कोकणातून दोन लाखाहून अधिक पेटी हापूस महाराष्ट्रासह परराज्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी व्यापाऱ्यांपेक्षा थेट ग्राहकांच्या घरात आंबा पेटी पाठविण्याचे काम केले.कोकणातून दोन लाखाहून अधिक पेटी हापूस महाराष्ट्रासह परराज्यात पाठविण्यात आला आहे.

रत्नागिरी - कोरोनाची टाळेबंदी सुरू झाली आणि हापूसची विक्री संकटात सापडली. या संकटावरही मात करत कृषी, पणन मंडळासह रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी व्यापाऱ्यांपेक्षा थेट ग्राहकांच्या घरात आंबा पेटी पाठविण्याचे काम केले. हा प्रयोग यंदा प्रमाणापेक्षा अधिक यशस्वी झाल्यामुळे बाजार समितीमधील फळ व्यापाऱ्यांकडे तुलनेत कमी आंबा आला होता. कोकणातून दोन लाखाहून अधिक पेटी हापूस महाराष्ट्रासह परराज्यात पाठविण्यात आला आहे. त्यातून काही कोटींची उलाढाल झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑक्टोबर महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस, कडाक्याच्या थंडीचा अभाव आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा हापूस आंब्याचा हंगाम दोन महिने उशिरा सुरू झाला होता. त्यात पहिल्या हंगामाचा हापूस बाजारात विकण्याची वेळ आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव एकाचवेळी जुळून आल्याने यंदा हापूस आंब्यावर अस्मानी संकट ओढवणार अशी भीती बागायतदारांना होती. त्याच वेळी राज्याच्या कृषी व पणन विभागाने टाळेबंदी काळात कोकणातील हापूस आंब्याची थेट विक्री करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद या मोठ्या शहरापुरती ही विक्री न होता अकोला, जळगाव यांसारख्या शहरामध्येही यंदा विक्री केली. आत्मा, कृषी विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे ६० ते ७० हजार पेटी आंबा टाळेबंदीच्या काळात विकला गेला. त्यानंतर पणन विभागाकडून सुमारे चाळीस हजारहून अधिक डझन आंब्याची विक्री करून देण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुलै २०१६ मध्ये राज्य शासनाने हापूसच्या थेट विक्रीला परवानगी दिली, पण कोकणातील बागायतदारांनी त्याचा फारसा फायदा करून घेतला नाही. बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे आंबा सोपवून ते देतील त्या भावावर बागायतदार समाधानी होते. टाळेबंदीमुळे कोकणात अडकून पडलेल्या बागायतदारांनी पारंपरिक विक्रीचे तंत्र झुगारून कोरोनाच्या संसर्गाला न घाबरता थेट विक्री सुरू केली. त्यामुळे राज्यात दोन लाख पेट्यांची थेट विक्री झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ग्राहकाला दोन ते अडीच हजार रुपयांत घरपोच पाच ते सहा डझन आंबे मिळत असल्यामुळे त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. त्यातून सव्वाशे ते दीडशे कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व खरेदीदारांच्या गेल्या अनेक वर्षांच्या साखळीवर परिणाम होणार आहे. 

याबाबत रत्नागिरीतील बागायतदार प्रसन्न पेठे म्हणाले, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत थेट विक्रीवर भर दिला गेला. दोन डझनच्या बॉक्समधून आंबा विकत घेणे सामान्य माणसाला शक्य होते. बहुतांशी आंब्याची विक्री यंदा झाली आहे. 

कोरोनामुळे केलेल्या टाळेबदीच्या सुरवातीला आंबा ग्राहकांपर्यंत जाईल की नाही अशी चिंता होती; मात्र त्यातून मार्ग निघाला. कृषी विभागाने पूर्ण राज्यभरात बागायतदार ते थेट ग्राहक अशी साखळी केली. पणनने ऑनलाइनवर भर दिला होता. भविष्यासाठी ही संधी आहे. 
- भास्कर पाटील, उपसरव्यवस्थापक, पणन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two lakh boxes of Hapus Mango from Konkan to other states including Maharashtra