. तळ्यातील नैसर्गिक दाबाने मिळणाऱ्या पाण्याच्या मदतीने गरजेच्या वेळी विजेच्या वापराशिवाय शॉवर चालविण्यात येतात. या पाण्यामुळे गोठा साफ राहतो. माश्‍यांचा त्रासही कमी झाला आहे.

- बबुशा धोंडीबा होले-पाटील, ९५५२६४४३०५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com