भूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी पातळी

भूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी पातळी

सध्या अनेक गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर संपल्यामुळे गावकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा ठिकाणी, सर्वेक्षण आणि अभ्यास करून, योग्य जागा नक्की करून भूमिगत बंधारा बांधावा. या उपायामुळे विहिरीतील पाणी साठवण्याचा कालावधी साधारण अडीच ते तीन महिन्यांनी वाढवता येऊ शकतो. 

मागील भागात आपण भूमिगत बंधारा म्हणजे काय, तो कुठे बांधावा, काय दक्षता घ्यावी याबद्दल माहिती घेतली. ही संकल्पना आणि जलसंधारणाचा उपाय रुढ उपायांपेक्षा वेगळा असल्याने काही उदाहरणे देऊन हा उपाय कसा उपयुक्त ठरतो हे आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.

स्वामी विवेकानंद महाविद्यालय परिसरातील जलसंधारण 
वाडा गावात असलेल्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात पाण्याचा स्रोत म्हणजे सुमारे ७० वर्ष जुनी असलेली एक लहानशी विहीर. शाळा, महाविद्यालय, छात्रालय, इत्यादी गोष्टी या विहिरीवर आणि नळपाणी योजनेवर अवलंबून आहेत. एकूण विद्यार्थी संख्या अंदाजे ५००० आणि विहीर जरी आज संस्थेच्या ताब्यात असली तरी ती खूप जुनी असल्याने सर्व गाव तिथे पाण्यासाठी येतो. त्यामुळे संस्था आणि गाव असा दुहेरी दबाव या एका विहिरीवर येऊन पाणी साधारण मार्चमध्ये संपते हा तिथल्या मंडळींचा अनुभव. विहिरीच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला एक पाझर तलाव आहे. पण इथे पाणी उताराने वाहून जात असल्याने हा पाझर तलाव पाऊस संपता संपता कोरडा पडतो आणि त्याचा विहिरीला फारसा उपयोग होत नाही. या विहिरीतून पाणी मिळण्याचा कालावधी वाढवता येतो का हे बघायला मला बोलावले होते. तिथे जाऊन सर्वेक्षण करून विहीर मोठी करणे आणि विहिरीच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला जागा नक्की करून तिथे एक भूमिगत बंधारा बांधायचा, असे दोन उपाय ठरले.

डिसेंबर २०१८ मध्ये केशवसृष्टी ग्रामविकास योजना या संस्थेच्या माध्यमातून आम्ही पाऊस संपल्यावर डिसेंबरमध्ये तिथे एक भूमिगत बंधारा बांधला. त्यानंतर, त्या विहिरीची पाण्याची पातळी पुढच्या १५ दिवसांमध्ये साधारण तीन फुटांनी वाढली. जी विहीर मार्चमध्ये कोरडी होत असे, त्या विहिरीत आजही मे महिना अर्धा उलटून गेल्यावरही पाणी आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाचे पाणी अडवता न आल्याने या उपायाचा पूर्ण फायदा आत्ताच्या उन्हाळ्यात मिळणार नाही. पण आत्ता चालू असलेल्या विहिरीच्या पुनर्बांधणीनंतर ही विहीर येत्या पावसाळ्यानंतर संस्था आणि गाव यांना वर्षभर पाणी देऊ शकेल.

भूमिगत बंधाऱ्याचा आणखी एक फायदा असा होणार आहे, की या बंधाऱ्यामुळे विहिरीला फायदा तर होणार आहेच, त्याचबरोबर, पाझर तलावातही पाणी जास्त काळ थांबणार आहे, ज्यामुळे विहिरीला अधिक फायदा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com