राज्यातील धरणांमध्ये ५९ टक्के पाणीसाठा

गिरणा धरण, ता. नांदगाव - जळगाव जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या गिरणा धरणाचा साठा वाढत आहे. धरणाची पाणीपातळी मंगळवारी (ता. २१) ३९ टक्क्यांवर आली होती.
गिरणा धरण, ता. नांदगाव - जळगाव जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या गिरणा धरणाचा साठा वाढत आहे. धरणाची पाणीपातळी मंगळवारी (ता. २१) ३९ टक्क्यांवर आली होती.

पुणे - सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह, मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोटामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे कोकण, पुणे, नाशिक विभागातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मंगळवार (ता.२१) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान ३ हजार २६४ प्रकल्पांमध्ये ८५३.१० टीएमसी (५९ टक्के) पाणीसाठा झाला आहे. पुणे व कोकण विभागात समाधानकारक चांगला पाणीसाठा झाला आहे. मात्र, मराठवाड्यातील पाणी स्थिती अत्यंत चिंताजनक असून, जायकवाडी वगळता उवर्रीत धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे, तर विदर्भाताही यंदा अपुरा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले.  

मॉन्सूनच्या पावसाचे दणक्यात आगमन झाल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मराठवाडा, खानदेशाबरोबरच, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर जिल्‍ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी कायम होती. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाने या जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ झाली. तर मराठवाड्यातील बहुतांशी धरणे मात्र तळाशी असल्याचे चित्र होते. मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दणक्यात हजेरी लावल्याने धरणे भरली. नाशिक, नगरमधील नद्यांमुळे जायकवाडीच्या तर पुणे जिल्ह्यातील नद्यांमुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. काेयना धरण ‘फुल्ल’ झाल्याने पाणी सोडण्यात येत आहे. 

मराठवाड्यात २२ टक्के पाणीसाठा
पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असून, सर्व प्रकल्पामंध्ये मिळून ५८.०४ टीएमसी म्हणजेच अवघा २२ टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाने दमदार हजेरी लावल्याने प्रमुख धरणे भरली. या धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हळूहळू वाढत आहे. धरणात अचल आणि उपयुक्त पाणीसाठा मिळून ५१.४० टीएमसी (५० टक्के) पाणीसाठा झाला आहे. मात्र माजलगाव, मांजरा (बीड) निम्न तेरणा, येलदरी ही मुख्य धरणे अद्यापही समाधानकारक पातळीत नाहीत. मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ३८.३४ टीएमसी (२४ टक्के), मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ८.३० टीएमसी (२२ टक्के) आणि लहान ८३८ प्रकल्पांमध्ये ११.४० टीएमसी (३३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

पुणे विभागातील धरणे फुल्ल
पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर धो-धो कोसळलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत अाहेत. यामुळे कोयनेसह जवळपास सर्वच प्रमुख धरणे फुल्ल झाल्याने यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. उन्हाळ्यात अचल पातळीत गेलेल्या उजनी धरणांत मंगळवारी चल व अचल पाणीसाठा मिळून ९७.२७ टीएमसी (८३ टक्के), तर कोयना धरणातही १०१.३६ (९६ टक्के) एकूण पाणीसाठा झाला आहे. विभागातील सर्व ७२५ धरणांमध्ये मिळून सध्या ४३२.६२ टीएमसी (८१ टक्के) पाणीसाठा आहे. ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३९३.०८ टीएमसी (८९ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये २६.८० टीएमसी (५६ टक्के) आणि लहान ६४० प्रकल्पांमध्ये १२.७८ टीएमसी (२६ टक्के) पाणीसाठा झाला आहे. 

नाशिक विभागात निम्मा पाणीसाठा
नाशिक विभागातील धरणांच्या पाणलोटात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांत पाऊस वाढल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली. चांगला पाणीसाठा झाल्याने गंगापूर, दारणा, भंडारदरा, निळंवडे धरणासह अनेक लहान-मोठ्या धरणातून पाणी साेडण्यात आले आहे. मात्र नाशिक विभागात यंदा निम्मा पाणीसाठा असून, लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण ५७० प्रकल्पांमध्ये ११४.३२ टीएमसी (५५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मोठ्या २३ प्रकल्पांमध्ये ८५.५४ टीएमसी (६६ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये १६.०९ टीएमसी (३८ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये १२.६४ टीएमसी (३३ टक्के) पाणी आहे. 

कोकणात यंदा ९० टक्के पाणीसाठा
कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाने धुमशान घातले असून, सह्याद्रीच्या पश्‍चिम उतारावरून वाहणाऱ्या दुधडी भरून वाहत आहेत. या नद्यांमुळे कोकणातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. कोकणात यंदा ९० टक्के पाणीसाठा असल्याचे दिसून आले आहे. मुबंईसह शहरी भागाला पाणीपुरवठा करणारे सर्वच प्रकल्प आेसंडून वाहिले आहेत. ठाण्यातील भातसा, पालघरमधील कवडास, धामनी, सिंधुदुर्गमधील तिल्लारी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. कोकणातील सर्व १६२ धरणांमध्ये मिळून १११.९९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पामध्ये मिळून ८०.४२ टीएमसी (९३ टक्के), ७ मध्यम प्रकल्पामध्ये १५.५० टीएमसी (९० टक्के) तर १५८ लघु प्रकल्पात १६.०६ टीएमसी (८१ टक्के) पाणीसाठा आहे.

विदर्भात ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा
विदर्भात यंदा गतवर्षीपेक्षा चांगला पाऊस असला तरी धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागात यंदा पन्नास टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे. पूर्व विदर्भातीलगोसी खुर्द, इटियाडोह, कामठी खैरी, तातेलाडोह अजूनही पुरेसा पाणीसाठा झाला नाही. तर पश्‍चिम विदर्भातील काटेपुर्णा, ऊर्ध्ववर्धा, इसापूरसह अनेक धरणात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. नागपूर विभागातील सर्व धरणांमध्ये मिळून ६८.२८ टीएमसी (४२ टक्के), तर पश्‍चिम विदर्भातील अमरावती विभागात ६७.८६ टीएमसी (४६ टक्के) पाणी उपलब्ध झाले आहे. पूर्व विदर्भातील १६ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४५.०२ टीएमसी (३७ टक्के) तर अमरावती विभागातील मोठ्या १० प्रकल्पात ४४.५५ टीएमसी (५१ टक्के) पाणी असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात अाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com