
सूद म्हणाले, ""कोरोना काळात मुले पालकांकडे मोबाईल मागत होती; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पालक हतबल झाले होते, पण ते त्यांच्या भावना मांडू शकत नव्हते.
कोपरगाव : अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून समाजसेवेमुळे चर्चेत आहे. लॉकडाउनच्या काळात त्याने अनेक लोकांना गावी जाण्यासाठी मदत केली. या मदतीची प्रेरणा साईबाबांनीच दिल्याचे गुपितही त्याने सांगितले. नगर जिल्ह्यातही त्याने समाजसेवा सुरू केली आहे. लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने मुलांना अॉनलाईन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. परंतु गरीब मुलांना मोबाईलअभावी या शिक्षणाला मुकावे लागत आहे.
नगरपालिका शाळेतील गरजू विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत होते. ही बाब लक्षात घेऊन सिनअभिनेता सोनू सूद यांनी आज पालिका शाळेतील 100 विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांचे मोबाईल वाटप केले.
हातात नवा कोरा मोबाईल पाहून विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले. कोरोनामुळे अनेकांचे नुकसान झाले. मात्र, देशाची भावी पिढी शिकली पाहिजे, या भावनेतून ही मदत करीत असल्याचे सूद यांनी सांगितले.
हेही वाचा - निसर्ग चक्रावला - हिवाळ्यात आला पावसाळा
नगरपालिका शाळा क्रमांक तीनच्या जूने सायन्स कॉलेज मैदानावर हा कार्यक्रम झाला. नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, सूद यांची पत्नी सोनाली, मुलगा इशांत, कल्याणचे नगरसेवक कुणाल पाटील आदी उपस्थित होते.
नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनोद राक्षे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम झाला. विद्यार्थिनी रेणुका पवार हिने मोबाईलअभावी ऑनलाइन शिक्षणात येणाऱ्या अडचणी सांगितल्या.
सूद म्हणाले, ""कोरोना काळात मुले पालकांकडे मोबाईल मागत होती; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पालक हतबल झाले होते, पण ते त्यांच्या भावना मांडू शकत नव्हते. अशी अनेक कुटुंबे असल्याने मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे, देशासह आई-वडिलांची सेवा करावी, यासाठी मोबाईलवाटप केले.'' पालिकेतील कोविडयोद्ध्यांचा सोनू सूद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ऍड. भावना गवांदे यांनी केले.
कोपरगावात अभियांत्रिकीसाठी निवड
कोपरगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात 20 वर्षांपूर्वी माझी निवड झाली होता. त्यावेळी येता नाही आले; पण आज कोपरगावकरांच्या प्रेमाने मला येथे खेचून आणल्याची प्रतिक्रिया सोनू सूद यांनी व्यक्त केली.
संपादन - अशोक निंबाळकर