मावळच्या भातपट्ट्यात फुलली स्ट्रॉबेरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

स्ट्रॉबेरी म्हटलं, की महाबळेश्‍वर, पाचगणी हे समीकरण अलीकडे बदलत आहे. राज्याच्या अन्य भागांतील शेतकरीही काळाच्या गरजेनुसार स्ट्रॉबेरीचा प्रयोग करीत आहेत. मूळ मावळ (जि. पुणे) तालुक्यातील ढालेवाडीचे मात्र सध्या पनवेल येथील व्यावसायिक विनोद साबळे यांनी दीड एकरांत स्ट्रॉबेरी हे परिसरासाठी वेगळे पीक घेण्याचे धाडस केले आहे. सध्या त्यांच्या शेतात फुलत असलेली लालचुटूक दर्जेदार स्ट्रॉबेरी व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही भुरळ घालू लागली आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पूर्णपणे भाताचा पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील लोहगड, विसापूर, तिकोना या किल्ल्यांच्या सान्निध्यात व डोंगर रांगामध्ये ढालेवाडी गाव वसले आहे. पवना धरणामुळे जवळच्या पवनानगर परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. पनवेल येथे राहणारे अर्थमूव्हर्स आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक विनोद सदाशिव साबळे यांचे हेच मूळ गाव आहे. त्यांची स्वतःची शेती नाही. पण, शेतीची आवड जोपासलेले साबळे यांनी आपल्या काकांची सात एकर जमीन येथे भाडेतत्त्वावर घेतली आहे. 

स्ट्रॉबेरीचा पर्याय शोधला  
जमीन विकसित करताना खडकाळ आणि मातीचे प्रमाण कमी असलेल्या जमिनीत कोणती पिके घेता येतील, याची चाचपणी सुरू केली. जमिनाचा प्रकार, माती व पाणी परीक्षणानंतर अनेकांनी पाॅलिहाऊस उभारण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यासाठी मोठा खर्च लागणार होता. साबळे वेगवेगळ्या पिकांचे पर्याय शोधत होते. अशातच एका व्यावसायिक पीक सल्लागार व्यक्तीला त्यांनी स्ट्रॉबेरी आपल्या भागात येऊ शकेल का, असे विचारले? दोघांमघ्ये अभ्यासपूर्ण चर्चा झाली. धाडस करून हे पीक करून पाहू असे ठरले. 

दीड एकरात लागवड
दीड एकर क्षेत्र त्यासाठी निश्‍चित केल्यानंतर जमिनीचा विकास करणे सुरू झाले. खडकाळ जमिनीतील  मोठे दगड-गोटे वेचून काढले. सेंद्रिय खतांचा वापर करून मशागत केली. नोव्हेंबरमध्ये तीन फुटी बेड तयार करून ठिबकच्या दोन लाइन्स टाकल्यानंतर मल्चिंग पेपर अंथरण्यात आला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुमारे २३ हजार झाडांची लागवड तीन टप्प्यांत केली. जूनपर्यंत उत्पादन सुरू राहील. त्यानंतर त्या मल्चिंगवर कृषी विद्यापीठाच्या फुले समृद्धी भाताच्या लागवडीचे नियोजन आहे. 

तीन वाणांची लागवड
दीड एकरांत आर २, नाबेला, कॅमेरोझा या तीन  वाणांची लागवड आहे. उन्हाळ्यातील तापमान सहन करण्याची त्यांची क्षमता असल्याचे सांगितले जाते. 

आर २ वाणाच्या फळाचा आकार मोठा असून, चवीला आंबटगोड आहे. उर्वरित दोन वाणांची फळे आकाराने लहान असली, तरी चवीला गोड आहेत. सेंद्रिय पद्धतीवर भर दिल्याने या दोन्ही वाणाच्या फळांचा आकार वाढला आहे. 

चव चाखा, खरेदी करा
धाडस व तांत्रिक मार्गदर्शन घेऊन केलेली मेहनत फळास येऊ लागली आहे. पहिल्या तोड्याला पाचशे ते सहाशे किलोपर्यंत स्टॉबेरी मिळाली. साबळे यांनी आपल्या शेतात कृषी पर्यटन केंद्रही उभारण्यास सुरुवात केली आहे. काही पर्यटकांचे येणे-जाणे सुरूही झाले आहे. पुणे, मुंबईतील लोकांनी शेतात यावे, स्ट्रॉबेरीची सेंद्रिय शेती पाहावी, चव चाखावी आणि खरेदी करावी, हे सूत्र ठेवले आहे. 

व्यापाऱ्यांना नमुने दिले 
लोणावळा, तळेगाव भागातील व्यापाऱ्यांना स्ट्रॉबेरीचे नमुने मोफत दिले. मुंबईतील पनवेल, नेरळ आदी भागातील निवासी सोसायट्यांमधील ग्राहकांनादेखील हे नमुने चवीसाठी दिले. व्यापारी व ग्राहक अशा दोघांच्याही पसंतीस स्ट्रॉबेरी उतरल्याने ‘रिपीट ऑर्डर्स’ मिळत आहेत. सध्या दाेनशे ग्रॅम पनेटसाठी प्रतवारीनुसार ७५ रुपयांप्रमाणे दर आहे. थेट शेतावर ग्राहकांना २५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. स्ट्रॉबेरीची फळे सुकवून विक्रीचाही प्रयोग केला आहे. 

अन्य नव्या पिकांचे प्रयोग
पावसाच्या प्रदेशात दोन एकरांत थायी पेरू, दीडशे थायी लिंबू व दीडशे थायी ॲपल बेर यांची झाडे लावली आहेत. तीन एकरांत उन्हाळी कलिंगडाचे नियोजन आहे. आणखी एकर क्षेत्र भाडेतत्त्वावर घेतले असून, तेथेही रसायनिक अंशमुक्त भाजीपाला उत्पादनाचे नियोजन आहे.

कृषी पर्यटन 
पर्यटकांसाठी लोहगड कृषी पर्यटन आणि नॅचरोपॅथी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. यात निवास,  भोजनाची व्यवस्था, शिवार फेरी, सेंद्रिय पीक उत्पादन पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  
 : विनोद साबळे, ८६८९८३१११२

स्ट्रॉबेरीचे सध्याचे मार्केट 
स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरसह सातारा जिल्ह्याचे हुकमी पीक आहे. या भागात सुमारे ३५०० एकरांवर स्ट्रॅाबेरी लागवड केली जात आहे. महाबळेश्वर तालुक्यात या पिकात अनेक नव्या तंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे भांडवली खर्च कमी होण्याबरोबरच उत्पादनात वाढ होऊ लागली आहे. या तालुक्यात जवळपास दीडशेच्या वर पॅालिहाउसेस आहेत. त्यामध्ये स्ट्रॉबेरीच्या मातृवृक्षापासून रोप निर्मिती केली जाते. मातीविना शेतीचा अवलंब केला जात असल्याने रोपे दर्जेदार उपलब्ध होतात. काही शेतकऱ्यांकडून कमी क्षेत्रात जास्त उत्पादनासाठी व्हर्टीग्रो पद्धतीनेही स्ट्रॅाबेरी लागवडीचे प्रयोग झाले आहेत. या प्रयोगातून दहा गुंठे क्षेत्रांत मिळणारे उत्पादन दोन गुंठे क्षेत्रांतून मिळते. 

प्रीकूलिंग तंत्राचा वापर 
स्ट्रॅाबेरीचे आयुष्यमान अवघे दोन दिवस असल्याने लगेच विक्री करणे क्रमप्राप्त असते. त्या दृष्टीने दूरच्या बाजारपेठेत स्ट्रॅाबेरी पाठवण्यासाठी चार प्रीकूलिंग युनिटस सुरू करण्यात आले आहेत. यामुळे स्ट्रॅाबेरीचे आय़ुष्यमान चार दिवसांनी वाढले आहे. यातून दरही वाढण्यास मदत झाली आहे. सध्या महाबळेश्वर तालुक्यातून दिवसाकाठी सरासरी ७० टन स्ट्रॅाबेरी मार्केटमध्ये जात आहे. ताज्या स्ट्रॅाबेरीस ७० ते ८० रुपये, तर प्रक्रियेसाठी जाणाऱ्या स्ट्रॅाबेरीस प्रतिकिलो ३५ ते ४० रुपये दर मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. 
 : गणपत पार्टे, ९४२३०३३८०९ 
अध्यक्ष, श्रीराम फळप्रक्रिया सहकारी संस्था, 
भिलार, जि. सातारा

वन्य प्राण्यांपासून संरक्षण 
लोहगड आणि विसापूर परिसरात डोंगराळ भाग, दाट झाडी असल्याने रानडुक्कर, तरस आणि सशांचा उपद्रव हाेतो. रानडुकरांनी पेरूची झाडे पाडल्यानंतर बागेत पुढील दक्षता म्हणून एलईडी प्रकाशाचे झोत आणि आवाज करणारे धक्का यंत्र बसविले. तेच स्ट्रॉबेरीच्या शेतात बसविले आहे. बॅटरीच्या आकाराचे हे यंत्र आठ तास चार्जिंग केल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास शेतात ठेवले जाते. 

Web Title: Strawberry in Maval