esakal | विखे पाटलांनी इशारा देताच नगर-कोपरगावसाठी ८० कोटी मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

80 crore sanctioned for Ahmednagar-Kopargaon

या सर्व खेळखंडोब्यांचे ड्रोनद्वारे केलेले चित्रणच विखे पाटील यांनी मंत्री चव्हाण यांना दाखविले. ते पाहून तेही चाट पडले. आमदार आशुतोष काळे यांनीही या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. साईबाबा चौफुलीजवळ वाहतुकीचा खोळंबा होतो.

विखे पाटलांनी इशारा देताच नगर-कोपरगावसाठी ८० कोटी मंजूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिर्डी ः नगर-कोपरगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आठ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी धाडला. त्यात कात-चुनाही होणार नाही. किमान 30 किलोमीटर लांबीची ठिगळे नीट करावी लागतील, हे लक्षात घेऊन तरतूद करा, अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. मंत्री चव्हाण यांनी, रस्त्यासाठी 80 कोटींची तरतूद करू, असे आश्‍वासन दिले. 

जड वाहतुकीचा मोठा ताण असल्याने नगर-कोपरगाव रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांत लुप्त झाला. अनेकदा त्यात वाहने अडकली. दुचाकी अपघातांत आठ दिवसांत तिघांचे बळी गेले. नादुरुस्त वाहने ठिकठिकाणी अडकून पडल्याचे चित्र दिसते.

या सर्व खेळखंडोब्यांचे ड्रोनद्वारे केलेले चित्रणच विखे पाटील यांनी मंत्री चव्हाण यांना दाखविले. ते पाहून तेही चाट पडले. 
आमदार आशुतोष काळे यांनीही या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. साईबाबा चौफुलीजवळ वाहतुकीचा खोळंबा होतो.

तेथे उड्डाणपुलाची, तसेच हा रस्ता दुरुस्त करण्याची गरज असल्याचे सांगितले. विखे पाटील म्हणाले, की अधिकाऱ्यांनी रस्तादुरुस्तीसाठी आठ कोटींचा प्रस्ताव पाठविला. त्या वेळी उन्हाळा होता. आता बऱ्याच ठिकाणी रस्ताच शिल्लक नाही. जड वाहतुकीमुळे पायादेखील खराब झाला. पाणी निघून जाण्याची सोय केलेली नाही. 

मंत्री चव्हाण म्हणाले, की बाह्यवळण रस्त्याचे सहा किलोमीटर शिल्लक काम, तसेच हा शंभर किलोमीटरचा रस्ता 30 टक्के अंतरात खराब झाला आहे. हे गृहीत धरून या कामासाठी 80 कोटींची तरतूद त्वरित केली जाईल. जिल्ह्याचे पालक सचिव नितीन करीर यांच्यासह महामार्ग प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

विखे यांचे आंदोलन स्थगित 
आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की नगर-कोपरगाव रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, रस्त्यासाठी 80 कोटींची तरतूद झाल्याने हे आंदोलन स्थगित केले आहे. राज्य सरकारने तातडीने प्रस्ताव पाठविला, तर हा रस्ता केंद्र सरकारकडे हस्तांतरित करून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करू. ही बाबही आजच्या बैठकीत मंत्री चव्हाण यांच्या लक्षात आणून दिली. 

साईबाबा चौफुलीवर उड्डाणपूल हवा 
आमदार आशुतोष काळे म्हणाले, की बैठकीत रस्त्याच्या दुरवस्थेकडे मंत्री चव्हाण यांचे लक्ष वेधले. साईबाबा चौफुली येथे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने, रस्त्याचे नूतनीकरण करताना येथे उड्डाणपूल करावा, तसेच गोदावरीवरील पूल चौपदरी करावा, अशी मागणी केली. 

संपादन - अशोक निंबाळकर