बदलत्या काळात बनली कलिंगड शेती फायद्याची

अनंत इंगळे यांनी पिकवलेली दर्जेदार कलिंगडे.
अनंत इंगळे यांनी पिकवलेली दर्जेदार कलिंगडे.

पाण्याची उपलब्धता असताना चितलवाडी (जि. अकोला) येथील इंगळे कुटुंबीयांनी पपई, केळीचे प्रयोग केले. मात्र अलीकडील काळात पाण्याची परिस्थिती विषम झाली. त्यामुळे कमी कालावधीच्या, कमी पाण्यात येऊ शकणाऱ्या व पैसे मिळवून देण्याची क्षमता असलेल्या कलिंगडाकडे हे कुटुंब वळले. अलीकडील वर्षांत हंगाम बदलाचे प्रयोग करीत या पिकात सातत्य ठेवले. उत्पादन व विक्री या दोन्ही बाबींमध्ये या पीकपद्धतीत त्यांनी हातखंडा निर्माण केला अाहे.

चितलवाडी (ता. तेल्हारा, जि. अकोला) गाव मागील २० वर्षांत वेगाने प्रगतीच्या वाटेने निघाले अाहे. येथील शेतकऱ्यांना केळी पिकाने मोठा हातभार दिला. गावातील अनंत इंगळे यांचे चार भावांचे कुटूंब असून त्यांची ४५ एकर शेती अाहे. या कुटुंबालाही पपई व केळी पिकाने अार्थिक स्थैर्य मिळवून दिले. अाज पाणी कमी होत चालले अाहे. त्यानुसार कुटुंबाने पीक पद्धतीत बदल सुरू केले. दीर्घ कालावधीच्या व अधिक पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड थांबविली. बागायती शेतीचे संपुर्ण चक्र हे पाण्याभोवती फिरत असते. गेल्या काही वर्षात घटलेल्या भूजल पातळीचे चटके अनेकांना बसत अाहेत. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन अाता शेती कसणे हिताचे झाले अाहे. हीच बाब इंगळे यांनी लक्षात घेतली. 

कलिंगडाच्या शेतीवर भर 
गेल्या तीन वर्षांपासून अनंत यांनी कलिंगड, खरबूज लागवडीवर जोर दिला आहे.  सुमारे साडेतीन ते चार महिन्यांत पैसे देणारे, तुलनेने पाणी कमी लागणारे व पैसेही चांगल्याप्रकारे देऊ शकणारे पीक म्हणून इंगळे कलिंगडाकडे पाहतात. सन २०१५-१६ च्या पहिल्या हंगामात त्यांनी चार एकरांत कलिंगडची लागवड केली. पुढील वर्षी लागवड टप्प्याटप्प्याने २५ एकरांपर्यंत वाढवत नेली. यावर्षीच्या हंगामात २० एकरांचे नियोजन झाले अाहे. जितके दिवस पाणी उपलब्ध राहील तितकी लागवड अधिक वाढवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.  

कलिंगड शेतीचा अनुभव 
या भागात कलिंगडपूर्वी नदीपात्रात घेतले जायचे. पारंपरिक जातींची लागवड व्हायची. नदी-नाले जसे अाटत गेले तशी शेती धोक्यात अाली. अाता येथील शेतकरी व्यावसायिक दृष्टीकोनातून कलिंगडाची शेती करतात. इंगळे यांनाही पाण्याचा फटका बसतो आहे. पावसाची साथ नाही. केवळ बोअरचे पाणी मिळते आहे. अशावेळी जानेवारीतील कलिंगड लागवडीसाठी ‘मल्चिंग’चा आधार घेतला. पहिल्या प्रयोगात एकरी ३० टनांपर्यंत उत्पादन काढण्यात यश मिळाले. यात २१ टन ‘ए ग्रेड’चे होते. त्याला ७.५० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. बारा टन बी ग्रेडला साडेचार रुपये दर मिळाला. 

कलिंगडाला मागणी 
पूर्वी कलिंगड प्रामुख्याने उन्हाळी हंगामातच मोठ्या प्रमाणात दिसायचे. अाता रमजान र्इद तसेच अन्य काळातही हे फळ बाजारपेठेत दिसू लागले आहे. विविध संकरित वाण, फळांचा दर्जा, वाहतूक, साठवणूक आदी बाबींचा फायदा शेतकऱ्यांना मिळू लागला. परदेशासह देशांतर्गत ग्राहकाकडूनही  कलिंगडाला सातत्याने मागणी होत अाहे, असे अभ्यासाअंती आम्हाला समजल्याचे अनंत इंगळे म्हणाले. 

खर्चात केली बचत 
सुरवातीला काहीच अनुभव नसल्याने मार्गदर्शक सांगतील त्या प्रकारे व्यवस्थापन केले. ठिबक, मल्चिंग, बियाणे, खते, कीड-रोग व्यवस्थापन, मजुरीसह एकरी सुमारे ७२ हजार रुपये खर्च आला. उत्पन्न मिळाले तरी खर्च अधिक झाल्याची बाब अनंत यांच्या लक्षात अाली. मग विविध बाबींवर लक्ष केंद्रीत करीत पुढील वर्षी एकरी उत्पादन खर्च ५० हजारांच्या अात अाणला. 

बदलते हवामान, पाण्याची कमी झालेली उपलब्धता, उत्पादन खर्च अादी विविध कारणांमुळे शेतकरी कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळतो अाहे. यासाठी एकरी मोठा खर्चही त्याला करावा लागतो. अशा स्थितीत त्याला शासनाच्या पाठबळाची अावश्यकता निर्माण झाली अाहे. प्रामुख्याने मल्चिंगसाठी अनुदान हवे. तसेच पीकविम्याचे कवच मिळाले तर नैसर्गिक अापत्तीच्या काळात दिलासा मिळू शकतो. यासाठी शासनाने बदलत्या पीक पद्धतींचा विचार करीत अनुदान उपलब्ध करून द्यावे.
- अनंत इंगळे

शेतामधूनच विक्री 
दर्जेदार व मोठ्या प्रमाणात कलिंगडे उपलब्ध होत असल्याने व्यापारी चितलवाडी भागात थेट खरेदीसाठी येत अाहेत. अनंत यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनीही या परिसरात कलिंगड लागवडीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कलिंगडा व्यतिरिक्त अन्य क्षेत्रात कपाशी व अन्य पिके इंगळे घेतात. यंदा कपाशीचीही लागवड त्यांनी केली असून पीक परिस्थिती चांगली अाहे. सोबतच खरबुजाची चार एकरांत लागवड अाहे.

सौदी अरेबियाला निर्यात 
पुढील वर्षी १५ नोव्हेंबरला लागवड केली. ती पुढे सहा टप्प्यात काही कालावधीपर्यंत होत राहिली.

मार्चमधील फळांना १२ रुपये तर जूनमध्ये काढणी झालेल्या फळांना साडे ११ रुपये दर मिळाला. 

फळांचा दर्जा उत्तम असल्याने मुंबई येथील निर्यातदाराच्या माध्यमातून सौदी अरेबियाला त्यांची निर्यात झाली. यंदा चार एकरांत अन्य पिकांवर भर न देता आठ अाॅगस्टला लागवड केली. आत्तापर्यंत एकूण क्षेत्रातून सुमारे ५८ टन मालाची विक्री झाली असून चेन्नई येथे तो विक्रीस पाठविण्यात आला आहे. 

- अनंत इंगळे, ९८२२०४७५२१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com