
श्रीरामपूर : शेती महामंडळाच्या जमिनीत बाभळी काढण्याच्या कामास आकारी पडीत शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, नऊ गावांतील शेतकऱ्यांनी आज (ता.१२) सकाळपासून महामंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले. जमिनी परत मिळाल्याशिवाय कोणत्याही स्वरूपाचे काम न करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी जेसीबी मशीन रोखून धरली. आंदोलन चिघळू लागल्याने पोलिसांनी या शेतकऱ्यांना ताब्यात घेत श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात हलवित त्यांना स्थानबद्ध केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.