ग्रामसेवकांच्या भरवशावर बसू नका; आदर्श सरपंच पेरे पाटील यांचे राशीनमध्ये मार्गदर्शन 

दत्ता उकीरडे
Friday, 9 October 2020

‘सरकारच्या निधीवर अवलंबून न राहता ग्रामपंचायतीने स्व-उत्पन्नातून गावाची प्रगती केली पाहिजे. लोकांच्या सवयी बदलता आल्या पाहिजेत. ग्रामसेवकांच्या भरवशावर बसू नका.

राशीन (अहमदनगर) : ‘सरकारच्या निधीवर अवलंबून न राहता ग्रामपंचायतीने स्व-उत्पन्नातून गावाची प्रगती केली पाहिजे. लोकांच्या सवयी बदलता आल्या पाहिजेत. ग्रामसेवकांच्या भरवशावर बसू नका. सरकारच्या हजारो योजनांचे नियोजन करा, त्या योग्य प्रकारे राबवा. जात-धर्मापेक्षा माणसाला किंमत द्या,'' असे आवाहन पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी आज येथे केले. 

बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंटच्या विश्‍वस्त सुनंदा पवार यांच्या पुढाकारातून सरपंच पेरे पाटील यांचे मार्गदर्शन येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. सुनंदा पवार, सरपंच नीलम साळवे, सुवर्णा कानगुडे, शैला थोरात, सारिका जाधव यांच्यासह राशीन परिसरातील महिला, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

""पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी, सौरऊर्जेद्वारे गरम पाणी, मोफत सॅनिटरी पॅड, शेतीसाठी मोफत ट्रॅक्‍टर, कचरा व प्लॅस्टिक संकलन, वर्षभर मोफत दळण, असे अभिनव उपक्रम आम्ही राबविल्याने ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला. त्यातून करसंकलन वाढले व सुविधांमुळे जनतेचा फायदा झाला,'' असे त्यांनी सांगितले. 

सरपंच नीलम साळवे यांनी पेरे पाटील यांचे आभार मानत, गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक दीपक थोरात यांनी केले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adarsh ​​Sarpanch Pere Patil guidance in Rashin