आशा सेविकांची दिवाळी गोड होणार; महाविकास आघाडी सरकारकडून वाढीव मोबदला वितरणास मंजुरी

अशोक मुरुमकर
Wednesday, 4 November 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आशा स्वयंसेविकांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. कोरोना काळात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आशा स्वयंसेविकांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. कोरोना काळात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना जुलै ते ऑक्टोबर दरम्यान केलेल्या कामाचा वाढीव मोबदला देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतले आहे.

आरोग्य सेवा पुरवण्यामध्ये महाराष्ट्रात आशा सेविका व गटप्रवर्तकांचे महत्त्वाचे काम आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानार्तंगत प्रकल्प अमंलबजावणी आराखड्यात मंजुर केलेल्या अनुदानातुन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमुन दिलेल्या ७८ प्रकारच्या सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र सरकारने निर्धारीत केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो. यामध्ये आशा सेविका व गटप्रवर्तक यांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार जुलैपासून प्रत्येकी दोन हजार व तीन हजार रुपये वाढ देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार राज्य सरकारने ५७ कोटी ५६ लाख रुपये वितरीत करण्यासर मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची दिवाळी होणार गोड होणार आहे. जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७ कोटी ५६ लाख रुपये वितरित करण्याचा सरकार निर्णय काढण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 57 crore sanctioned by Mahavikas Aghadi government to compensate Asha Sevika