एक निर्धारातून गावकऱ्यांनी साधली पाणीटंचाईमुक्ती

Takobaichiwadi
Takobaichiwadi

टाकोबाईचीवाडी गावाने राबवला ओढाजोड प्रकल्प
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग दुष्काळाने होरपळत आहे. मात्र काही गावे नियोजनबद्ध कामांमधून दुष्काळ व पाणीटंचाईमुक्त होण्याकडे वाटचाल करू लागली आहेत. टाकोबाईचीवाडी हे त्यातीलच एक छोटेसे गाव आहे. या गावात २०१४ पासून जलसंधारणाची विविध कामे झाली. गावकरी, कृषी विभाग, जिल्हा परिषद, खासगी कंपनी अशा सर्वांचा त्यास हातभार लागला. ओढाजोड प्रकल्प हे त्यातील वैशिष्ट्यपूर्ण काम झाले. या सर्वांमधून गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न  सुटला. शेती बागायत होण्याबरोबर दुग्धोत्पादनातही भरीव वाढ झाली. त्यातून कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली.

पर्जन्यमानात सातत्याने घट होत असल्याने राज्यातील असंख्य गावे मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. सातारा जिल्ह्याची परिस्थिती वेगळी नाही. जिल्ह्यातील अनेक गावे दुष्काळाच्या खाईतून जात आहेत. फलटण तालुक्यातील टाकोबाईचीवाडी हे सुमारे ७०० लोकसंख्या असलेले छोटसे गाव. या गावातील जनतेने दुष्काळाची दाहकता सातत्याने अनुभवली आहे. जिल्ह्यात २००३ मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे गावातील जनतेस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मूल्य जाणून असल्याने काहीतरी विधायक करण्यासाठी गावकरी सरसावले होते. 

टंचाईमुक्तीकडे वाटचाल
ग्रामस्थांची एकी हेच विकासाच्या वाटेवरचे पहिले पाऊल ठरले. त्याला साथ मिळाली लोकप्रतिनिधी व शासनाची. सन २०१४ मध्ये विशाल झणझणे हे युवक वयात सरपंचपदी विराजमान झाले. गावचे मुख्य अर्थकारण हे शेती आणि दुग्धव्यवसायवर अवलंबून आहे हे त्यांनी जाणले होतेच  या दोन्ही घटकांना गती द्यायची असेल तर प्रथम दुष्काळावर मात केली पाहिजे असा निश्‍चय त्यांनी केला. दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात गावाची निवड झाली. खाजगी कंपन्या देखील दुष्काळमुक्तीसाठी मदत करीत असल्याची माहिती मिळाल्यावर विशाल यांनी कमिन्स कंपनीकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नास यश आले. 

सुरू झाली विकासाची कामे 
सर्वांच्या एक विचाराने व कृतीने गावात कामे सुरू झाली. यात जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील ऊर्फ दत्ता अनपट, ‘कमिन्स’ कंपनीचे प्रवीण गायकवाड यांचा हातभार मोलाचा ठरला. पूर्वीच्या सिमेंट बंधाऱ्याची दुरुस्ती झाली.

ग्रामपंचायतीच्या खर्चाने तलावातील गाळ काढून खोलीकरण झाले. संबंधित खासगी कंपनीच्या २५० कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले. जलयुक्त शिवार योजनेतील समावेशामुळे कृषी विभागाकडून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली. त्यातून गावातील ओढ्यावर दोन नवीन सिमेंट बंधारे बांधले.

पावसाच्या पाण्याचा थेंब थेंब जमिनीत मुरला पाहिजे यासाठी १५० हेक्टर क्षेत्रावर बांधबदिस्ती केली. चार हेक्टरवर सलग समतल चरी काढल्या. गावात पूर्वीचे जुने पाच बंधारे दुरुस्त करण्यात आले. याबरोबरच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन नवीन सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी झाली. गावातील पूर्वीच्या पाझर तलावातील गाळ काढून त्याची खोली वाढवली. 

तालुक्यातील पहिला ओढाजोड प्रकल्प
शेती बारमाही राहण्यासाठी ओढे वाहते राहणे गरजेचे असल्याने ग्रामस्थांनी ओढाजोड प्रकल्प हाती घेतला. गावच्या शेजारील कापशी या गावातील ओढ्यात धोम-बलकवडीचे पाणी येत असल्याने या ओढ्यात कायम पाणी असते. या ओढ्याला गावातील ओढा जोडण्याचा निर्णय घेतला.

‘जलयुक्त’मधून खर्च करून हे काम यशस्वी पार पाडले. दर्जात्मक काम झाल्याने व जागोजागी सिमेंट बंधाऱ्यांमुळे पाणी टिकून राहण्यास मदत झाली. यातून गावातील ३० ते ४०  टक्के शेती बागायत होण्यास मदत झाली. उर्वरित क्षेत्र बागायत करण्यासाठी गावातील फौजदारीचा ओढा हा शेवग्याच्या ओढ्याशी जोडणीचे काम सध्या सुरू आहे. यातून बागायत क्षेत्रात ४० टक्क्यांची वाढ होणार आहे. या कामासाठी देखील संबंधित खासगी कंपनीने आर्थिक हातभार लावला.

‘एटीएम’द्वारे पाणी
पाणीटंचाई गावाने प्रत्यक्ष पाहिली असल्याने पाण्याचे काटेकोर नियोजन केले जाते. आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी शुद्ध पाणी देता यावे यासाठी ‘सीएसआर’ निधीतून गावात पाणी शद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. गावातील प्रत्येक कुटुंबास एटीएम कार्ड देण्यात आले आहे. ते ‘रिचार्ज’ करावे लागतो. एकवेळ एटीएम कार्ड ‘स्वॅप’ केले तर किमान २० लिटर पाणी उपलब्ध होते. या प्रकल्पामुळे गावात २४ तास पाणी उपलब्ध झाले आहे. साधारण २० लिटर पाणी पाच रुपयांत दिले जाते. सध्या सर्वच कुटुंबे या पद्धतीने पाणी घेतात. शुद्ध पाण्यामुळे गावातील रोगराई कमी झाली असून, पाण्याचा अपव्यय टाळला जात आहे. 

जलसंधारणातून घडलेले बदल
  गावाच्या पीक पद्धतीत बदल झाला. बाजरी, ज्वारी, गहू या पिकांसह ऊस व भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. 

  वीस एकरांत फऴबाग लागवड झाली आहे.

  पाण्याच्या उपलब्धतेमुळे चारा मिळू लागल्याने जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातून दुधाचे उत्पादन वाढले असून, सध्या  दैनदिन चार हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे.

  गावातील प्राथमिक शाळा ‘आयएसओ’ प्रमाणीकरण झाली आहे. 

  बचत व संघटनेसाठी बचत गट निर्मितीवर देण्यात आला आहे. सध्या गावात १५ महिला तर आठ पुरुष बचत गट कार्यान्वित आहेत.

  गावातील सर्व गटारी बंदिस्त केल्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी झाले आहे.

पाणीटंचाईच्या झळा दूर करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने प्रकल्प हाती घेतले. त्यातून पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली. भविष्यात शेती शंभर टक्के ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 
- विशाल झणझणे, ९८३४०५७९५२ माजी सरपंच

जलसंधारणाच्या कामांतून गावातील बागायती क्षेत्र वाढले आहे. सध्या ओढा जोडणीचे काम सुरू आहे. त्यातून गावातील बागायती क्षेत्रात अजून वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
- कृणाल झणझणे, ९८३४०५४५६९  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com