कांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचत 

कांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचत 

संगमनेर येथून श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर १९७७ च्या दरम्यान अनिल सानप यांचे वडील सुखदेव सानप यांनी ट्रॅक्टर साहित्य व अवजारे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पुढे चारही मुलांमध्ये विभागणी वेळी हा व्यवसाय अनिल यांनी स्वीकारला. त्यात भर घालत सन २००६ मध्ये प्रयाग ॲग्रो वर्क्‍स या नावाने स्वतः शेती अवजारे तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. 

प्रारंभी बैलचलित नांगर, कल्टीवेटर, औत, तिफन अशा अवजारांनी सुरवात केली. पुढे दोन वर्षांतच ट्रॅक्‍टरचलित अवजारांच्या निर्मितीला सुरवात केली. औजारे तयार करण्याला सुरवात केली. पुढे या कामात त्यांचा मुलगा श्रीरामही मदतीला आला. त्यालाही यंत्रांमध्ये विशेष रुची असल्याने आयटीआय व नंतर काम मेकॅनिकल इंजिनिअरींग डिप्लोमा केला आहे. सानप हे कांदा बियाणे पेरणी यंत्र, नांगर (पलटी व ॲटो हायड्रोलिक), टॅक्‍टर व बैलचलित पेरणी यंत्र, ज्वारी, बाजरी बियाणे पेरणी यंत्र, कल्टीव्हेटर, सरी रोझर, डिक्‍स हॅरो, सरी सिझर, बैलचलित कोळपणी यंत्र, औत, पॉवर टीलर अशा विविध यंत्रांची निर्मिती व विक्री करत आहेत.

वाळूतील रेष ठरली प्रेरणा
श्रीरामपूर, संगमनेर, राहाता, राहुरी परिसरामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. यात मजुरांची समस्या जाणवत असल्याने नेहमीच्या पेरणी यंत्राच्या वापराचे प्रयोग सानप यांनी सुरू केले. मात्र, पेरणीमध्ये बियाणे अधिक खोलीवर पेरले जात असल्याने उगवणीची समस्या तीव्रतेने जाणवत होती. ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

एकदा भावाच्या घराच्या बांधकामासाठी आणलेल्या वाळूमध्ये गावातील शेतकरी पांडुरंग साबदे यांच्याशी चर्चा सुरू होती. त्या वेळी हातातील काठीने वाळूमध्ये रेष मारून साबदे यांनी एवढेच खोल बियाणे गेले  पाहिजे असे सांगितले. मात्र, फण तर अधिक खोल जातो. मग फण उलटा लावण्याची कल्पना त्यांनी सुचवली. त्याच प्रमाणे बियाणे वरच्या वर पडण्यासाठी ॲडजेस्टेबल पाइप लावण्याची कल्पनाही अशाच चर्चेतून पुढे आली. यंत्रातील त्रुटी भरून काढत २०१३ मध्ये कांदा बी पेरणी यंत्र विकसित केले. 

कांदा बियाणे पेरणी यंत्राचे फायदे 
स्वतंत्र शेत तयार करण्याची गरज नाही. यंत्राद्वारेच पेरणी होऊन शेतात सरी टाकता येते.
कांद्याची रोपे करून एकर क्षेत्राच्या पुनर्लागवडीसाठी साधारण दहा मजुरांना तीन दिवस लागतात. खर्च ८ ते १० हजार होतो. तुलनेमध्ये पेरणी यंत्राद्वारे पेरणीसाठी एक तास पुरेसा आहे. त्यासाठी ट्रॅक्टरच्या एचपी क्षमतेनुसार १.५ ते २.५ लिटर डिझेल लागते.
दोन बियातील अंतर (१ ते २ इंच), तसेच ओळीतील अंतर (६ ते ७ इंच) एकसमान मिळते. ते आवश्‍यकतेनुसार कमी अधिक करणे शक्य आहे.
या यंत्रामुळे बियाणांचे उगवणक्षमता ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत मिळते. रोपे तयार करून पुनर्लागवड पद्धतीमध्ये एकरी ३ किलोपर्यंत बियाणे लागते. या यंत्राद्वारे पेरणी करताना एकरी २ ते २.५ किलोपर्यंत बियाणे पुरेसे होते. 
पुनर्लागवडीच्या कांद्यामध्ये साधारण तीस टक्के मर होते. थेट पेरणीमुळे रोपांची मुळे तुटत नाहीत. रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.
- पुनर्लागवड केलेला कांदा नंतरच्या काळात उघडा पडतो. बियाणे पेरणी केल्यावर ते मातीत पडते. त्यामुळे शेवटपर्यंत कांदा जमिनीतच मातीआड राहतो.

 अनिल सानप, ९४२२७२८३९३ 

कांदा पेरणीसाठी पेरणी यंत्रात केले हे बदल
सामान्यपणे पेरणी यंत्राच्या फणाचा दात पुढील बाजूने तोंड करून असल्याने जमिनीत खोल घुसतो. कांदा बी वजनाने हलके असून अधिक खोलीवर पेरले गेल्यास उगवण मिळत नाही. त्यामुळे दातांची रचना उलट्या दिशेने केली. परिणामी मातीमध्ये अधिक खोल जात नाही. पुढे जाताना बियाणांवर मातीचा पातळ थर येतो.

बियाणे पडण्यासाठी अॅडजेस्टेबल पाइप बसवला आहे. त्यामुळे जरी फण खाली गेला तरी बियाणे खोल पेरले जात नाही. आवश्‍यकतेप्रमाणे बियाणे पडण्याची खोली नियंत्रित करता येते. 

यंत्राची वैशिष्ट्ये
बियाणे पेटी उत्तम दर्जाच्या फायबरची असून, गंजण्याची भीती राहत नाही.  
पेटीची बांधणी आयएसआय प्रमाणित चौकोनी पाइपमध्ये केली असल्याने मजबूत व टिकाऊ आहे.
सारा यंत्र अॅडजेस्टेबल असल्यामुळे आवश्‍यकतेनुसार सारे तयार करता येतात. 
पेरणी यंत्राचे दात यू क्लिपच्या साह्याने बसवले असल्याने योग्य अंतरावर पेरणी करता येते. 
हे यंत्र कांद्याप्रमाणेच अन्य कमी खोलीवर पेरावयाच्या पिकांसाठी उदा. गहू, ज्वारी, बाजारी, मूग, हुलगे, मेथी, चारापिके वापरणे शक्य आहे.  
हे यंत्र दोन प्रकारात (९ फणी आणि १३ फणी) उपलब्ध आहे.

कांदा लागवड, रान तयार करण्यासाठी साधारण एकरी बारा हजार रुपये खर्च येतो. मी कांद्याची रोप टाकून पुनर्लागवड न करता आमच्या भागात सानप यांनी विकसीत केलेल्या कांदा बियाणे पेरणी मशीनचा वापर केला. माझे एकरी सात ते साडेसात हजार रुपये खर्च वाचला. शिवाय मजुराची गरज भासली नाही. कांद्याचे उत्पादनातही वाढ झाली.
- भाऊसाहेब चौधरी (  ९८५०४८०४५२), जळगाव, ता. राहाता, जि. नगर.
- सुरेश कुदळे (  ९४२३०६५९८५), वडाळा महादेव, ता. श्रीरामपुर, जि. नगर.

यंत्र वापरकर्त्या शेतकऱ्यांचे अनुभव 
नगर, श्रीरामपूर, संगमनेर भागात कांद्याचे रोप टाकून एक ते दिड महिन्याचे रोप झाल्यावर लागवड करण्याची परंपरा आहे. त्याऐवजी कांदा बियाणे पेरणी केल्यास कांद्याचा आकार, रंग एकसारखा होतो. पत्ती जास्ती तयार होते. रोपे तयार करून पुनर्लागवड पद्धतीमध्ये पीक हाती येण्यासाठी साधारण १६० दिवस लागतात, तर पेरणी पद्धतीत १४० दिवस लागतात. उत्पादनामध्येही एकरी पाच टनापर्यंत वाढ मिळत असल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यातच सानप यांनी तयार केलेल्या पेरणी यंत्रामुळे मजूर, वेळ वाचत असल्याने गेल्या चार वर्षांपासून परिसरात कांदा पेरणी पद्धतीने करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे शेतकरी सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com