
शनिशिंगणापुर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदाकरीता ८४ ग्रामस्थांनी अर्ज केले आहेत.
सोनई (अहमदनगर) : शनिशिंगणापुर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदाकरीता ८४ ग्रामस्थांनी अर्ज केले आहेत. यात ११ महिलांचा सहभाग आहे. नव्या वर्षात कोणत्या अकरा जणांची विश्वस्त म्हणून लॉटरी लागणार याची परीसरात उत्सुकता लागली आहे.
तत्कालीन फडणवीस सरकारने जून २०१८ मध्ये शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून ट्रस्टचे काम शासनाच्या नियंत्रणात आणून गावातीलच विश्वस्त असण्याची घटना रद्द करुन नवीन विधेयक मंजूर केले होते. विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर होवून व त्यावर राज्यपालांची मोहर लागूनही नवीन घटना व विधेयक प्रत्यक्षात साकार झाले नाही.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या २०२१ ते २०२५ च्या पंचवार्षिक विश्वस्त निवडीचा कार्यक्रम नगरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांनी जाहीर करुन शिंगणापुर येथील मुळ रहिवासी असलेल्यांनी अर्ज करावेत, अशी नोटीस प्रसिद्ध केल्यावरुन गावातून ८४ अर्ज दाखल झाले आहेत. यात अकरा महिलांचा सहभाग आहे. आता २१, २२ व २३ डिसेंबरला अर्जदारांच्या मुलाखती होवून नविन वर्षात ११ विश्वस्तांची निवड होणार आहे.
विश्वस्त पदासाठी गावातील शेटे आडनावाचे २६ अर्ज असुन दरंदले (१९), बानकर (१९), कु-हाट (९) व इतर आडनावाचे अकरा अर्ज आहेत. विद्यमान मंडळातील निम्म्याहून अधिकांनी मनमानी कारभार केल्याने त्यांना थांबण्याचे नारळ भेटेल या आशेने अनेकांनी गुडघ्याला बांशिग बांधले आहे. नवीन विश्वस्तांची निवड नवीन वर्षात होणार असुन कोण असणार नवीन अकरा भाग्यवान याचे आराखडे चर्चेत सुरु झाले आहेत.
संपादन : अशोक मुरुमकर