शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय

उष्ण वाऱ्याद्वारे होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी शेततळ्याभोवती सजीव कुंपण घालावे.
उष्ण वाऱ्याद्वारे होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी शेततळ्याभोवती सजीव कुंपण घालावे.

सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत. ज्या ठिकाणी सद्यःस्थितीत शेततळ्यांमध्ये पाणी उपलब्ध आहे तिथे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊन पाण्याचा अपव्यय होण्याचा मोठा धोका असतो. विविध उपायांचा वापर करून हे बाष्पीभवन टाळता येते. पिकांना पाणीटंचाईच्या काळात पुरेसे पाणी देणे शक्य होऊन हंगाम साधणे शक्य होते.

राज्यातील सुमारे ८४ टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. बारमाही, बागायती शेती सोडल्यास बहुतेक सर्व पिके पावसाच्या पाण्यावरच घेतली जातात. मात्र कोरडवाहू क्षेत्र मोठे असल्याने त्यात पाणी उपलब्ध करणे आणि त्याचे योग्य नियोजन आखून शाश्वत शेती करणे ही काळाची गरज बनली आहे.

कोरडवाहू शेतीसाठी सिंचन पाणी उपलब्ध करण्यासाठी शेततळे हा उत्तम उपाय आहे. शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शेततळ्याचा उपयोग होतो. हे तळे नाला ओघळीच्या काठावरील पड क्षेत्रात घेतले जाते.

शेततळ्यातील पाण्याचे उष्णतेमुळे बाष्पीभवन होते. सध्या दुष्काळ सर्वत्र आहे. मात्र काही शेतकऱ्यांकडे शेततळ्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाणी आहे. अभ्यासाअंती असे निष्कर्ष समोर आले आहेत की तळी, धरणे किंवा कालवे यांसारख्या जलसाठ्यांतून वर्षाला साधारणपणे एकूण जलसाठ्याच्या ४० ते ४२ टक्के इतक्या पाण्याचे बाष्पीभवन होते. सद्यःस्थितीतही अनेक ठिकाणी दुष्काळ व उष्णता या दोन्ही बाबी जाणवत आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये उन्हाळ्यात तर सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असते. जेवढे तापमान जास्त असेल तेवढे बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त असते. पाण्याचा फार मोठ्या प्रमाणात होणारा हा अपव्यय टाळणे अत्यावश्यक बनले आहे.

बाष्पीभवन कमी करण्याचे उपाय
शेततळ्याचा पृष्ठभाग लहान ठेवणे 
द्रव्याचे आकारमान जेवढे अधिक, तेवढा त्याचा बाष्पीभवनचा दर वाढत असतो. जास्त लांबी-रुंदी असणारे शेततळे बांधल्यास शेततळ्यातील पाण्याचा हवेशी संपर्क येणारा भाग वाढतो. त्यामुळे साठविलेल्या पाण्याचे अधिक प्रमाणात बाष्पीभवन होते. यासाठी जास्त लांबी-रुंदी असणारे शेततळे न बांधता जास्त खोली असणारे शेततळे बांधावे.

सजीव कुंपण 
शेततळ्याच्या बाजूने उंच व दाट झाडांचे कुंपण करावे. जेणेकरून वाहणाऱ्या वाऱ्याचे तापमान कमी होऊन उष्ण वाऱ्याद्वारे होणारे बाष्पीभवन कमी होऊ शकेल. कुंपण करताना ते शेततळ्यापासून सुरक्षित अंतरावर असावे. याकरिता सागरगोटा, शिकेकाई, चिलार, मेहंदी, निर्गुडी, करवंद, सुरू, खैर, जंगली गुलाब, आफ्रीकन मिल्क बुश, सुबाभूळ, घाणेरी, बांबू, शेवरी, बोगनवेल, एरंड आदी  वनस्पतींचा उपयोग करता येतो.

भिंत उभारणी
शेततळ्याच्या आजूबाजूने तीन मीटर उंचीची भिंत बांधावी. उपलब्ध माती व मुरुमाचा वापर करून तात्पुरती भिंत उभारल्यास हरकत नाही. परंतु भिंतीची उंची शेततळ्यापेक्षा जास्त असावी. जमिनीशी समतल सभोवताली बांध घालावा. जेणेकरून हवा खेळती राहणार नाही व पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल.

विविध तेलांचा वापर 
निंबोळी किंवा एरंडी या वनस्पतिजन्य तेलांचाही वापर बाष्पीभवन नियंत्रणासाठी करता येतो. संपूर्ण शेततळ्यामधील उपलब्ध पाण्याच्या पृष्ठभागावर या तेलांचा तवंग पसरवून बाष्पीभवन रोखता येते. हे तेल नैसर्गिक असल्याने वापरण्यास अपायकारक नाही. साधारणतः ३० ते ३५ चौरस मीटर पाण्याच्या पृष्ठभागासाठी एक लिटर तेलाची आवश्यकता असते. ग्रीस ऑइल तसेच वंगण तेलाचा वापर टाळावा. कारण हे घटक पाण्यातील सजीवांसाठी हानिकारक ठरतात. तसेच त्यांचा अंश सिंचनाद्वारे  पिकांपर्यंत पोचण्याची शक्यता असते. यामुळे ठिबक संचाचेही नुकसान होऊ शकते. 

थर्माकोलचा वापर 
सध्या प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी आली आहे. मात्र थर्माकोलबाबत असे सांगता येते की त्याच्या वापराने बाष्पीभवनावर नियंत्रण ठेवता येते. औद्योगिक वसाहतीच्या भागामध्ये टाकाऊ थर्माकोल मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने उपलब्ध होते. त्याचे तुकडे शेततळ्यात सहजपणे पसरविता येतात. त्याचा वापर जास्त कालावधीसाठी करता येऊन त्यापासून कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. थर्माकोलचा  वापर करताना ते हवेने उडून जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. उपलब्ध उपायांपैकी हा सर्वात स्वस्त व प्रभावी उपाय ठरत असल्याचे निदर्शनात आले आहे.

अन्य घटक 
पालापाचोळा, तांदळाचा भुस्सा, गव्हाचे काड, हलके फ्लोटिंग ऑब्जेक्ट्स, 
पीव्हीसी बॉल्स, प्लॅस्टिक आदींचे आच्छादन; शेवाळ-जलपर्णी संवर्धन, विविध रंगांचा वापर तसेच शेततळ्यावर कापडाच्या आवरणाचा वापर करूनही शेततळ्यातील बाष्पीभवन कमी करता 
येते.

पाण्याचा कार्यक्षम वापर 
   पिकांना वाढीच्या संवेदनशील अवस्थेतच पाणी द्यावे. 
   पाणी देताना जमिनीतील ओलावा नेहमी वाफसा अवस्थेच्या जवळपास असावयास हवा. 
   ठिबक, तुषार यांच्या वापरासह पॉलिमल्चिंग, उसाचे पाचट, गव्हाची काड आदींचाही वापर करावा.  
   प्रत्येक हंगामात एकच एक पीक न घेता फेरपालट करावी त्यामुळे जमिनीतील विविध थरांमधील सूक्ष्मजीव सक्रिय होतात. अन्नद्रव्ये पिकांना नियमित उपलब्ध होतात. जमिनीचा पोत टिकून राहून पाणी धारणक्षमता सुधारते.
   उभ्या पिकात आंतमशागत केल्याने तण नियंत्रण होतेच. शिवाय जमिनीला पडलेल्या भेगा बुजतात. परिणामी बाष्पीभवनाचा वेग मंदावतो व ओलावा टिकून राहतो.

रसायनांचा वापर
केओलिन

हे खडूच्या भुकटीसारखे रसायन आहे. सुमारे एक कोटी लिटर पाण्यासाठी तीन किलो भुकटी लागते. या रसायनाचा टिकाऊपणा अत्यंत कमी असतो. प्रत्येक ८ ते १२ दिवसांमध्ये ही पावडर तळाशी जाते. पावडर तळाशी गेल्यानंतर पुन्हा केओलिनचा वापर करावा लागतो. बाजारामध्ये द्रवरूपातील केओलिनही उपलब्ध आहे. 

विघटनशील घटक
हे घटक वनस्पती तेलापासून निर्मित जैविक विघटनशील पदार्थाचे पाण्यावर अस्तरीकरण करणारे रसायन असतात. यामध्ये जैविकरीत्या विघटन होणाऱ्या (बायोडीग्रेडेबल) मायक्रोफिल्मचा वापर केलेला असतो. जेलच्या स्वरूपात असणारा हा पदार्थ एका पिशवीसोबत तळ्यामध्ये टाकावा.

जैविक घटकाच्या अर्धा किलो वजनाच्या दोन पिशव्यांना दोरा बांधावा. त्यास छोटे दगड बांधून गोफण फिरविल्याप्रमाणे या पिशव्या एकरभर आकाराच्या तळ्याच्या मध्यावर फेकून द्याव्यात. पिशवीतील जेलरूपी रसायन पृष्ठभागावर हळूहळू अतिशय पातळ (०.१५ मायक्रॉन जाडीचा) तवंग निर्माण करतो. परिणामी, बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. प्रति तळ्याला दर ५ ते ६ दिवसांच्या अंतराने अर्धा किलोच्या दोन पिशव्या पुरेशा होतात. या पद्धतीने सरासरी ३५ टक्क्यांपर्यंत बाष्पीभवन घटविले जाते. या पद्धतीने सुमारे एकहजार लिटर पाण्याची बचत करण्याकरिता ८ ते ९ रुपये खर्च येतो. विघटनशील घटक पाण्यावर पसरविल्याने पिण्याचे पाणी, मासे किंवा माणसे यांना कोणत्या प्रकारचा धोका निर्माण होत नाही.

बाजारात खासगी कंपन्यांची अल्कोहोल आधारित अशी रसायने उपलब्ध आहेत. मात्र ती महाग आहेत. या रसायनांची कार्यक्षमता व होणारे अपाय लक्षात घेऊनच वापर करावा.

- डॉ. विनायक शिंदे ९४२२२२११२० (डॉ. पाटील हे डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट, नगर येथे, तर डॉ. वांद्रे या कृषी महाविद्यालय, सोनई, नगर येथे सहायक प्राध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com