एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ : वारकरी सांप्रदायाची शिकवण प्रत्यक्षात

राजू घुगरे
Monday, 2 November 2020

एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ ही वारकरी सांप्रदायाची शिकवण शेवगाव येथील माऊली परिवार या स्वयंसेवी संस्थेने प्रत्यक्षात उतरवली आहे.

अमरापूर (अहमदनगर) : एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ ही वारकरी सांप्रदायाची शिकवण शेवगाव येथील माऊली परिवार या स्वयंसेवी संस्थेने प्रत्यक्षात उतरवली आहे. मुत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेल्या रावताळे कुरुडगाव येथील तुकाराम महाराज झिरपे यांना उपचारासाठी २५ हजारांची रक्कम जमा करून तुकाराम महाराजांची शिकवण प्रत्यक्ष कृतीत आणली आहे.

भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन किर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत घेतलेले रावताळे कुरुडगाव (ता. शेवगाव) येथील हभप तुकाराम महाराज झिरपे हे दीड दोन महिन्यापासून मुत्रपिंडाच्या व्याधीने आजारी आहेत. त्यांना उपचारासाठी अहमदनगर, औरंगाबाद येथील दवाखान्यात नियमितपणे जावे लागते. उपचारावर लाख दिड लाख रुपयांचा खर्च होऊनही व्याधी बळावत चालली आहे.

घरची आर्थिक परिस्थिती बेताची त्यातच कोरोनाच्या संसर्गामुळे किर्तन, प्रवचनातून मिळणारे अल्प स्वरुपातील मानधन ही बंद झाले. अतिवृष्टीमुळे शेतातील उत्पन्न हातचे गेले.अशा परिस्थितीत नियमितपणे डायलिसिस करण्यासाठी येणारा खर्च कसा भागवावा या विवंचनेत झिरपे कुटूंबिय असताना वडुले बुद्रुक येथील हभप ज्ञानेश्वर महाराज सबलस यांच्या माऊली परिवार या स्वयंसेवी संस्थेने सदस्य व सोशल मिडीयाच्या माध्यमातून तब्बल पंचवीस हजारांची रक्कम जमा केली.

ही रक्कम सरपंच जालिंदर काळे, नारायण महाराज औटी, सिताराम देशमुख यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर महाराज सबलस व लक्ष्मण झिंजुर्के यांनी झिरपे यांच्याकडे सुपूर्त केली.

तालुक्यातील विविध क्षेत्रातील सदस्य असलेल्या माऊली परिवार या स्वयंसेवी संस्थेची रुजूवात रक्तदान शिबीराचे आयोजन करून नुकतीच करण्यात आली.व्यापक समाजसेवेचे व्रत घेतलेल्या या परिवाराने केलेले हे विधायक कार्य आहे. भविष्यात ते अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे.

- ज्ञानेश्वर सबलस, संस्थापक, माऊली परिवार, शेवगाव

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 thousand assistance from Mauli family to Tukaram Maharaj Zirpe of Rawatale Kurudgaon