
शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली.
शेवगाव (अहमदनगर) : येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, 21 प्रभागांची आरक्षण सोडत आज (शुक्रवारी) तहसील कार्यालयात प्रांताधिकारी देवदत्त केकाण, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, नितीन बनसोडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. प्रभाग आरक्षित झाल्याने अनेक मातब्बरांचा हिरमोड झाला. त्यांना अन्य प्रभागांतून निवडणूक लढवावी लागणार आहे.
साक्षी मुळे व सिफा शेख या छोट्या मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आज सकाळी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यातून अनुसूचित जातींसाठी तीन, मागास प्रवर्गासाठी सहा, तसेच सर्वसाधारण महिलांसाठी सहा प्रभाग आरक्षित करण्यात आले. यामुळे 21 पैकी 11 प्रभाग सर्व प्रवर्गांतील महिलांसाठी राखीव झाले आहेत.
प्रभागनिहाय आरक्षण असे ः सर्वसाधारण महिला ः प्रभाग क्रमांक 5, 6, 8, 10, 12, 15, अनुसूचित जाती पुरुष ः प्रभाग क्रमांक 9, अनुसूचित जाती महिला ः प्रभाग क्रमांक 19 व 21, नागरिकांचा मागास प्रवर्ग- पुरुष ः प्रभाग क्रमांक 7, 14, 20, नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिला ः प्रभाग क्रमांक 13, 16, 17, खुला ः प्रभाग 1, 2, 3, 4, 11, 18.
राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष विद्या अरुण लांडे यांचा प्रभाग क्रमांक दहा पुन्हा सर्वसाधारण महिलेसाठीच आरक्षित राहिल्याने, तर विद्यमान नगराध्यक्ष राणी मोहिते यांचा प्रभाग क्रमांक दोन खुला झाल्याने त्यांचा मार्ग पुन्हा सुकर झाला आहे. उपनगराध्यक्ष वजीर पठाण यांचा प्रभाग क्रमांक 13 या वेळी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांची अडचण झाली आहे
तर भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांचा प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांना पत्नीला पुढे करावे लागणार आहे. यासह अनेक नगरसेवकांचे प्रभाग मागास प्रवर्गासाठी, तसेच महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांची पंचाईत झाली असली, तरी महिला राखीव प्रभागात आपल्या सौभाग्यवती किंवा घरातील महिलेस पुढे करावे लागणार आहे.
संपादन : अशोक मुरुमकर