सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांचा वापर

हेमंत श्रीरामे,  मयूरेश पाटील, किशोर धांदे
Wednesday, 15 January 2020

पारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या तुटवड्यामुळे व जास्त मागणीमुळे ऊर्जेच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या ऊर्जेला पूरक किंवा पर्यायी ऊर्जा म्हणून अपारंपरिक ऊर्जेचा उपयोग विविध साधने वापरून करता येऊ शकतो.

पारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या तुटवड्यामुळे व जास्त मागणीमुळे ऊर्जेच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या ऊर्जेला पूरक किंवा पर्यायी ऊर्जा म्हणून अपारंपरिक ऊर्जेचा उपयोग विविध साधने वापरून करता येऊ शकतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिवसेंदिवस विविध प्रकारच्या ऊर्जेची गरज वाढत असल्यामुळे ऊर्जेचा तुटवडा निर्माण होत आहे. ऊर्जेचा वापर प्रकाशासाठी, पाणी उपसण्यासाठी, स्वयंपाकासाठी, कृषी दळणवळणासाठी तसेच दैनंदिन कामासाठी करण्यात येतो. सर्वसाधारपणे दैनंदिन जीवनात वापरली जाणारी व बाजारात सहजपणे उपलब्ध असणारी सौर ऊर्जेवर आधारीत साधनांची माहिती खालीलप्रमाणे आहेत.

अ. सौर औष्णिक ऊर्जा साधने 
सौर उष्णजल सयंत्र 

सौर औष्णिक पद्धतीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून पाणी गरम करता येते. त्यामुळे घरगुती वापरासाठी प्रचलित पद्धतीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात ऊर्जेची बचत होते. सौर उष्णजल सयंत्रामुळे ६० ते ८० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत पाणी गरम करता येते. अशा पद्धतीची सौर उष्णजल सयंत्रे घरगुती तसेच औद्योगिक क्षेत्र, हॉटेलस्, वसतिगृहे, रुग्णालये इत्यादीमध्ये बसविता येऊ शकतात.

सौर चूल ( सोलर बॉक्स कुकर ) 
सौर ऊर्जेचा वापर करून अन्न शिजविता येते, ज्यामुळे पारंपरिक इंधनाची बचत करता येते. सौर चूल एक चौकोनी पेटी असून अॅल्युमिनियम धातूपासून बनविलेली आहे. सौर चुलीच्या वापरामुळे प्रदूषण होत नाही, तसेच शिजविलेल्या अन्नपदार्थाची चव मूळ स्वरुपात टिकून राहिल्यामुळे त्यातील सर्व प्रथिने व जीवनसत्त्वांचा लाभ जास्त प्रमाणात मिळतो. एका सौर चुलीच्या वापरामुळे प्रतिवर्षी अंदाजे  ६६ लिटर रॉकेल अथवा ८०० किलो लाकडाची बचत होते. या चुलीमध्ये आरशाचा उपयोग परावर्तक म्हणून केला, तर अन्न शिजविण्याचा कालावधी कमी करता येतो.

पॅराबोलिक सोलर कुकर 
हा सोलर कुकर सुट्या भागाच्या रूपात उपलब्ध असून त्याची जोडणी सोपी असते. या कुकरमध्ये अॅल्युमिनियअमच्या गोलाकार चकाकी दिलेल्या पत्र्याव्दारे सूर्यकिरणे भांडे ठेवण्याच्या जागी केंद्रित करता येतात. घरगुती तसेच हॉटेल, ढाबे इत्यादी ठिकाणी स्वयंपाक करण्यास उपयुक्त आहे. यामध्ये एकाच वेळेत ५-१० माणसांचे अन्न ३० ते ४५ मिनिटांत शिजविले जाते. यामध्ये आपला नेहमी वापरला प्रेशर कुकर ठेवून त्यामध्ये सर्व प्रकारचे अन्न शिजवता येते. परंतु यात पॅराबोलीक डिशला सूर्याच्या मार्गक्रमण कक्षेनुसार हा कुकर वळविणे आवश्यक असते.

ब. सौर फोटोव्होल्टाईक साधने 
सौर फोटोव्होल्टाईक फलकाद्वारे सूर्य किरणामधील ऊर्जेचे अर्ध वाहकाच्या सहाय्याने विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्यात येते. सौर फोटोव्होल्टाईक फलकावर आधारीत साधनांची माहिती खालीलप्रमाणे आहे. 

सौर कंदील   
सौर कंदील हा फोटोव्होल्टाईक फलक, दिवा, बॅटरी, यापासून बनविला जातो. तो वजनाला हलका असल्याने सहज वाहून नेता येतो. सौर कंदील ५/७ वॅट क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत. पूर्ण भारित सौर कंदील ३ ते ४ तासापर्यंत वापरता येतो.

सौर घरगुती दिवे 
ही सयंत्रे घरात प्रकाशासाठी वापरली जातात. सोलर फोटोव्होईटाईक फलक, बॅटरी व दिवे तिचे महत्त्वाचे घटक असतात. ३ ते ४ दिवे तसेच फॅन चालवण्यासाठी या सयंत्राचा वापर करता येतो. ही सयंत्र पद्धती रात्री ४ ते ५ तास प्रकाश देऊ शकते.

सौर पंप  
सौर पंपाचा वापर विहिरीतून तसेच कूपनलिकेमधून पाणी उपसण्यासाठी केला जातो. प्रत्यावर्ती पंप, सौर फोटो व्होइटाईक फलक व पाईप्‌स हे या सयंत्राने महत्त्वाचे घटक आहेत. हा पूर्णपणे सौरऊर्जेवर चालत असल्याने कोणत्याही प्रकारची पारंपरिक ऊर्जा लागत नाही. सौरपंपाची पाणी उपसण्याची क्षमता ७० हजार ते १४० हजार लिटर प्रती दिवस (८ तासांचा ) इतकी आहे.

स्वयंचलीत सौर पथदीप 
सौर पथदीपाचे मुख्य घटक फोटोव्होइटाईक फलक दिवा व बॅटरी हे असतात. हे सर्व घटक रस्त्याच्या कडेला एका खंबावर बसविलेले असतात. सौर पथदिव्यामध्ये असलेल्या नियंत्रण प्रणालीमुळे ते संध्याकाळ झाली की आपोआप चालू होतात व पहाट झाली की आपोआप बंद होतात.

सौर फवारणी यंत्र 
सौर फवारणी सयंत्राचे मुख्य घटक फोटोव्होइटाईक फलक, फवारणी यंत्र, प्रत्यावर्ती पंप व कीटकनाशक मिश्रण ठेवण्याचे भांडे हे आहेत. सौर फवारणी सयंत्राचा उपयोग पिकांवर कीटकनाशक फवारण्यासाठी करण्यात येतो. या सयंत्रामध्ये कोणत्याही प्रकारची इतर पारंपरिक ऊर्जा लागत नाही, तसेच हे वाहण्यास व वापरण्यास सोपे आहे.

सौर कुंपण  
ग्रामीण व दुर्गम भागात जनावरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी सौर कुंपण अत्यंत उपयोगी आहे. अशा उपकरणांपासून जनावराला उच्च दाबाचा विजेचा झटका बसतो व त्यामुळे ते पिकापासून नेहमी लांब राहतात. अशा झटक्यांनी प्राणहानी होत नाही. सौर कुंपणाची किंमत एकूण लांबीवर आधारित असते. सौर कुंपणामुळे शेतीच्या संरक्षणखर्चात कपात होते.

- हेमंत श्रीरामे, ०२३५८ २८२४१४
(विद्युत आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of solar power based equipment