दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाली कोण?

milk
milk

‘‘अभिषेक तं अभिषेक, नंदीला बी आणि आपल्याला बी. रोज दूध काढून मेलो. इथलं नाई चालत, बाहेरचं आणा, दूध आणा, जोंधळं आणा. सगळं बाहेरनंच आणा. मतं मागायला बी तिकडं इटली आन फ्रान्सलाच जायाचं म्हणावं. शेतकऱ्यांची वाट लावलीसा पाक. या मतं मागाय पुढल्या वर्षी, तुम्हाला दावतो. तांब्याभर दुध लवांडलं तर जनावरांना धोपाटतो. एवढं दूध वाया घालवाया आम्हाला तर ग्वाड वाटतंय व्हय. काय करणार सरकार झोपलंय, झोपा...’’

असा संताप व्यक्त करत दुधाने अंघोळ करणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. दुधाचे दर पडल्यामुळे अस्वस्थ असलेल्या राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांच्या व्यथेचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. 

खरं तर शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय केला जातो. परंतु आता कित्येक शेतकऱ्यांचा तो मुख्य व्यवसाय झाला आहे. दुधाचे दर पडल्यामुळे राज्यात आंदोलन सुरू आहे. दोन वर्षांपूर्वीप्रमाणेच शेतकरी संघटना, विविध पक्षांचे नेते दरवाढीसाठी अक्रमक झाले आहेत. दुधाचा प्रश्न हा राजकीय झाल्यामुळे त्याचा लाभ उठवण्यासाटी आता सगळ्यांनी त्यात उडी घेतली आहे.

चाळीस वर्षांपासून गायी संभाळणारे जाणकार शेतकरी रखमाजी जाधव म्हणतात, ‘‘राज्यात हजारो शेतकरी असे आहेत की, पिढ्यान पिढ्या दुध व्यवसाय जपलाय. जनावरं संभाळताना त्यासोबत माणुसकी जपलीय. दावण कधीच रिती होऊ न देणारे शेतकरी गेल्या कित्येक महिन्यापासून तोट्यात जनावरं संभाळतायत. पण कधीही गाई-म्हशीची उपासमार होऊ दिली नाही. तासभर गाई-म्हशीचं दूध काढायला उशीर झाला तर गोठ्यातला हंबरडा वर्षानुवर्षाचं नातं जोपासणारा असतो. शेतकऱ्यांच्या हक्काचा दूध व्यवसाय कधी सरकार, दुध संघावाल्याच्या हातात गेला हे कळलं नाही. पण शेवटी जनावरं पोसायचं म्हणल्यावर आर्थिक फटका किती दिवस सोसणार? आमची चूल दुधामुळेच पेटतीय. लेकरं शिकायला मदत होतेय. पण सरकारमधल्यांना आणि दुधाच्या धंद्यावर गलेलठ्ठ झालेल्यांना दूध व्यवसाय कधीच आपला वाटला नाही.’’

दुधाचा व्यवसाय हा ग्रामीण भागातल्या आर्थिक चलनवलनाचा कणा आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांपैकी बहुतेक जण लहान, अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्या गोठ्यातली जित्राबं म्हणजे त्यांच्या कुटुंबातले सदस्यच असतात. त्यांचं या जनावरांसोबत एक वेगळं नातं असतं. कोणताही सण असला तरी शेतकरी घासातला घास गाईला भरवतो. पोळा असो की दिवाळी, सुखाच्या क्षणाला पुजा करतो. दूध व्यवसायातील पशुधन जगवताना शेतकऱ्यांच्या भावना वेगळ्या असतात. त्यात प्रेम, आपुलकी दडलेली असते. जनावरांसोबत कित्येक वर्षांचं नातं तयार झालेलं असतं. दुधाला दर किती मिळतो, नफा किती, तोटा किती हा भाग वेगळा. अंदोलने होतील, दर मागितला जाईल. काही दिवसासाठी दरात वाढही होईल. पण संघवाले आपलेच लोक. त्यांनी शेतकऱ्यांच्या दुधाच्या जोरावर मालमत्ता जमा केल्या, संस्था मोठ्या केल्या; पण दूध व्यवसायातील शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र वर्षानुवर्षे कायम आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दोन वर्षांपूर्वी दुष्काळाने दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं. कर्ज काढून जनावरं पोसणारे, पण दावण मोकळी होऊ न देणारे अनेक शेतकरी राज्याने पाहिलेत. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची जनावरं जगवण्यासाठी छावण्या उभ्या राहिल्या. नगर तालुक्यातील आगडगावापासून बुरुडगावापर्यत शेकडो शेतकरी गाई-म्हशी सांभाळतात. गावची गावं छावण्यांत स्थलांतरित झाली. चांगला चार- सहा महिने छावणीतच मुक्काम होता. ४०-४५ अंश सेल्सियस तापमानात मोडक्या-तोडक्या निवाऱ्यात दिवस काढले. वादळी वारा आणि गारांच्या पावसातही जनावरं सोडून शेतकरी घरी गेला नाही. तेथेच राहिला. जोवर जनावरं छावणीत, तोवर त्याचाही मुक्कामच तिथंच छावणीत राहिला. केवळ गाई-म्हशी दूध देतात आणि त्यापासून पैसे मिळतात म्हणून शेतकरी तिथं पाय रोवून उभे राहिले नाहीत; तर कित्येक वर्षापासून त्या मुक्या जीवांशी जपलेलं ते एक नातं होते. दूध व्यवसाय अडचणीत आल्यावर हा शेतकरी पोळून निघतो. त्याची कायम उपेक्षा होत आली आहे. आपल्या हातात सत्ता आल्यावर तिचा उपयोग या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी करावा, अशी भावनाच दिसत नाही. 

 ९८५०५६९०३६ 
(लेखक ‘ॲग्रोवन’ चे नगर जिल्हा बातमीदार आहेत.)

 

महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com