ग्रामस्थांनी बांधले स्वखर्चाने बंधारे

ग्रामस्थांनी बांधले स्वखर्चाने बंधारे

जळगाव - गिरणा नदीच्या शेवटच्या भागातील आव्हाणे, वडनगरी, खेडी खुर्द व फुपनगरी या गावांमधील शेतकऱ्यांनी पिकांना पुरेसे संरक्षित पाणी उपलब्ध होण्यासाठी स्वखर्चाने वाळू, मातीचे तीन बंधारे बांधले आहेत. सुमारे तीन लाख रुपयांचा खर्च या तीन गावांमधील शेतकऱ्यांनी केला आहे.

यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस कमी झाल्याने नदीला पूर आला नाही. त्यामुळे विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण झाले नाही. या भागात पाटचारी किंवा नदीवर सिंचन प्रकल्प नाही. तर जवळपास ७० टक्के शेती बागायती आहे. कूपनलिका, विहिरींमधून सप्टेंबरपासूनच उपसा सुरू झाला आहे. त्यामुळे पाणीपातळी घटली. काही विहिरी, कूपनलिकांचे पाणीही कमी झाले. त्यामुळे केळी, कांदा व इतर पिकांची सुमारे चार हजार हेक्‍टवरील शेती संकटात आली. अशातच पिण्याचे पाणी व इतर कारणांसंबंधी नोव्हेंबरमध्ये नदीत पाणी सोडण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतला. दिवाळीला नदीत पाणी येईल हे स्पष्ट झाले. हे पाणी अडविण्यासाठी शेतकऱ्यांनी दिवाळी साजरा करण्यापूर्वी सिंचनाचा प्रश्‍न दूर करू, असा निश्‍चय केला. शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व मंत्र्यांशी संपर्क केला. पण त्यांनी वाळू, मातीच्या बंधाऱ्याला निधी कसा देणार, असा प्रतिप्रश्‍न करून या विषयातून अंग काढून घेतले. परंतू शेतकरी निराश झाले नाहीत. ज्याचे बागायती क्षेत्र अधिक, त्यांनी पैसा खर्च करण्याची तयारी केली. 

सर्वप्रथम फुपनगरीत चार -पाच शेतकऱ्यांनी पैसे गोळा केला. जेसीबी व इतर यंत्रणांनी काम सुरू झाले. बंधारा तयार व्हायला जशी सुरवात झाली, तशी इतर शेतकरीही पैसे द्यायला तयार झाले. या गावात ४५ हजारांवर निधी लागलीच गोळा झाला. आणि या गावाचे अनुकरण वडनगरी, खेडी खुर्द आणि आव्हाणे गावाने केले. गावातील शेतकऱ्यांनी बैठका घेऊन आपणही बंधारा बांधूयात, असा निश्‍चय केला. या गावांमध्येही बंधारे बांधण्याचे काम सुरू झाले. सुमारे २२ दिवसांत तीन बंधारे तयार झाले. यासाठी ग्रामस्थांनी चार लाख रुपये खर्च केला. खेडी खुर्द येथील वाळूचा बंधारा पाण्याच्या प्रवाहाने कमकुमत होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी त्यावर प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन केले. आव्हाणे येथे बंधाऱ्यावर वाळू आणि माती टाकण्यात आली आहे. पाण्याच्या प्रवाहाने खेडी खुर्द येथील बंधाऱ्याला किरकोळ नुकसान झाले असेल तरी चांगल्या प्रकारे पाणी साठले आहे. या चार गावांसह धरणगावमधील टहाकळी, रेल, दोनगाव, आव्हाणी, भुलपाट या गावांना या कामाचा लाभ झाला आहे. आठ-नऊ गावांमधील बागायती शेती वाचली, तसेच पुढे उन्हाळ्यात पीक लागवड करणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.

शेतकऱ्यांनी बंधाऱ्यासाठी पैसे जमा केले. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी आमच्या प्रयत्नांची दखल घेतली. सर्वजण एकत्र आले. सध्या बंधाऱ्यात चांगला जलसंचय झाला. त्याला आणखी मजबूत करणार आहोत. 
- मंगलसिंग प्रभाकर पाटील, शेतकरी, फुपनगरी, जि. जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com