देशातील साखर उत्पादन ७.४ टक्के घटण्याचा अंदाज

Sugarcane
Sugarcane

प्रमुख ऊस उत्पादक पट्ट्यात दुष्काळ आणि हुमणीच्या प्रादुर्भावामुळे यंदा देशातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या तुलनेत ७.४ टक्के घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातून होणाऱ्या साखरनिर्यातीत घट होण्याचा अंदाज आहे. परिणामी जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमतीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.

देशात एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या यंदाच्या गाळप हंगामात ३०० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे, असे वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले. यंदा ३२४ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज यापूर्वी वर्तवण्यात आला होता. गेल्या हंगामात ३२५ लाख टन साखर उत्पादन झाले होते.  ‘‘जवळपास सगळ्याच साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यंदा साखर उत्पदनात कपात होणार असल्याचे त्यांनी नोंदवले आहे, ‘‘ ठोंबरे म्हणाले.

दरम्यान, साखर उत्पादन व व्यापाराशी संबंधित इतर संस्थांनी यंदा साखर उत्पादन ३२० ते ३२४ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी यापूर्वी यंदा ३५५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता. 

‘आम्ही पिकाला वेळेवर पाणी दिलं, मागच्या वर्षीइतकेच खत टाकले. पण तरीही यंदा गेल्या सालापेक्षा उतारा ३० टक्के कमी आलाय,’’ ज्ञानेश्वर बागल या ऊस उत्पादक शेतकऱ्याने सांगितले. त्यांचा ऊस नुकताच तुटून कारखान्याला गेला आहे.

महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादक राज्य आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, यंदा राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत २३ टक्के कमी पाऊस झाला. तसेच यंदा राज्यात ऊस पिकाला हुमणीचा जोरदार फटका बसला. पाऊस कमी झाल्यामुळे हुमणीचा प्रसार झपाट्याने झाला, असे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. हुमणी उसाचा बुडखा खात असल्यामुळे पुढील वर्षी खोडवा उसाचे उत्पादनही कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेशातही यंदा उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचे, एका खासगी साखर कारखान्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. देशात साखरेचे सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशात होते. उत्तर प्रदेशात यंदा उसाचे प्रतिहेक्टरी उत्पादन घटण्याची चिन्हे असून उसातील साखरेचे प्रमाणही कमी राहील, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

देशात साखरेच्या उत्पादनात घट होण्याचे चित्र असल्यामुळे अनेक कारखान्यांनी साखरनिर्यातीच्या बाबतीत आस्ते कदम धोरण स्वीकारले आहे. साखरेचे दर गडगडल्यामुळे साखरेच्या निर्यातीला प्रोत्साहन देऊन साठा कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ५० लाख टन साखरनिर्यातीचे उद्दीष्ट ठरवून दिले होते. तसेच निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदानही जाहीर केले.   

‘गेल्या काही दिवसांत साखर कारखान्यांनी निर्यातीचे नवीन करार करण्याबद्दल फारशी उत्सुकता दाखवली नाही. स्थानिक बाजारपेठेत साखरेचे दर वधारतील अशी त्यांना आशा आहे,‘‘ असे मुंबई येथील एका साखर डिलरने सांगितले.

यंदाच्या गाळप हंगामात ३०० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. ३२४ लाख टन साखर उत्पादनाचा पूर्वीचा अंदाज होता. जवळपास सगळ्याच साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यंदा साखर उत्पदनात कपात होणार असल्याचे त्यांनी नोंदवले आहे.
- बी. बी. ठोंबरे,अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा)

यंदा देशातील साखर उत्पादन ३०० लाख टन राहण्याचा अंदाज.
आधीच्या अंदाजापेक्षा उत्पादन ७.४ टक्के घटण्याची शक्यता.
दुष्काळ आणि हुमणीचा फटका बसल्याचा परिणाम.
निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता.
आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारपेठेत दर वधारण्याची चिन्हे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com