आठवडे बाजाराचा यशस्वी उपक्रम

आठवडे बाजाराचा यशस्वी उपक्रम

मागील पाच वर्षांत शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना यशस्वीपणे रुजवणारी श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी ही सामूहिक उद्यमशीलतेचे उदाहरण आहे. आजघडीला कंपनीद्वारे होणारी वार्षिक विक्री शंभर कोटींवर पोचली आहे. सुमारे ४५० सभासद आणि पाच हजारांवर शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुण्या-मुंबईत २४ ठिकाणी आठवडे बाजाराच्या माध्यमातून थेट शेतमाल विक्री सुरू आहे. शेतकऱ्याला किफायती तर ग्राहकाला वाजवी दरात ४०० पेक्षा अधिक शेती व अन्य उत्पादने आठवडे बाजाराच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. राज्यातील विविध भागांतून आलेल्या उच्चशिक्षित तरुणांनी तयार केलेली ही पायवाट ग्रामीण तरुणांसाठी प्रेरक आहे.

सर्वांनीच केवळ माल पिकवू नये, तर काहींनी आता व्यापारी बनावे, हे सूत्र श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीच्या माध्यमातून साकारात आहे. या कंपनीने पुणे आणि मुंबईमध्ये शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना अनेक अडथळ्यांना तोंड देत यशस्वीपणे राबवली आहे. ग्राहकांचा त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेतीमालाचा वेगाने निपटारा करण्यासाठी आणि टंचाईप्रसंगी उपलब्धता वाढविण्यासाठी हे आठवडे बाजार उपयुक्त ठरत आहेत. पुण्या-मुंबईसारखी महानगरे वाढली, पण त्यात लहान-लहान मंडईसाठी जागा सोडल्या गेल्या नाहीत. मूळचे शेतकरी असलेले स्थलांतरित विक्रेते कुठेतरी रस्त्याच्या कडेला, रहदारीत व धुळीत जीव मुठीत घेऊन शेतीमाल विकतात. रस्ता रुंदीकरणामध्ये आता त्या जागाही जाताहेत. ताजा भाजीपाला वाजवी दरात केवळ मंडईतच मिळू शकतो आणि अशा मंडई जागोजागी उपलब्ध नसल्याने एकूण शेतीमालाचा खप रोडावत असल्याची निरीक्षणे आहेत. या समस्येवर शेतकरी आठवडे बाजार हा एक चांगला पर्याय आहे. महागाई नियंत्रण आणि शेतकऱ्याला किफायती भाव ही दोन्ही उद्दिष्टे साधण्याची क्षमता शेतकरी आठवडे बाजार संकल्पनेत आहे. 

श्री स्वामी समर्थ कंपनीने आठवडे बाजारासह आता नव्या उपक्रमांना सुरवात केली आहे. कंपनी यापुढे गावरान अन्नधान्य-भाजीपाल्याचे उत्पादन घेणार आहे. खरे तर, रानभाज्या, फळे हे देखील सॅलड्सचा भाग होऊ शकतात. गरीब-मध्यमवर्गीयांच्या ताटात देशी व सकस आहार आला पाहिजे. त्या दृष्टीने हे काम महत्त्वपूर्ण आहे. सध्या जगभरामध्ये लोकल व ऑरगॅनिक खानपानाविषयी जागरूकता वाढत आहे. पुढील काळात या उद्योगाची वाढ खूप वेगाने होणार आहे. या पार्श्वभूमीवर, भक्कम विक्री व्यवस्थेचा अनुभव असलेल्या स्वामी समर्थ कंपनीने भविष्यात गावरान उत्पादनांचा मोठा पुरवठादार होण्याची आकांक्षा बाळगली आहे. 

बचत गटांतील उद्यमशील महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गावरान खाद्य महोत्सव भरवले जात आहेत. पुणे शहरात या महोत्सवांना खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. एका महोत्सवात ५० स्टॉल्स असतात. एक स्टॉल तीन दिवसांत सरासरी दीड लाखांची विक्री करतो. त्यात जवळपास ४० हजार रु. नफा बचत गटाला राहतो. चार जणांना तीन दिवस थेट रोजगार मिळतो. दर आठ-पंधरा दिवसांनी चक्राकार पद्धतीने हे महोत्सव भरवले जात आहेत. 

थेट घरापर्यंत शेतमाल पोचविण्यासाठीही कंपनीने काम सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात दुधापासून सुरवात आहे. मुंबईतील डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाच्या धर्तीवर लहान एक-दोन लिटरच्या कॅनमधून दूधपुरवठा केला जाणार आहे. यामुळे पारंपरिक दुधाचा रतीब घालण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होऊ शकतो. पुणे विभागातील असंख्य लहानमोठ्या गोठेधारक शेतकऱ्यांचे बॅकवर्ड इंटिग्रेशन करून हा संपूर्ण व्यवसाय एका संघटित व व्यावसायिक यंत्रणेद्वारा राबविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. पुढे हेच मॉडेल थेट भाजीपाला व अन्नधान्य पुरवठ्यात राबविण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीच्या बिझनेस मॉडेलची व्याप्ती मोठी आहे. कंपनीने विक्री व्यवस्थेचे फॉरवर्ड इंटिग्रेशन करून आता बॅकवर्ड इंटिग्रेशनचे काम सुरू केले आहे. या सर्व प्रक्रियेत नव्या तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करण्यात येतो. आठवडे बाजाराच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या ग्राहकांसाठी एक वेब अॅप्लिकेशनही तयार केले आहे. कंपनीचे प्रमुख कारभारी नरेंद्र पवार, गणेश सवाने, तुषार अग्रवाल, ऋतुराज जाधव, राजेश माने हे सर्व गावाकडचे उच्चशिक्षित तरुण आहेत. शेतकरी आठवडे बाजार संकल्पना त्यांच्यासाठी एक काम न राहता पॅशन बनली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com