अहमदनगर : अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ११ कोटींचे निवासस्थाने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit pawar

अहमदनगर : अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ११ कोटींचे निवासस्थाने

जामखेड - ‘‘तालुक्यातील जनतेची कामे वेळेत आणि चांगली व्हावीत; याकरिता अधिकारी नोकरीच्या ठिकाणी राहाणे गरजेचे आहे. मात्र, त्यांना चांगल्या निवासाची व्यवस्था असायला हवी म्हणून आपण जाणीवपूर्वक प्रयत्नशील आहोत. जामखेड पंचायत समितीत अधिकारी-पदाधिकारी कर्मचारी निवासस्थान वसाहत उभा करण्यासाठी दहा कोटी 91 लाख रुपये खर्चाची इमारत आपण मंजूर करून घेतली. या कामाचा प्रारंभ तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केला. त्यामुळे यापुढे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वास्तव्य जामखेडलाच राहील; त्यांच्या हातून चांगले काम घडेल," असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

सोमवारी (ता. 17) जामखेड येथील पंचायत समितीत दहा कोटी 91 लाख रुपये खर्चाच्या अधिकारी-कर्मचारी निवासस्थान, इमारत भूमिपूजनाचा सोहळा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार पवार बोलत होते. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, महिला बालकल्याण अधिकारी ज्योती बेलेकर, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता संजय कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, विश्वनाथ राऊत, संजय वराट, रमेश आजबे इस्माईल सय्यद, उमर कुरेशी, बापूसाहेब शिंदे, संध्या सोनवणे, राहुल उगले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

पवार म्हणाले," तालुक्यातील अधिकाऱ्यांवर आमदाराचा दबाव असल्याची टीका विरोधकांनी केली. होय, माझा अधिकार्‍यांवर दबाव आहे पण तो सर्वसामान्य लोकांची कामे करून घेण्यासाठी. अधिकारी पदाधिकारी चुकीचे वागत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. आपण तालुक्यातील अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन विकासाची कामे करतो. तालुका स्तरावर काम करणारे 50 टक्के अधिकारी निवासस्थानाची व्यवस्था नसल्याने कर्जत, श्रीगोंदा, नगर येथून ये-जा करतात. हे टाळण्यासाठी आपण सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान व्यवस्था व्हावी, याकरिता प्रयत्न करीत आहोत.

यामध्ये पोलीस वसाहतीचे काम पूर्ण झाले आहे. पंचायत समिती पदाधिकारी-अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थान उभारण्याचा प्रारंभ केला. तहसील कार्यालय कर्मचारी व ग्रामीण जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी तब्बल 42 कोटी रुपये खर्चून शासकीय निवासस्थानाची व्यवस्था जांबवाडी परिसरात 128 गुंठे क्षेत्रावर करणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी क्रीडांगण, बगीचा व इतर विविध सुविधा निर्माण करणार आहोत. यावेळी तहसीलदार चंद्रे, वारे, मोरे, राळेभात यांची भाषणे झाली. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी प्रास्ताविक केले. विस्ताराधिकारी बी. के. माने यांनी आभार मानले.

Web Title: 11 Crore Of Residence For Officers Employees

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top