
राहुरी : जेल तोडून पळालेला आरोपी जेरबंद
राहुरी : राहुरीच्या कारागृहातून खिडकीचे गज कापून पलायन केलेल्या कुख्यात भांड टोळीतील एका आरोपीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने माजलगाव (जि. बीड) येथे जेरबंद केले. नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी (वय २२, रा. मोरे चिंचोली, ता. नेवासा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याची आज (रविवारी) पुन्हा राहुरीच्या कारागृहात रवानगी करण्यात आली.
राहुरी येथे १८ डिसेंबर रोजी पहाटे कारागृहाच्या खिडकीचे गज कापून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई झालेला टोळी प्रमुख सागर भांड सह पाच आरोपींना पलायन केले होते. त्याच दिवशी पोलिसांनी सागर भांड ,किरण अजबे, जालिंदर सगळगिळे या पळालेल्या आरोपींना ताब्यात घेतले होते. परंतु, नितीन उर्फ सोन्या माळी व रवी पोपट लोंढे फरार झाले होते.
आज (रविवारी) नितीन माळी याला पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले. या प्रकरणातील आरोपी रवी लोंढे अद्याप फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. राहुरीच्या ब्रिटिशकालीन कारागृहातून कैदी फरार होण्याची घटना प्रथमच घडल्याने, नाशिकचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी कारागृहाची पाहणी केली होती. याप्रकरणी राहुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे ,पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व घटनेच्या वेळी कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
Web Title: Accused Escaped From Rahuri Jail Arrested Prison
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..