कुठे गेला सोन्याचा धूर!

विजय जावंधिया
गुरुवार, 26 एप्रिल 2018

आजही केरळमधील मंदिरात असणाऱ्या खजिन्याची चर्चा होत असते. कुठून आले हे सोने-चांदी? केरळातून काळे मिरे, काजू, रब्बर, कॉफी यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती व त्या बदल्यात सोन्या-चांदीची प्राप्ती होत होती.

भारतात कुठेही सोन्या-चांदीच्या खाणी नाहीत, तरी कधी काळी सोन्याचा धूर निघणारा देश म्हटले जायचे. हिंदी सिनेमातलं एक लोकप्रिय गाणं आहे, मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिरे मोती... ही या कृषिप्रधान देशाची वास्तविकता होती. शेतीतून उत्पादित होणारा शेतमाल, मसाले, बासमती तांदूळ, काळे मिरे, कापूस, रबर, कॉफी असे अनेक पदार्थ निर्यात होत होते. भारतीय कारागिरांच्या हस्तकौशल्यानी तयार झालेले कपडे व इतर अनेक वस्तूंची निर्यात होत होती. याच्या बदल्यात सोने-चांदी देशात येत होते; म्हणूनच या देशातील राजे-रजवाड्यांकडे सोन्या-चांदीचा, रत्नाचा खजिना होता व आजही आहे. याचाच अर्थ असा की जागतिक बाजारातील व्यापारात आमचा दबदबा होता.

या देशातील माती, पर्यावरण, पाणी, सूर्यप्रकाश, भूगर्भातील संपत्ती इत्यादी वस्तूंमुळे मोगल, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांना आकर्षित केले होते. मोगलांचे या देशावर आक्रमण झाले व नंतर ते या देशातच राज्य करू लागले. या देशातली संपत्ती त्यांनी या देशातच ठेवली. त्यानंतर इंग्रज आणि युरोपच्या अनेक देशांचा प्रवेश भारतात झाला. इतिहासाचा असाही दाखला आहे की अकबर राजाच्या कारकिर्दीतच इंग्रजांचे भारतात व्यापाराच्या निमित्ताने आगमन झाले होते. अकबरची महाराणी जोधा हिने इंग्रजांसोबत मसाल्याचे विविध प्रकार निर्यात करण्याचा व्यापार सुरू केला होता. आजही केरळमधील मंदिरात असणाऱ्या खजान्याची चर्चा होत असते. कुठून आले हे सोने-चांदी? केरळातून काळे मिरे, काजू, रब्बर, कॉफी यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती व त्या बदल्यात सोन्या-चांदीची प्राप्ती होत होती.

युरोपमध्ये बाष्प इंजिनचा शोध लागला व औद्योगिक विकासाला प्रारंभ झाला. या औद्योगिकरणासाठी कच्चा माल, स्वस्त श्रम व तयार झालेला माल विकण्यासाठी बाजारपेठ हवी होती. त्यासाठीच युरोपच्या अनेक देशांनी अफ्रिका व आशियाई देशांना गुलाम केले.

मोगलांनी इथेच राहून राज्य केले, इथली संपत्ती इथेच ठेवली; म्हणूनच चलनात सोन्याच्या मोहरा होत्या. इंग्रजांनी या देशातील कच्चा माल इंग्लंडच्या कारखान्यांसाठी नेला व पक्का माल या देशात विकण्याचे धोरण राबविले, म्हणूनच ते अत्यंत कुशलतेने तो माल विकत घेण्याची क्रयशक्ती असणारा वर्ग ही तयार करीत होते. लूट वाढत होती तरी सोन्याच्या मोहरांची जागा चांदीच्या कलदार रुपयांनी घेतली होती. या लुटीच्या व्यवस्थेला त्या काळात वसाहतवादी शोषण असे म्हटले जायचे. सोन्याची मोहर चलनातून बाद झाली होती. चांदीच्या कलदार रुपयासोबत तांब्याचा चलनाचा समावेश होता. याच काळात कागदी रुपयाचा चलनाचा प्रारंभ झाला होता; पण या कागदी रुपयाच्या मागे सोन्याचे पाठबळ होते. ज्याला अर्थशास्त्राच्या भाषेत ‘गोल्ड स्टॅंडर्ड (सोन्याचे बांधण) असे म्हणतात. जेवढे रुपयाचे कागदी चलन छापायचे आहे, तेवढेच सोने सरकारी तिजोरीत ठेवले पाहिजे. गोरे इंग्रज भारत सोडून गेले व आपण स्वतंत्र झालो तेव्हा भारतीय रुपया व इंग्लंडचा पाउंड यांचा विनिमय दर १३ रुपयाला १ पाउंडच्या आसपास होता. त्या काळात ४ डॉलरचा १ पाउंड होता म्हणजेच ३ ते ३.५० रुपयाच्या आसपास १ डॉलर असा विनियम दर होता. एका अभ्यासानुसार १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला, तेव्हा अमेरिकेच्या डॉलरबरोबरच भारताचा १ रुपया होता. कारण भारतावर तेव्हा अमेरिकेचे कोणतेच कर्ज नव्हते.

आज हा सर्व ऊहापोह करण्याचे कारण १९९० नंतर जगात नवीन आर्थिक धोरणाचे वारे वाहू लागले. आमचा देशही त्यात सहभागी झाला. आमच्या देशात हे नवीन आर्थिक धोरण खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या शब्दांनी प्रसिद्ध झाले. या नवीन धोरणाचा उद्देश जगातील गरिबी दूर करणे व सर्व समावेशक (सबका साथ-सबका विकास) विकास करणे हा आहे, असा प्रचार एका गटाने केला; तर दुसरा गट असे मानतो की, हे जगातील श्रीमंत-विकसित देशांचे नववसाहतवादी धोरणच आहे. या धोरणाच्या विरोधात श्रीमंत विकसित देशातील जनतेने प्रचंड जनआंदोलनाच्या माध्यमातून ‘गरीब गरीब झाला व श्रीमंत श्रीमंत झाला’ ही वास्तविकता जगाच्या वेशीवर टांगली आहे.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)  ९४२१७२७९९८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Javandiya article