
शहरातील उपनगरांच्या विकासासाठी शहरविकास आराखड्यात सुधारणा व हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात येणार आहे.
अहमदनगर : शहरातील उपनगरांच्या विकासासाठी शहरविकास आराखड्यात सुधारणा व हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात येणार आहे. या कामासाठी 21 कोटी 50 लाख रुपयांची निविदा सादर झाली असून, त्याच्या मंजुरीचा निर्णय आजच्या सभेत होणार आहे.
राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या आदेशानुसार, केंद्र सरकारच्या अमृत मिशन कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या शहरांसाठी भौगोलिक माहिती प्रणाली आधारित विकासयोजना तयार करण्यास सांगितले आहे. या योजनेंतर्गंत सद्यस्थितीत राज्यातील 44 शहरे समाविष्ट आहेत. त्यात नगर महापालिकेची निवड झाली आहे. त्या अनुषंगाने नगर शहराचा भौगोलीक माहिती प्रणाली आधारित विकास योजना तयार करण्यात येणार आहे.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नगर महापालिकेच्या विकास योजना अंमलात येऊन 2022मध्ये 17 वर्षे पूर्ण होतील. राज्यातील सर्व महापालिका विकास योजना नव्याने तयार अथवा सुधारित विकास योजना तयार करतानाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुलभता व सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीकोनातून जीआयएस प्रणालीचा वापर करण्यास सांगितले आहे.
महापालिकेच्या वाढीव हद्दीचा विकासयोजना आराखडा 4 एप्रिल 2011ला राज्य शासनाकडून मंजूर झाला. 15 मे 2012पासून अंमलात आला आहे. त्यानुसार, नगर शहराचा सुधारित व नव्याने झालेल्या हद्दवाढीतील गावांच्या क्षेत्रासह विकासआराखडा तयार करणे आवश्यक आहे. या प्रणालीनुसार जमीन वापर नकाशा तयार करणे व भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे प्रस्तावित जमीन वापर नकाशा तयार करण्यासाठी नगररचना विभागास माहिती, नकाशे, आराखडे व अहवाल सादर करणे, नगररचना विभागाला माहिती पुरविणे, तसेच महापालिका हद्दीतील जमीन योजना प्रमाणीकृत व त्याबाबतचे प्रस्तावित नकाशे उपलब्ध करून देणे, आदी कामे केली जाणार आहेत.
ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी अंदाजे 21 कोटी 50 लाख रुपये एवढा निधी तीन वर्षांत खर्च करायचा आहे, असे प्रस्तावात म्हटले आहे. या कामाचे तीन टप्पे आहेत. ही रक्कम 15वा वित्त आयोग व विकासभार रकमेतून भागवावा लागेल, असे म्हटले आहे.
संपादन : अशोक मुरुमकर