संगमनेरात कोरोनाचा साखळी सामना...१० बाद १००

आनंद गायकवाड
Thursday, 25 June 2020

आज सकाळी या दोन्ही व्यक्तिंचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने मोमीनपूरा आणि नायकवाडपूरा भागात धाव घेतली असून, बाधितांच्या कुटुंबियांना ताब्यात घेवून त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये पाठविण्याची तजबीज सुरु करण्यात आली आहे.

संगमनेर ः नगर जिल्ह्यात सर्वाधिक बाधा कोणत्या तालुक्याला झाली असेल तर ती संगमनेरला. तालुक्यात ठराविक भागात सातत्याने रूग्ण सापडत आहेत. एकामुळे कुटुंब आणि कुटुंबामुळे शेजारी, शेजारी पुन्हा शेजाऱ्यांना अशी साखळी वाढत आहे. जणू काही तेथे कोरोनाचा साखळी सामना सुरू आहे. तेथे आतापर्यंत दहा जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागलाच बाधितांचा आकडा शंभरवर गेला आहे.

संगमनेर शहराचा कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढत अाहे. काल आढळलेल्या तीन बाधीत व एका महिलेच्या मृत्यूनंतर आज सकाळीच शहरातील मोमिनपुरा येथील 46 वर्षीय पुरुष व नायकवाडपुरा परिसरातील 50 वर्षिय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यामुळे कालच्या 97 मध्ये दोनची भर पडल्याने बाधीतांची संख्या 99 वर पोचली. मात्र सायंकाळी चारनंतर कुरण येथील एका 85 वर्षीय वृध्देला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आल्याने संगमनेरात कोरोनाने आज शतक पूर्ण केले.

हेही वाचा - कोरोनाने बंद पाडला लंके यांचा जनता दरबार

बुधवारी संगमनेरातील उच्चभ्रु वस्तीत आढळलेल्या बाधीतामुळे संगमनेरात खळबळ उडवून, कोरोनाने पुन्हा गावठाणातील, मध्यवर्ती भागातील मोमिनपुरा व नायकवाडपुरा या प्रभागात हल्ला चढवला आहे. सुमारे पंधरवड्यानंतर या भागात बाधित रुग्ण सापडल्यामुळे हे रुग्ण कोणाच्या संपर्कात आले याचा शोध घेण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

आज सकाळी या दोन्ही व्यक्तिंचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने मोमीनपूरा आणि नायकवाडपूरा भागात धाव घेतली असून, बाधितांच्या कुटुंबियांना ताब्यात घेवून त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये पाठविण्याची तजबीज सुरु करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संगमनेला भेट देवून, संगमनेरातील कोरोनाबाबत माहिती घेताना, प्रसाशकिय अधिकारी व वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर यांच्याशी उपचार पुढील कार्यवाही याबाबत बैठक घेवून मार्गदर्शन केले.

त्यांच्या भेटीनंतर सायंकाळी आलेल्या अहवालात तालुक्यातील कुरण येथील 85 वर्ष वयाच्या वृध्देला कोरोना संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या रुग्णामुळे आज संगमनेर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक 100 रुग्णसंख्या झाली अ यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. सध्या संगमनेर तालुक्यात सद्यस्थितीत आजच्या दोघांसह केवळ 14 रुग्ण सक्रीय आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 patients of Corona at Sangamner