नेवाशात शालेय गणवेशासाठी मिळणार ५० लाख

सुनील गर्जे
Thursday, 31 December 2020

हा निधी जुलैमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर टाकला जात होता. मात्र, यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे शाळांना निधीसुद्धा उपलब्ध करून दिला नाही.

नेवासे : यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र, समग्र शिक्षा अभियानाने 13 नोव्हेंबर रोजी पत्र काढून गणवेशासाठी निधी मंजूर केला.

यावर्षी गणवेश मिळणार, हे निश्‍चित झाले असून, त्यासाठी तालुक्‍यातील 16 हजार 282 लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेशासाठी 48 लाख 84 हजार 600 रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

दरम्यान, अनेक महिने मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला निधी मिळाला आहे. आता विद्यार्थ्यांना शाळा उघडण्यासह गणवेशाची प्रतीक्षा आहे. 

कोरोनाच्या महामारीमुळे या शैक्षणिक वर्षीतील पहिले सत्र संपूनही अजून शाळा सुरू झालेल्या नाहीत. शासनाच्या सूचनेवरून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले.

या वर्गांचा अनुभव लक्षात घेऊन लवकरच आठवीखालील वर्ग सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून जानेवारी-2021मध्ये दिले जाण्याची शक्‍यता आहे. 
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत शालेय गणवेशासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.

हा निधी जुलैमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर टाकला जात होता. मात्र, यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे शाळांना निधीसुद्धा उपलब्ध करून दिला नाही. मात्र, आता शाळा सुरू होण्याची शक्‍यता असल्याने निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप तो उपलब्ध करून दिलेला नाही. 

नेवासे तालुक्‍यातील विद्यार्थ्यांसाठी गेल्यावर्षी (2019) पहिली ते आठवीच्या एकूण 16 हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशांसाठी 96 लाखांचा निधी मिळाला होता. यावर्षी पहिली ते आठवीच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 22 हजार 923 इतकी असून, त्यात लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या 16 हजार 282 इतकी आहे. त्यानुसार, यंदा 48 लाख 6 हजार 300 एवढा निधी मिळाला आहे. 

यावर्षी एकच गणवेश! 
दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला जात होता. यावर्षी एकाच गणवेशासाठी निधी दिला जात आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला एकच गणवेश मिळणार आहे. गणवेशाचा निधी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा होणार आहे. तो खर्च करण्याचे पूर्ण अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 lakh for school uniforms in Nevasa