
गडाखांच्या विश्वासाने उभारी
नेवासे फाटा - शिवसेना पक्षाचा झेंडा व ठाकरे घराण्याचे नाव घेऊन मोठे झालेल्यांनी साथसंगत सोडली असताना, संकटाच्या क्षणी माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना पक्षावर दाखविलेल्या विश्वासाने लढण्याची उभारी आली. गडाखांचा हा विश्वास कधीच विसरणार नाही, अशी भावना माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
औरंगाबाद व पैठणचा झंझावाती दौरा आटोपून ठाकरे आज दुपारी तीन वाजता नेवासे फाटा येथे आले तेव्हा युवा नेते उदयन गडाख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या शिवसंवाद यात्रा मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, उपनेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार उदयसिंह राजपूत, आमदार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र दळवी व तालुक्यातील युवक उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार गडाख यांनी पक्ष अडचणीत असताना सोनई येथील मेळाव्यात शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतल्याने लढण्याची ऊर्जा व बळ मिळाले. धोका देऊन सत्तेचा मुकुट घातलेले सरकार फार काळ टिकणारे नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले. नगर- औरंगाबाद रस्त्यावर भर पावसात हा शिवसंवाद मेळावा जल्लोषात पार पडला.
युवा नेते उदयन गडाख म्हणाले, की नेवासे तालुक्याची संपूर्ण ताकद ही शिवसेनेच्या पाठीशी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांना खंबीर साथ कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच्या स्वागताचे सर्व नियोजन गडाख यांनी केले होते. राजमुद्रा चौक व परिसर भागवामय करण्यात आला होता. अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय करे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. तालुक्यातील अनेक युवक भगवा झेंडा, ठाकरे व गडाखांचे छायाचित्र हातात घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी आले.
उदयनमुळे आदित्य तळपला
युवा नेते उदयन गडाख यांनी ठाकरे यांच्या भाषणापूर्वी जय भवानी जय शिवाजी, आवाज कोणाचा आणि उद्धव ठाकरे तुम आगे बढोच्या जोरदार घोषणा दिल्या. संभाजीनगर, मुंबई आणि आता दिल्लीपर्यंत आवाज गेला पाहिजे, असे म्हणत त्यांनी घोषणा दिल्या.
Web Title: Aditya Thackeray Shiv Samvad At Nevase Phata
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..