
येथील शिरसगाव परिसरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव आंदोलन केले.
श्रीरामपूर (अहमदनगर) : ट्रॅक्टरच्या जुगाड ऊस वाहतुकीमुळे अपघात वाढले असून संबंधित ट्रॅक्टरचालकांसह संबंधित कारखानदारांवर कारवाईच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेने घेरावो आंदोलन केले. आंदोलनानंतर उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी जुगाड वाहतुकीवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी छावा संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांना दिले.
येथील शिरसगाव परिसरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव आंदोलन केले. यासंदर्भात संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन वाहतूक प्रशासनाला देण्यात आले. ट्रॅक्टरद्वारे सुरु असलेल्या जुगाड ऊस वाहतुकीवर कडक कारवाईच्या मागणीसाठी संघटनेने अनेकदा वाहतूक प्रशासनाचे लक्ष वेधले. परंतु अद्याप कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलन करण्यात आले.
जुगाड वाहतुकदार ट्रॅक्टर चालकासह संबंधित कारखानदारांवर कारवाई करावी. बैलगाडी जुगाडामुळे अपघात झाल्यास लाभार्थ्यांना विमा मिळत नाही. ट्रॅक्टरमालक आणि कारखानदारांनी अपघाताची जबाबदारी घ्यावी. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी अन्य वाहनांना रेडीयम लावावे. रात्रीच्यावेळी योग्य प्रकाशझोत असलेल्या वाहतुकीस परवानगी द्यावी.
डबल ट्रेलर असल्यास मागील ट्रेलरच्या खाली प्रकाशझोत असावा. ऊस वाहतूक कणाऱ्या वाहनांची आरटीओ नियमित तपासणी करण्यासह विविध मागण्या छावा समर्थकांनी आंदोलनात केल्या आहे. आंदोलनात छावाचे जिल्हाप्रमुख नितीन पटारे, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे, शरद बोंबले, अमोल वाळुंज, रमेश म्हसे, प्रवीण देवकर, निलेश बानकर, मनोज होन, लक्ष्मण कसबे यांनी सहभाग नोंदविला.
संपादन - सुस्मिता वडतिले