नगर जिल्ह्यात अकरावीच्या ७७ हजार जागा... असा असणार अभ्यासक्रम

दौलत झावरे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

दहावीच्या परीक्षेच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांची एरवी झुंबड उडते.

नगर : दहावीच्या परीक्षेच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांची एरवी झुंबड उडते. मात्र, या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे अकरावी प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याचे समजते. त्यामुळे यंदा महाविद्यालयांतील झुंबड कमी होणार आहे. त्यादृष्टीने आता महाविद्यालयांनी पावले टाकली असून, शासनाचा आदेश मिळताच ही प्रक्रिया सुरू होणार आहे.

जिल्ह्यात 440 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यांमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य आदी शाखांचा समावेश आहे. या सर्वांची तुकड्यांची संख्या 940 असून, 76 हजार 660 विद्यार्थी क्षमता आहे. त्यामध्ये अनुदानित 453 तुकड्या असून, त्यांची विद्यार्थी क्षमता 37 हजार 800 आहे. विनाअनुदानित 295 तुकड्या असून, त्यांची विद्यार्थी क्षमता 23 हजार 600 आहे. स्वयंअर्थसाहाय्यित 192 तुकड्यांमध्ये 12 हजार 360 विद्यार्थी क्षमता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अद्याप शाळा- महाविद्यालये सुरू करण्यात आलेली नाहीत. माध्यमिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अध्यापनास सुरवात झाली आहे. या अध्यापनात नेटवर्कच्या अडचणी पालकांना येत असल्या, तरी विद्यार्थी त्यावर मात करून अभ्यास करीत आहेत.

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, अकरावी प्रवेशाची प्रक्रिया आता सुरू होणार आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे प्रवेशासाठी पालक व विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येऊ न देता घरून प्रवेश घेण्याची प्रक्रिया करता यावी, यासाठी महाविद्यालयांकडून लिंक बनविण्याचे काम सुरू झाले असून, काही महाविद्यालयांनी ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. अकरावी प्रवेशाची प्रक्रिया कशी करायची, याबाबत अजूनही शासनाकडून निर्देश आलेले नसले, तरी अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी तयारी करून ठेवली आहे.

शासनाचा आदेश येताच प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे; मात्र प्रवेश शुल्क किती घ्यायचे, याबाबतचे नियोजन झालेले नाही. दरम्यान, ऑनलाइन पद्धतीने महाविद्यालये चालणार असतील, तर यंदा अकरावी प्रवेशाचे शुल्क कमी करावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

टक्का वाढल्याने प्राध्यापकांना दिलासा
मागील वर्षी दहावीच्या निकालात घसरण झाल्याने तुकड्या टिकविण्यासाठी प्राध्यापकांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली होती. मात्र, यंदा मागील वर्षीच्या तुलनेत नियमित परीक्षार्थींचे 16 आणि पुनर्परीक्षार्थींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 45.76 टक्‍क्‍यांनी वाढल्याने (एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - 71 हजार 233), विद्यार्थी शोधण्याची वेळ यंदा येणार नाही, अशी आशा प्राध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांना आहे.

मुख्याध्यापक सुनील पंडित म्हणाले, शासनाच्या निर्देशानुसारच प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. शुल्कही शासनाच्या निर्देशानुसारच ठरविण्यात येणार असून, प्रवेशप्रक्रिया ऑनलाइनच करण्यावर भर आहे.

अकरावीसाठी...
कला शाखा : तुकड्या 369, क्षमता 29600

विज्ञान शाखा : तुकड्या 416, विद्यार्थी क्षमता 34000

वाणिज्य शाखा : तुकड्या 131, विद्यार्थी क्षमता 11 हजार 40

संयुक्त शाखा : तुकड्या 24, विद्यार्थी क्षमता 2120

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11th student admission Nagar district Capacity of 77 thousand 660 seats