निसर्गही झाला तऱ्हेवाईक ः हिवाळ्यात आला पावसाळा, राहुरीत झाली ढगफुटी!

विलास कुलकर्णी
Friday, 8 January 2021

शेरी-चिखलठाण येथे काल रात्री ढगफुटी सदृश्य पावसाने तडाखा दिला. त्यामुळे, परिसरातील डोंगराचे पाणी ओढ्यातून शेत जमीनींमध्ये पसरले.

राहुरी ः निसर्गही तऱ्हेवाईक झाला आहे. हिवाळ्यात पावसाळा आहे की पावळ्यात हिवाळा काही कळायला मार्ग नाही. स्वेटर घातला की पाऊस येतो आणि छत्री बाहेर काढली की थंडी पडते. 

तालुक्यात काल (गुरुवारी) रात्रीपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. आज (शुक्रवारी) दिवसभर ढगाळ वातावरणसह संततधार पाऊस सुरु आहे. काल रात्री साडे दहा वाजता शेरी-चिखलठाण येथे ढगफुटी सदृश पावसाने शेतजमिनी तुडुंब भरून, बांधावरुन पाणी वाहिले.

उभी पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे, पिके सडून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे वातावरण बदलले आहे. त्याचा फटका भाजीपाला पिकांसह गहू, हरभरा, मका, कांदा पिकांना बसला आहे. पिकांना रोगराईने घेरले आहे.

कीटकनाशक फवारणी करून, पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. रिमझिम व हलक्या पावसामुळे फवारणी करण्यासही अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे, शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

कांदा पिकावर करपा, मावा, तुडतुडे; तर हरभरा पिकावरील फुलगळ होऊ लागली आहे. जनावरांचा चारा अडचणीत सापडला आहे. अशाच प्रकारचे वातावरण आठ दिवस राहण्याची शक्यता असल्याने, संकटात अधिक भर पडणार आहे. त्याचा गहू पिकाला जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.

शेरी-चिखलठाण येथे काल रात्री ढगफुटी सदृश्य पावसाने तडाखा दिला. त्यामुळे, परिसरातील डोंगराचे पाणी ओढ्यातून शेत जमीनींमध्ये पसरले. शेतांचे बांध फोडीत पाणी नदीपात्रात गेले. तुडुंब भरलेले शेतातील पाणी काढण्यासाठी मध्यरात्री बारा-एकच्या दरम्यान शेतकऱ्यांनी शेतात धाव घेतली.

हेही वाचा - नगरमधील लष्करी तळ हलविण्याच्या हालचाली

गवार, मेथी, कोबी, घास, मका, कांदा, ऊस, गहू पिकांमध्ये पाणी साचले. सुमारे शंभर एकर टरबुजाच्या वाड्यांमध्ये पाणी भरले. टरबूजांच्या वेलीला पाला राहिला नाही. टरबुजे पक्व नसल्याने, जनावरांना खाण्यायोग्य राहिले आहेत. भाजीपाला पिके सडून, अतोनात नुकसान होणार आहे.

 

"काल रात्रीच्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाच बंधारे फुटले होते. त्यावेळी, जमिनी खरवडून पिके वाहून गेली. त्या पिकांची नुकसान भरपाई मिळाली. परंतु, खरवडून वाहून गेलेल्या जमिनीची अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. यंदा, पुन्हा नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. शासनाने पिकांचे पंचनामे करून, नुकसान भरपाई मिळावी.

- डॉ. सुभाष काकडे, सरपंच, चिखलठाण. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It rained heavily in the winter