esakal | नऊ अट्टल गुन्हेगारांची टोळी गजाआड

बोलून बातमी शोधा

crime logo
नऊ अट्टल गुन्हेगारांची टोळी गजाआड
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नेवासे : पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार महिन्यांत विविध ठिकाणी झालेल्या चोरी, दरोडा व रस्तालुटीतील गुन्ह्यातील नऊ अट्टल गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यात नेवासे पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, आरोपींनी नेवासे तालुक्‍यातील आठ गुन्ह्यांची कबुली दिली असून, या आरोपींवर नगर, नाशिक, औरंगाबाद व पुणे जिल्हा पोलिसांत तब्बल 38 गुन्हे दाखल आहेत.

नेवासे पोलिसांत गेल्या चार महिन्यांत मेडिकल, कापड, किराणा, इलेक्‍ट्रॉनिक दुकाने तसेच मोटारसायकल चोरी, महामार्गावरील ट्रकचालकांस मारहाण करुन दरोडा टाकणे, असे गंभीर गुन्हे दाखल होते.

हेही वाचा: ह्रदयद्रावक ः दोन्ही मुले नाही आली, तहसीलदारांनीच दिला अग्निडाग

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शन व नेवाशाचे पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक भरत दाते, प्रदीप शेवाळे यांच्या पथकाने गेल्या पंधरादिवसांपासून नेवासे पोलिसांत गेल्या चार महिन्यांत मेडिकल, कापड, किराणा, इलेक्‍ट्रॉनिक दुकान तसेच मोटारसायकल चोरी, महामार्गावरील ट्रकचालकास मारहाण करुन दरोड्याच्या गुन्ह्यांतील आरोपींचा तपास करत होते.

नेवासे पोलिसांनी पंधरा दिवसांत नगर व औरंगाबाद जिल्हात विविध ठिकाणी छापे मारून आतिष सूरज पवार (रा. प्रवरासंगम, ता. नेवासे), मुन्ना ऊर्फ रोहित गोडाजी चव्हाण (रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर), ज्ञानेश्‍वर ऊर्फ माउली राउसाहेब पिंपळे (रा. जुने कायगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), करण ऊर्फ दादू भीमा पवार (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर), अजय ऊर्फ डुड्या दत्तू चव्हाण, सलिम शेख, रहेमान ऊर्फ रहीम पठाण (रा. सातोना, ता. परतुर, जि. जालना), दिलीप मोहन चव्हाण (रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) व विधीसंघर्षित बालक, अशा नऊ जणांना अटक केली. वरील संशयितांनी तालुक्‍यातील आठ गुन्ह्यांची कबुली दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून 15 हजार 400 रुपयांच्या रोख रकमेसह एकूण 61 हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींवर 38 गुन्हे दाखल

नेवासे पोलिसांनी जेरबंद केलेल्या गुन्हेगारांवर श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, शेवगाव, वीरगाव (ता. वैजापूर), वडगाव निंबाळकर (ता. बारामती), गंगापूर, वाळुंज एमआयडीसी, औरंगाबाद शहरातील छावणी व उस्मानपुरा पोलिस ठाणे, पाचोड, कन्नड, नाशिक जिल्हा पोलिसांत एकूण 38 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजय करे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बातमीदार - सुनील गर्जे