येवल्याची नव्हे पैठणी आता पाथर्डीची! ४५ वर्षांनंतर हातमाग सुरू

राजेंद्र सावंत
Tuesday, 6 October 2020

एके काळी पाथर्डीची नऊवारी साडी राज्यात प्रसिद्ध होती. शहरात 1975 पूर्वी साडेतीनशे हातमाग होते. कोष्टी बांधवांचा हा मुख्य व्यवसाय होता. हाताला काम मिळत होते, चांगली सुबत्ता होती. पुढे यांत्रिकीकरणामुळे हातमाग हळूहळू बंद पडले. 

पाथर्डी ः येवल्याची पैठणी प्रसिद्ध आहे, हे साऱ्या जगाला माहिती आहे. परंतु ती तिथे येण्यापूर्वी अगोदर दुसऱ्या शहरात प्रसिद्ध होती. पैठणी विणण्याची कला त्या शहराने जाणीवपूर्वक जपली आणि तिचा विस्तार केला. याच पैठणीसाठी दुष्काळी समजले जाणारे पाथर्डी शहर ओखळले तर नवल वाटू नये.

येथील प्राथमिक शिक्षक अमोल बबन भंडारी यांनी स्वतःचे सात ते आठ लाख रुपये खर्च करून सोमवारी (ता. पाच) हातमागावर पैठणी विणण्याचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्यात 80 जणांना सहा महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

एके काळी पाथर्डीची नऊवारी साडी राज्यात प्रसिद्ध होती. शहरात 1975 पूर्वी साडेतीनशे हातमाग होते. कोष्टी बांधवांचा हा मुख्य व्यवसाय होता. हाताला काम मिळत होते, चांगली सुबत्ता होती. पुढे यांत्रिकीकरणामुळे हातमाग हळूहळू बंद पडले. 

भंडारी म्हणाले, की आई-वडील गाय छाप कारखान्यात कामगार होते. तेथेही आता यांत्रिकीकरणाने रोजगार मिळेना. कोष्टी समाजबांधवांना रोजगार नसल्याने अस्वस्थ होतो. येवल्याचे पैठणी विणणारे प्रशिक्षक मिळाले. त्यांच्या सहकार्याने ऐंशी जणांना सहा महिने प्रशिक्षण देऊन या कलेत पारंगत करता येईल, याचा आनंद वाटतो. पंचेचाळीस वर्षांनंतर पाथर्डीत हातमागाचा आवाज घुमू लागला, ही घटना आनंददायक आहे. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून केलेला हा खटाटोप आहे. 
समाजातील कष्टाळू व गरजू युवक- महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.'' 

 

आई-वडिलांच्या हस्ते व समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत हातमागाचे प्रशिक्षण सुरू केले आहे. पाथर्डीत हातमागाचा आवाज पुन्हा घुमून बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पुढाकार घेतला. अभिजित भागवत, भारती असलकर, अतुल तरवडे, गणेश रोकडे यांच्यासह समाजातील सर्वांचे सहकार्य मिळत आहे 
- अमोल बबन भंडारी, प्राथमिक शिक्षक, पाथर्डी 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 45 years in Pathardi, the handloom wheel turned