esakal | रोहित पवारांनी जिंकली सामान्यांची मनं Rohit Pawar
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar

रोहित पवारांनी जिंकली सामान्यांची मनं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कर्जत-जामखेड : अनेक वर्षांपासून योजना प्रलंबित होत्या. त्यांचा निपटारा करण्यावर आमदार रोहित पवार यांनी भर दिला. मागील ३५ वर्षांपासून केवळ चर्चेत असलेली कामे त्यांनी प्रत्यक्षात मंजूर केली. त्या बळावरच त्यांनी जनतेच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोरोनासारख्या महामारीमध्ये मतदारसंघातील नागरिकांना त्यांचा मोठा आधार मिळाला. आरोग्यसुविधा पुरविल्या. येथील शासकीय व खासगी औषधोपचार करणाऱ्या रुग्णालयांना मोठा आधार दिला. ऑक्‍सिजनसारख्या समस्येवर मात करताना, संपूर्ण नगर जिल्ह्याला त्यांच्या माध्यमातून मदत झाली. कर्जत-जामखेडची नवीन ओळख ऑक्सिजन हब म्हणून पुढे आली.

अशक्‍य वाटणारे निर्णय त्यांनी मंजूर करून घेतले. कर्जतचे एसटी आगार, खर्डा-मिरजगाव पोलिस ठाणे, जामखेडला पोलिस वसाहत, जामखेड उपजिल्हा रुग्णालय, मतदारसंघातून जाणारे राज्य महामार्ग, शेतकऱ्यांना धान्य साठवून अधिक पैसे मिळावेत, यासाठी आधुनिक पद्धतीने उभे राहत असलेले शासकीय गोदाम, अशी अनेक विकासाभिमुख कामे त्यांच्या नावावर नोंदविली गेली.

विकासाबरोबरच धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक पर्यटनदृष्ट्या दोन्ही तालुक्‍यांचा विकास कसा होईल, यावर त्यांचा विशेष भर आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार पवार यांनी अनेक कामे मार्गी लावली आहेत.

हेही वाचा: नोकरी मिळत नाही, तर मग कौशल्य विकासाबरोबरच मिळवा रोजगारही

शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्र व महाराष्ट्र राज्य कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत-जामखेडमध्ये आमदार पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. पाणलोटाबरोबरच महिलांच्या सक्षमीकरणासाठी, शहरांच्या स्वच्छतेसाठी आई सुनंदाताई स्वतःला झोकून देऊन काम करीत आहेत. त्यांचे मोलाचे सहकार्य मिळते आहे.

गाजतोय भगवा स्वराज्यध्वज

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भगव्या स्वराज्यध्वजाने लहान-थोरांपासून सर्वांनाच भारून टाकले आहे. शिवरायांच्या स्वराज्यधर्माच्या शिकवणीची आणि महाराष्ट्राच्या शौर्याच्या इतिहासाची सर्वांना आठवण करून देण्यासाठी स्वराज्यध्वज मोहीम राबविण्यात आली. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून, तसेच इतर सहा राज्यांतून हा ध्वज फिरतो आहे. या प्रेरणादायी मंगल ध्वजाला अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होते आहे. स्वराज्यध्वजाने अशाप्रकारे सर्वांनाच प्रोत्साहित केलेले असताना, आता ध्वजाच्या सोबतीला एक अत्यंत जोशपूर्ण स्वराज्यध्वज गीतदेखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या गीताची संकल्पनादेखील रोहित पवार यांचीच आहे. ‘मातीत रुजला... गगनात सजला.. नभी पसरला हा रंग...’ अशा दमदार शब्दरचनेला स्वर दिला आहे अवधूत गांधी यांनी. संगीत-दिग्दर्शन श्रेयस नंदा देशपांडे यांचे आहे. पुण्याच्या पुणे स्टुडिओमध्ये चित्रित झालेल्या गाण्याची कोरिओग्राफी अभिषेक हवारगी आणि विक्की माने यांची आहे. दिग्दर्शन आदित्य जी. राठी यांनी केले आहे. संकलन गायत्री पाटील यांनी केले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर खर्ड्याच्या किल्ल्यावर या स्वराज्यध्वजाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्या निमित्ताने या स्वराज्यध्वज गीताची निर्मिती करण्यात आली आहे.

हेही वाचा: Corona Update: राज्यातील कोविड परिस्थिती निवळतेय

महाराष्ट्रातील राजर्षी शाहू - जोतिबा फुले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे, तसेच मथुरा-वृंदावन, केदारनाथ (उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा (राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात, अशा ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधिक पूजन करावे, ही या प्रवासामागील लोकभावना आहे.

सर्व जातिधर्मांच्या लोकांसाठीचा हा वैशिष्ट्यपूर्ण उंच ध्वज महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोचवेल. कोरोना साथीसंबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करीत प्रवास करणार आहे, असा विश्वास आमदार पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: भुजबळांविरोधातील तक्रार मागे घ्या, आमदार कांदेना छोटा राजन गॅंगचा फोन

आमदार रोहित पवार हे कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाला लाभलेले सर्वांत तरुण आमदार. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला मिळालेले युवा नेतृत्व. राज्यात स्वतःच्या कार्यबाहुल्यामुळे सतत चर्चेत असलेले युवा नेतृत्व. त्यांनी मतदारसंघामध्ये विकासाभिमुख कामांचा सपाटा लावला आहे. मतदारसंघात केलेल्या कामांमुळे त्यांनी जनसामान्यांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. पवार यांचा आज (बुधवारी) वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

- वसंत सानप, जामखेड

loading image
go to top