esakal | सततच्या तक्रारींमुळे ग्रामसेवकाची नोकरी कुणी स्विकारेना; तब्बल 100 पदे रिक्त
sakal

बोलून बातमी शोधा

gramsevak

ग्रामसेवकाची नोकरी कुणी स्विकारेना; तब्बल 100 पदे रिक्त

sakal_logo
By
दौलत झावरे

अहमदनगर : गावगाड्याच्या राजकारणाच्या साठमारीत सध्या ग्रामसेवक (Gramsevak) खलनायक ठरत आहेत. सत्ताधारी व विरोधक नायकाची भूमिका गावात बजावत असून, ग्रामसेवकांना कात्रीत पकडत आहेत. त्यातून तक्रारी होऊन ग्रामसेवकांचाच बळी जात असून, काहींना आर्थिक, तर काहींना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कामकाज कसे करावे, असा प्रश्‍न आता ग्रामसेवकांपुढे उभा राहिला असून, त्यावर प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


तक्रारींचा ससेमीरा आणि सततच्या चौकश्या

नगर जिल्ह्यात एक हजार ५९६ गावे असून, त्यांचा कारभार एक हजार ३१८ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पाहिला जात आहे. या ग्रामपंचायतींसाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांची २५३ पदे मंजूर असून, सध्या फक्त २२९ कार्यरत आहेत. ग्रामसेवकांची एकूण ९५२ पदे मंजूर असून सध्या ८५२ जण कार्यरत आहेत. जिल्ह्यात २०२० व जानेवारी २०२१ ते सप्टेंबरअखेर विविध ग्रामपंचायतींच्या एक हजार ४५१ तक्रारी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. सध्या ७८ ग्रामसेवकांची विभागीय चौकशी सुरू असून, आतापर्यंत १३ जणांचे निलंबन झाले आहे. उर्वरित ग्रामपंचायतींच्या तक्रारींची जिल्हा व तालुका पातळीवर चौकशी सुरू आहे.

हेही वाचा: सभासद,कामगारांची दिवाळी गोड करणार : राजेंद्र नागवडे

गावगाड्यातील राजकारणाचा सर्वाधिक फटका सध्या ग्रामपंचायतींना बसत असून, विकासकामांना खीळ बसून ग्रामसेवकांचे निलंबन होत आहे. या राजकारणात सर्वाधिक बळी ग्रामसेवकांचा जात आहे. कामे केली तरी गावातून तक्रारी होतात, नाही केली तर प्रशासन कारवाई करते. त्यामुळे सध्या ग्रामसेवक मोठ्या संकटात सापडले आहेत.
या तक्रारींच्या पाढ्यालाच आता ग्रामसेवक वैतागले असून, राजकीय हेतूने होणाऱ्या व वारंवार एकाच व्यक्तीकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींची प्रशासनाने सखोल चौकशी करून त्यामागील हेतू शोधावा, अशी मागणी ग्रामसेवकांसह ग्रामविकास अधिकाऱ्यांमधून होत आहे. काही जण नको ती नोकरी म्हणत स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या तयारीत आहेत.
या तक्रारींमुळे सध्या ग्रामसेवकांसह पंचायत समित्या व जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागातील अधिकारी व कर्मचारी वैतागले आहेत. या तक्रारींवर उपाय शोधा, अशीच मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

हेही वाचा: रोहित पवारांनी जिंकली सामान्यांची मनं

‘ग्रामपंचायत विभाग? नको रे बाबा!’

पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदेत सध्या जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेतील बांधकाम, आरोग्य, शिक्षण या विभागांना सर्वाधिक पसंती दिली जाते, मात्र ग्रामपंचायत विभागात कामे खूप असल्यामुळे ‘नको रे बाबा ग्रामपंचायत विभाग,’ असे म्हणत अनेक जण अन्य विभागांना पसंती देत आहेत.

''ग्रामसेवकांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. काही ठिकाणी नियमबाह्य कामे केली नाही तर ग्रामसेवकांच्या तक्रारी होतात. अनेक तक्रारी वस्तुस्थितीला धरून नसतात. दबावतंत्राचा वापर करून ग्रामसेवकांचा बळी दिला जातो. त्यामुळे काही जण जीवनाचा त्याग करतात, तर काही जण आता सेवानिवृत्ती घेण्याच्या मानसिकतेत आहेत. नेहमीच्या ताणतणावामुळे अनेकांना अनेक व्याधी जडल्या आहेत. यावर ग्रामविकास विभागाने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.'' - एकनाथ ढाकणे, राज्याध्यक्ष, ग्रामसेवक संघटना


loading image
go to top