Shevgaon : शेवगावात तणावपूर्ण शांतता; ३१ जण पोलिसांच्या ताब्यात, शहरात ‘बंद’

या घटनेतील ११२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून ३१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले
31 arrested in shevgaon near ahmednagar city closed
31 arrested in shevgaon near ahmednagar city closedsakal

शेवगाव : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान रविवारी (ता. १४) रात्री दोन गटांत दगडफेक झाल्याने त्यात अनेकजण जखमी झाले. जखमींमध्ये पोलिसांचाही समावेश आहे. या घटनेतील ११२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून ३१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ८१ जणांचा तपास सुरू आहे. आज शहरात सर्वत्र तणावपूर्ण शांतता होती.

जमावाने रविवारी रात्री केलेल्या दगडफेकीदरम्यान दुकाने, वाहने व पोलिस कर्मचारी यांनादेखील लक्ष्य केल्याचे दिसून आले. त्यामुळे काही काळ दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांमध्ये पळापळ झाली. त्यानंतर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमावाला पांगविले. या घटनेनंतर आज (सोमवारी) विविध आस्थापना, दुकाने बंद होती. ‘सकल हिंदू समाजा’च्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी रात्री रेसिडेन्शिअल विद्यालय ते शिवाजी चौक दरम्यान मिरवणूक काढण्यात आली होती.

ही मिरवणूक मिरी रस्त्यावर आल्यानंतर तेथे दोन गटांत वाद झाला, त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास मिरवणूक क्रांती चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेली असता तेथे दोन गटांत दगडफेक सुरू झाली. त्यामध्ये अनेक जण जखमी झाले. दुकानाच्या काचा, फलक तुटल्यानेही मोठे नुकसान झाले. या वेळी बंदोबस्तावर असलेले पोलिस निरीक्षक विलास पुजारी, कॉन्स्टेबल महेश सावंत, आर. व्ही. घुगे यांच्यासह इतर दहाजण जखमी झाले. त्यातील कॉन्स्टेबल सावंत व अंकुश पातकळ यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले.

शेवगाव शहरात रविवारी रात्री मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयितांची शहानिशा सुरू आहे. घटनेतील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रात्रीपासून विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. नागरिकांनी अफवांवर व सोशल मीडियावर विश्वास ठेवू नये.

- राकेश ओला, पोलिस अधीक्षक, नगर

राज्यामध्ये जाणूनबुजून हे घडवून आणले जात आहे. याला कोणाची तरी नक्कीच फूस आहे. कोणीतरी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करते आहे पण त्यात ते यशस्वी होणार नाहीत. अशाप्रकारे जे करताहेत त्यांना आम्ही सोडणार नाहीत. काही संस्था, काही लोक मागून आग लावण्याचा, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करताहेत आणि हे सगळे बाहेर आणेल.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

शेवगाव शहर सर्व जातिधर्मांच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे पुरोगामी विचारांचे आहे. ते अतिशय शांतताप्रिय आहे. येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीदरम्यान झालेला प्रकार दुर्दैवी आहे. यापुढे शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या प्रवृत्तींची गय केली जाणार नाही.

- राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री तथा पालकमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com